चालू घडामोडी : ११ जून
महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता
१० जूनपासून महाराष्ट्रातल्या अल्प भूधारक व मध्य भुधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या कर्जमाफीमुळे राज्यातल्या अल्प भूधारक व मध्य भुधारक शेतकऱ्यांना ११ जूनपासून नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
याशिवाय आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपैकी ज्यांच्याकडे मुद्देमाल आढळला असे वगळून बाकीच्यांवरचे गुन्हेदेखील मागे घेण्यात येणार आहेत.
सरकारने कर्जमाफीची मुख्य मागणी मान्य केल्याने शेतकरी आंदोलनाची सांगता झाली आहे.
त्यामुळे ११ जूनपासून होणाऱ्या आंदोलनाला २५ जुलैपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. १३ जुलैचे धरणे आंदोलन व रेल रोकोदेखील स्थगित केले आहे.
मात्र २५ जुलैपर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास २६ जुलैपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत २५ जुलैपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आणि सुकाणू समितीचे प्रतिनिधी निर्णय घेणार आहेत.
२५ जुलैपर्यंत सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची एक यादी तयार करतील.
ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे.
तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी मुख्यमंत्री आणि सुकाणू समितीचे सदस्य पंतप्रधानांना भेटणार आहेत.
पार्श्वभूमी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगरमधील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
शेतमालाला हमीभाव मिळावा.
दुधाचा दर वाढवावा.
स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी.
त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांची याला साथ मिळून आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले होते.
भाजीपाला आणि दुधाची आवक घटल्याने शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती.
शेतकऱ्यांच्या एका गटाशी चर्चा करून शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र त्याला अन्य शेतकरी संघटनांनी विरोध केला होता.
अखेर सर्व शेतकरी संघटनांनी नाशिक येथे एक बैठक घेऊन आंदोलनाचे सारथ्य करण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली होती.
शेवटी सुकाणू समितीचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारचा मंत्रिगट यांच्यात झालेल्या बैठकीनंतर सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे प्रतिनिधी: शेतकरी नेत्यांमध्ये रघूनाथ पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील, डाँ. अजित नवले, आमदार जयंत पाटील
राफेल नदालला फ्रेंच ओपनचे विक्रमी दहावे विजेतेपद
स्पेनच्या राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ असा पराभव करत खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
या विजयासह फ्रेंच खुल्या टेनिस पुरुष ऐकेरी स्पर्धेचे विजेतेपद दहावेळा मिळवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
२२व्या ग्रॅण्डस्लम स्पर्धेत उतरलेल्या नदालने तिसऱ्यांदा एकही सेट न गमवता विजेता होण्याचा विक्रमदेखील केला.
याआधी नदालने २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४ असे एकूण नऊ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
यंदाचे हे दहावे विजेतेपद मिळवत नदाल दहावेळा फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.
तर महिला एकेरीमध्ये मार्गारेट कोर्ट यांनी ११ वेळा फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रम केला होता.
क्ले कोर्टवरचा बादशाह म्हणून प्रसिध्द असलेल्या नदालचे हे कारकिर्दीतील एकूण १५वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे.
जेलेना ओस्टापेंकोला पदार्पणात ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद
लाटिव्हियाची बिगरमानांकित जेलेना ओस्टापेंको ने वेगवान सर्व्हिसचा अप्रतिम नमुना सादर करीत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.
ओस्टापेंकोने तिसऱ्या मानांकित रूमानियाच्या सिमोना हालेपवर ४-६, ६-४, ६-३ असा विजय नोंदवित फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले.
फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली बिगरमानांकित तसेच सर्वांत कमी रँकिंग असलेली खेळाडू ठरली आहे.
२० वर्षीय ओस्टापेन्कोने १९९७नंतर (इव्हा मायोलीनंतर) या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी सर्वांत तरुण खेळाडू म्हणूनही मान मिळविला.
याशिवाय पदार्पणात ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मान ही ब्राझिलच्या गुस्ताव्हो कुएर्टेन (१९९७)नंतर ओस्टोपेंकोला मिळाला आहे.
ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी ती लॅटिव्हियाची पहिलीच खेळाडू ठरली. तिचे हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा