चालू घडामोडी : ८ जून
रोहन बोपण्णाला पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद
- भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले.
- त्यामुळे लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर ग्रँड स्लॅम जिंकणारा बोपण्णा हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.
- रोहन आणि ग्रॅब्रिएलाने अॅना लीना ग्रोएनफील्ड (जर्मनी) व रॉबर्ट फराह (कोलम्बिया) यांची कडवी झुंज मोडून काढत जेतेपदावर नाव कोरले.
- या स्पर्धेच्या निमित्ताने कारकिर्दीत दुसऱ्यांदा रोहन बोपण्णाने ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले.
- याआधी २०१०मध्ये त्याने पाकिस्तानच्या एहसाम उल हक कुरेशीसह अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.
- तेव्हा दुहेरीतील तज्ज्ञ टेनिसपटू बॉब व माइक या ब्रायन बंधूंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
प्रा. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज पुरस्कार
- कन्नड व इंग्रजी साहित्यात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांची कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार आज देशभरात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. विविध भाषांतील मान्यवरांना आजपर्यंत तो मिळाला आहे.
- डॉ. शिवप्रकाश हे कन्नड भाषेतील अग्रणी कवी व नाटककार आहेत. त्यांचा जन्म १५ जून १९५४मध्ये बंगळुरू येथे झाला.
- प्रादेशिक भाषेतील कसदार साहित्य देशातील इतर भाषांमध्येच नव्हे, तर इंग्रजी व युरोपियन भाषेत अनुवादित होऊन जगातही सहजपणे स्थान मिळवू शकते, हे त्यांनी दाखवून दिले.
- बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजीत पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर ते तेथेच सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
- वयाच्या २३व्या वर्षी ‘मिलारेपा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर मालेबिड्डा नेलाडल्ली, अनुक्षना चारीटे, सूर्यजाळ, मालेया मंटपा आणि मात्ते मात्ते या कविता संग्रहासह मारुरुपागलू आणि नन्ना मैनागारा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
- आधुनिक जीवनातील परस्परविरोध, दैनंदिन जीवनातील शक्ती, गूढ प्रतीकात्मकतेचा वापर आदींचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून उमटले.
- कन्नडमधील त्यांच्या गाजलेल्या कवितांचा अनेक भारतीय आणि युरोपियन भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.
- ‘महाचैत्र’ या त्यांच्या पहिल्या नाटकाला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
- सुलतान टिपू, शेक्सपिअर, स्वप्नानुके, मंतेस्वामी कथाप्रसंग, मदारी, मादय्या, मादुरेकंडा, माधवी, मात्रिका, मकरचंद्रा, सती, कासांद्रा अशा नाटकांचे त्यांनी लेखन केले. ‘किंग-लिअर’ हे इंग्रजी नाटक त्यांनी अनुवादित केले.
- त्यांच्या काही नाटकांचे ३००हून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यांची काही नाटके इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, इटालियन अशा परदेशी भाषांमध्ये, तर काही नाटके हिंदी, तामिळ, मल्याळम, आसामी आदी दहा ते बारा भाषांतही अनुवादित झाली आहेत.
- कन्नड साहित्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांची ‘भारतीय साहित्य’ मासिकाचे संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- बर्लिनस्थित भारतीय दूतावासातील टागोर केंद्राचे संचालक, ‘भारतीय साहित्य’ व ‘अनिकेतना’चे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.
- केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कृत राष्ट्रीय महोत्सवाच्या संचालकपदाची धुराही सांभाळली आहे.
- शिवप्रकाश यांना भाषा भारती, एस. बंगारप्पा एक्सलन्स, संगीत नाटक अकादमी, आर्यभट्ट, उत्कृष्ट भाषांतर अशा २० पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
फोर्ब्सच्या यादीत विराट कोहली एकमेव भारतीय
- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय ठरला आहे.
- २.२ कोटी डॉलर्स इतकी कमाई करणाऱ्या विराट कोहली या यादीत ८९व्या स्थानावर आहे.
- विराटच्या २.२ कोटी डॉलर्स या एकूण उत्पन्नात बीसीसीआयकडून मानधनापोटी मिळणारे ३० लाख आणि जाहिरातींसाठी मिळणाऱ्या १.९ कोटींचा समावेश आहे.
- फोर्ब्सच्या या यादीनुसार ९.३० कोटी डॉलर्स कमाई करणारा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे.
- टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या रूपाने केवळ एका महिलेलाच या यादीत स्थान मिळाले आहे. २.७ कोटी डॉलर्स कमावणारी सेरेना यादीमध्ये ५१व्या क्रमांकावर आहे.
- या यादीत अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टार लिब्रोन जेम्स दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनल मेस्सी तिसऱ्या आणि टेनिस स्टार रॉजर फेडरर चौथ्या क्रमांकावर आहे.
- फोर्ब्सच्या यादीतील हे खेळाडू २१ देशांतून आणि ११ विविध खेळ खेळणारे आहेत.
सचिन युनिसेफच्या ‘सुपर डॅड्स’ मोहिमेत सहभागी
- क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर ‘युनिसेफ’च्या ‘सुपर डॅड्स’ मोहिमेत सहभागी झाला आहे.
- मुलांच्या सुरवातीच्या विकासात वडिलांची भूमिका निर्णायक ठरत असते. याच उद्देशाने ‘युनिसेफ’ने ही मोहीम सुरू केली आहे.
- या मोहिमेत फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन यांचाही समावेश आहे.
समाजसुधारक मेहरुन्निसा दलवाई यांचे निधन
- समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचे ८ जून रोजी पुण्यातल्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.
- मेहरुन्निसा यांचा जन्म २५ मे १९३० रोजी पुण्यात झाला होता. हमीद दलवाई यांच्यासोबत मेहरुन्निसा यांचा विवाह १९५६मध्ये झाला होता.
- हमीद दलवाई यांच्या निधनानंतर मेहरुन्निसा यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात अधिक सक्रिय होऊन काम केले. तसेच या मंडळाचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे काम पाहिले.
- १९८६-८७ मध्ये त्यांनी तलाक मुक्ती मोर्चाही काढला होता. ‘मी भरून पावले’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा