केंद्र सरकारने नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलांची अंमलबजावणी १ जूनपासून सुरु झाली आहे.
बँक खाते उघडताना ज्यांच्याकडे बँक खाते नसेल त्यांना किमान आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर सहा महिन्यांच्या आधार कार्ड बँकेकडे जमा करावे लागेल.
या नवीन निर्णयानुसार, ५० हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँक व्यवहारांसाठीही पॅन किंवा फॉर्म ६० सोबत आधार कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच विद्यमान बँक खातेधारकांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत आधार कार्ड क्रमांक बँकेत द्यावा लागणार आहे, अन्यथा त्यांची खाती अवैध ठरवण्यात येतील.
याआधी केंद्र सरकारने येत्या १ जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना पॅन कार्डासोबत आधार कार्ड जोडण्याचे आदेश दिले होते.
याशिवाय, नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करतानादेखील आधार कार्ड सादर करणे बंधनकारक केले आहे.
भारताचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती यांचे निधन
देशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती (वय ९५ वर्षे) यांचे १५ जून रोजी निधन झाले.
देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये भगवती यांचा समावेश होता. प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते.
भगवती देशाचे १७वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते.
ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै १९७३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
सरन्यायाधीश असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या.
भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. २००७मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांनी ‘मूलभूत अधिकाराच्या मुद्यावर कोणतीही व्यक्ती त्या मुद्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध नसतानाही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते,’ असा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.
१९९३च्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी ६ जण दोषी
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले.
न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करिमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. तर सबळ पुराव्याअभावी अब्दुल कय्यूमची सुटका केली.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्यासह मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट आणि करिमुल्ला खान याला न्यायालयाने दोषी मानले.
बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासोबतच देशाची आणि विशेषतः मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, या उद्देशाने हे स्फोट घडवून आणल्याचा सीबीआयचा दावाही न्यायालयाने मान्य केला.
या बॉंबस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते.
बुडीत कर्जांप्रकरणी सेंट्रल बॅंकेवर कारवाई
रिझर्व्ह बॅंकेने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅंकेवर बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई (प्रॉम्ट करेक्टीव्ह अॅक्शन) केली आहे.
यानुसार बँकेला नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरण करताना निर्बंध येणार आहेत.
याआधी आरबीआयने देना बँक, आयडीबीआय बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युको बॅंकेवर कर्ज थकबाकीवर कारवाई केली होती.
सेंट्रल बँकेच्या निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मालमत्तांवरील परतावा उणे झाल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.
बॅंकांची ढोबळ बुडीत कर्जे १० टक्क्यांवर गेल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून अशी कारवाई केली जाते.
मार्चअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात सेंट्रल बँकेला २,४३९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण १०.२० टक्क्यांवर पोहचले आहे.
‘बॅटमॅन’ अॅडम वेस्ट यांचे निधन
६०च्या दशकातील अमेरिकेतील ‘बॅटमॅन’ या टीव्ही सिरीजमध्ये बॅटमॅनची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते अॅडम वेस्ट यांचे ९ जून रोजी निधन झाले.
१९६०च्या दशकामध्ये आलेल्या बॅटमॅन या सिरीजने अमेरिकेसह युरोपमधील बालचमूंसह अनेकांना आपली भुरळ पाडली होती.
विल्यम वेस्ट अॅण्डरसन या नावाने १९२८साली वॉशिंग्टनमधील शहरगावात जन्मलेल्या वेस्ट यांनी साहित्यात पदवी मिळविली.
पण तत्कालीन पत्रकारिता आणि युद्धोत्तर नवसाहित्याच्या प्रांतात शिरण्याऐवजी वेस्ट यांनी हॉलीवूड गाठून आपल्या नावात बदल केला.
१९६६ ते ६८ या काळामध्ये अॅडम वेस्ट हे लौकिकार्थाने पडद्यावर बॅटमन म्हणून समोर आले आणि नुकत्याच झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत बॅटमन म्हणूनच जगले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा