चालू घडामोडी : २९ जून

इस्त्रोच्या जीसॅट १७चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) २९ जून रोजी अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह ‘जीसॅट १७’चे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले.
  • फ्रेंच प्रक्षेपक एरियन ५ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. एरियनच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला हा २१वा भारतीय उपग्रह आहे.
  • जीसॅट १७ या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. या उपग्रहाची आयुर्मर्यादा १५ वर्षांची आहे.
  • हवामानाविषयीची माहिती, शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे.
  • जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोने जीएसएलव्ही मार्क ३च्या साह्याने जीसॅट १९ हा उपग्रह अंतराळात पाठवला होता.
  • या यशस्वी प्रक्षेपणानंतर गेल्या आठवड्यात इस्रोने ३१ नॅनो उपग्रह अंतराळात पाठवले होते. यामध्ये इतर १४ देशांच्या २९ उपग्रहंचाही समावेश होता.
  • इस्रोने गेल्या काही वर्षांत केलेल्या असामान्य प्रगतीमुळे अवकाश संशोधन व उपग्रह सेवा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे.
  • भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून इस्रोचे हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे.

एअर इंडियाच्या खासगीकरणला तत्त्वत: मान्यता

  • कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला (खासगीकरण) केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
  • त्यानुसार एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी गट स्थापन करण्यात येईल. या गटाकडून हिस्सेदारीच्या विक्रीसंदर्भातील रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येतील.
  • एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय ४ हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे.
  • गेल्या १० वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २०१५-१६ मध्येच १०५ कोटींचा नफा झाला होता.
  • गेल्या १० वर्षांत भारताच्या एअरलाईन क्षेत्रात एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
  • केंद्र सरकारकडून एअर इंडियासाठी आत्तापर्यंत ३० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
  • यातील २४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देऊनही एअर इंडियाची घसरण सुरुच आहे.

आयपीएस महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेकडून सन्मान

  • तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन गौरव केला आहे.
  • महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.
  • महेश भागवत हे गेल्या १३ वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या १३ वर्षांमध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणात त्यांनी त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केले.
  • यावेळी तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसेच सिंगापूर येथील केंद्रावरही त्यांनी कारवाई केली आहे.
  • ही कारवाई करताना भागवत अडथळ्यांना, विरोधकांना, जीवघेण्या धमक्यांना न घाबरता आपले कार्य करत राहिले.
  • त्यांनी आतापर्यंत शेकडो पीडितांची अन्य सरकारी विभाग आणि नागरी संस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका केली आहे. तसेच त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होईल याची काळजीही घेतली आहे.
  • या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तकेही भारत सरकारचे गृह मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रातर्फे प्रसिद्ध झाली आहेत.

रॅम सायकल रॅलीत भारतीयांचा विक्रम

  • जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेली रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) ही रॅली पूर्ण करत नाशिकचे रहिवासी श्रीनिवास गोकुळनाथ यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
  • नाशिकचेच डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील आणि डॉ. संदीप शेवाळे व मुंबईच्या पंकज मार्लेशा यांच्या सह्याद्री ग्रुपने सांघिक गट स्पर्धेत यश मिळवले.
  • यामध्ये सांघिक गटात सह्याद्री ग्रुपने नववे, तर वैयक्तिक गटात लेफ्टनंट कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी ७वे स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारे गोकुलनाथ पहिले भारतीय ठरले आहेत. 
  • अत्यंत खडतर समजली जाणारी ही स्पर्धा अमेरीका खंडातील पश्चिम टोकापासून सुरू होवून पूर्वेच्या टोकाला संपते.
  • हे ४ हजार ८०० किलोमीटर अंतर पार करताना १२ राज्यातून प्रवास होतो. यात तीन पर्वतरांगा, दोन वाळवंट व चार नद्या येतात.
  • १ लाख ७० हजार फूट उंच इतकी चढाई करावी लागत असल्याने ही स्पर्धा पूर्ण करणेही आव्हानात्मक आहे.
  • यापूर्वी २०१५मध्ये नाशिकच्या डॉ. हितेंद्र आणि महिंद्र महाजन या बंधूंनी ही स्पर्धा पूर्ण करण्याची किमया साधली होती.  

व्हिजन-२०२० इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. ताराप्रसाद दास

  • नेत्ररोग व नेत्रदानाबाबत जनजागृती करणाऱ्या व्हिजन-२०२० इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदी ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. ताराप्रसाद दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जगात २८.५ कोटी लोकांना दृष्टिरोग आहेत. त्यात ३.९ कोटी लोक अंध असून भारतात त्यांची संख्या १.५ कोटी आहे.
  • यातील अंधत्वाच्या बऱ्याच घटना या टाळता येण्यासारख्या असतानाही अंधत्वाचे प्रमाण वाढते आहे.
  • त्यामुळे दृष्टिदोष किंवा नेत्ररोगांचे भारतातील प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने व्हिजन-२०२० या मोहिमेची आखणी केली आहे.
  • हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या नेत्ररोग प्रतिबंधक धोरणांचा एक भाग आहे. सध्या ही संस्था देशभरात राज्य सरकारे, रुग्णालये, नेत्र उपचार केंद्रे यांच्या माध्यमातून काम करीत आहे.
  • या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. दास हे निष्णात नेत्ररोगतज्ज्ञ असून, त्यांना या रोगांच्या प्रतिबंधासाठीच्या धोरणात्मक बाबींचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव आहे.
  • ते आग्नेय आशियाच्या अंधत्व प्रतिबंध संस्थेचे अध्यक्ष व एल व्ही प्रसाद नेत्र संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
  • दास यांनी नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून नैपुण्य साध्य केले असून दृष्टिपटलाशी (रेटिना) संबंधित रोगांचे ते तज्ज्ञ आहेत.
  • सध्या ते चीनमधील ग्वांगझूच्या सनयत सेन वैद्यक विद्यापीठात नेत्ररोगशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
  • त्यांनी संबळपूर विद्यापीठातून एमबीबीएस पदवी, कानपूर विद्यापीठातून डीओएमएस म्हणजे नेत्रवैद्यकातील पदविका घेतली. त्यानंतर मदुराईच्या कामराज विद्यापीठातून ते नेत्ररोगशास्त्रात एमएस झाले.
  • ग्लासगो येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे ते फेलो आहेत. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचेही ते फेलो आहेत.
  • त्यांना रावेनशॉ विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी दिली आहे. भारत सरकारने त्यांना २०१३मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरवले होते.

अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण जाहीर

  • अमेरिकेने सहा मुस्लिमबहूल राष्ट्रांमधील निर्वासितांसाठी आता नवीन व्हिसा धोरण जाहीर केले आहे.
  • अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ मुस्लिम राष्ट्रांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासनाने हे नवीन धोरण जाहीर केले आहे.
  • त्यानुसार सहा मुस्लिमबहूल देशांतील नागरिकांना आता अमेरिकेशी जवळचे कौटुंबिक आणि व्यापारी संबंध असल्यावरच व्हिसा मिळणार आहे. 
  • या सहा प्रतिबंधित देशांमधील नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करताना अमेरिकेत राहणारे पालक, पती, मुलगा, मोठी मुलगी किंवा मुलगा, जावई, सून किंवा भाऊ-बहिणींसोबतचे नाते सिद्ध करावे लागणार आहे.
  • आजी- आजोबा, नातू, काकू, काका, पुतणी, भाचा, होणारी पत्नी हे जवळच्या नातेवाईकांमध्ये येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
  • कौटुंबिक नात्यासोबतच अमेरिकेसोबत व्यापारी संबंध असलेल्यांना व्हिसा मिळू शकणार आहे.
पार्श्वभूमी
  • काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेन या ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती.
  • या देशांमधील निर्वासितांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. अमेरिकेतील विविध न्यायालयांनी या आदेशाविरोधात निकाल दिला होता.
  • शेवटी हे प्रकरण अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने या आदेशाची अंशत: अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली.

बंडखोर विचारवंत लिऊ क्षियाओबो यांची कैदेतून सुटका

  • चीनमधील साम्यवादी विचारांविरोधात लढणारे नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक, लेखक, विचारवंत लिऊ क्षियाओबो यांची कैदेतून सुटका झाली आहे.
  • सरकारविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून त्यांना १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.
  • यकृताच्या कर्करोगाने त्यांना विळखा घातल्याचे उघड झाल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले.
  • बीजिंग विद्यापीठात प्राध्यापक असलेले क्षियाओबो हे विद्यार्थ्यांबरोबरच युवा पिढीतही कमालीचे लोकप्रिय आहेत.
  • १९८९मध्ये त्यांनी बीजिंगसह विविध शहरांमध्ये चिनी सरकारच्या दडपशाही विरोधात उठाव केला.
  • या उठावातील सहभागाबद्दल त्यांच्यावर खटला भरून त्यांना २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • सुटका झाल्यानंतर त्यांनी चीनमध्ये राजकीय खुलेपणा यावा या उद्देशाने त्यांनी ‘चार्टर एट’ या नावाने आपल्या मागण्यांची एक याचिका तयार केली. त्यावर देशातील अनेक विद्वान, विचारवंतांबरोबरच शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवल्या.
  • त्यांच्या या मोहिमेला यश येण्याऐवजी सरकारविरोधात युद्ध पुकारल्याचा ठपका ठेवून थेट १५ वर्षे तुरुंगात त्यांची रवानगी झाली.
  • २०१०साली चीनमधील मूलभूत मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने प्रदीर्घ लढा दिल्याबद्दल क्षियाओबो यांना प्रतिष्ठेचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.
  • मध्यंतरीच्या काळात त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली. चीनमधील राजवटीची टीकात्मक चिकित्सा करणारे ‘अ नेशन दॅट लाइज टू कन्सायन्स’ हे तैवानमध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक खूप गाजले.
  • चार महिन्यांपूर्वी क्षियाओबो यांना कर्करोगाने ग्रासल्याचे उघड झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्यासाठी दबाव वाढत गेला.
  • डॉक्टरांनीही त्यांना केमोथेरपीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची अखेर सुटका करण्यात आली.

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला दुसरा क्रमांक

  • भारतीय संघाच्या नेमबाजी पथकाने जर्मनीमध्ये सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.
  • ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह भारताने पदतालिकेत दुसरा तर ८ सुवर्णपदकांसह १९ पदके जिंकून चीनने पहिला क्रमांक मिळवला आहे.
  • तरुणांच्या २५ मिटर पिस्तुल प्रकारात भारतीय संघाने सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली.
  • भारताच्या पथकात अनिश भानवालाने अखेरच्या दिवसात केलेली कामगिरी भारताला दुसरे स्थान मिळवण्यात फायदेशीर ठरली.
  • अनिशने या स्पर्धेत प्रत्येकी १ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. तसेच अनिशने सांघिक प्रकारातही भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा