भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ (GSLV MK III) या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे ५ जून रोजी श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
या प्रक्षेपकाद्वारे ३,१३६ किलो वजनाच्या जीसॅट-१९ या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे भारतातील इंटनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
‘जीएसएलव्ही मार्क ३’मुळे आता भारताला २.३ टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी परदेशात जाण्याची गरज राहणार नाही.
तसेच या उपग्रह प्रक्षेपकाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवणे शक्य होणार आहे.
संतोष वैद्य यांची जागतिक बँकेवर नियुक्ती
पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती केलेले आयएएस अधिकारी संतोष वैद्य यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ आर्थिक कामकाज सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
संतोष वैद्य हे १९९८मधील अगमुट (अरुणाचल, गोवा, मिझोराम, केंद्रशासित प्रदेश) या केडरमधील आयएएस अधिकारी आहेत.
त्यांचा प्रशासनातील अनुभव खूप मोठा असून ईशान्येकडील राज्यांत त्यांचे काम विशेष ठसा उमटवणारे आहे.
आयआयटी खरगपूर या संस्थेतून त्यांनी इन्स्ट्रमेन्टेन्शन या विषयात त्यांनी बीटेक केले. तर अर्थशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात २०००-२००१मध्ये ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातून झाली.
त्यांनी गोव्यात मुख्यमंत्री सचिवालयात तसेच दिल्ली जल मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे.
२०१२-१३मध्ये ते दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे विशेष सचिव म्हणूनही कार्य केले आहे.
वैद्य यांची सप्टेंबर २०१३मध्ये पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून नेमणूक झाली, त्यानंतर मार्च २०१६ पर्यंत ते त्या पदावर कार्यरत होते.
अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयात काम करताना त्यांनी ऑफ ग्रीड सोलर रूफटॉप प्रकल्पांसाठी काम केले.
२००७मध्ये त्यांना राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यात आले होते. २००८च्या निवडणुकांत त्यांना मुख्य सचिवांनी उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीसाठी गौरवले.
तर २००९च्या संसदीय निवडणुकांवेळी चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याने निवडणूक आयोगाने त्यांना चांगल्या कामाचे प्रमाणपत्र दिले होते.
मुळचे पुण्याचे असेलेल्या संतोष वैद्य यांना नव्या नियुक्तीने तीन वर्षे अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
सौदीसह चार देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले
दहशतवादाला खतपाणी घालून आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप करत बहारिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्त या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडत असल्याचे जाहीर केले आहे.
यानुसार कतारशी जमीन, हवाई आणि समुद्रीमार्गे होणारा संपर्क तोडण्यात आला आहे. तसेच कतारच्या मुत्सद्यांना हे चारही देश आपल्याकडून काढून टाकणार आहेत.
सौदी अरेबियाच्या कतारमधील नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
दहशतवाद आणि अतिरेक्यांना रोखण्यासाठी ही कृती आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण सौदी अरेबियाकडून देण्यात आले.
इजिप्तने कतार हा दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा आरोप केला. यूएईनेही कतारमुळे आखाती परिसरात अस्थिरता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
तर बहारिनने कतार व इराण आमच्या देशात घातपाती कारवाया करणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असणे असे आरोप कतारवर ठेवण्यात आले आहेत.
कतार हा देश नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कतारमध्ये १०,००० सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा