आयर्लंडमधील सत्ताधारी फाईन गेल पार्टीने आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर यांची केली आहे.
आयर्लंडमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिओ हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. लिओ यांनी ७३ पैकी ५१ मते मिळवत सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.
लियो वराडकर हे डॉक्टर असून, समलैंगिकतेचा पुरस्कार करणारे ते सरकारमधील पहिले मंत्री आहेत.
लियो वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे मूळचे मुंबईचे आहेत, तर आई मिरियम या आयर्लंडच्या आहेत. वराडकर यांचे कुटुंब मूळ मालवण तालुक्यातील वराड गावचे आहे.
वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केले होते. २७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. २०१५मध्ये वराडकर हे समलैंगिक व्यक्ती म्हणून पुढे आले होते.
त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवले. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.
समलिंगी राष्ट्राध्यक्ष निवडून देणारा आयर्लंड हा चौथा देश ठरला आहे. या आधी बेल्जियम, आइसलँड आणि लक्जमबर्गच्या राष्ट्राध्यक्षपदी समलिंगी व्यक्तीची निवड झाली आहे.
जीएसटीच्या प्रलंबित नियमांना मान्यता
वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा १ जुलैपासून लागू करण्यास सर्व राज्यांनी संमती दिल्यानंतर, अवस्थांतरातील तरतुदी आणि कर विवरण यांच्यासह प्रलंबित नियमांना जीएसटी परिषदेने मान्यता दिली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची १५वी बैठक ३ जून रोजी झाली.
त्यानुसार, सोन्यावर ३ टक्के, ५०० रुपयांखालील पादत्राणांवर ५ टक्के आणि बिस्किटांवर १८ टक्के कर लागू होणार आहे.
याशिवाय तयार कपडय़ांवर १२ टक्के, सौरऊर्जा पॅनेलवर ५ टक्के तर कच्च्या हिऱ्यावर ०.२५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
कपडे आणि पादत्राणांवरील करात मोठी सूट देण्यात आली असून, सामान्य जनांकडून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर कमी कर आकारण्यात येणार आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर विडी मात्र महागण्याचे संकेत आहेत. तेंदूपत्ता आणि विडीवर अनुक्रमे १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
परिषदेची ११ जूनला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जीएसटी लागू करण्यासाठी सर्व सज्जतेचा आढावा घेण्यात येईल.
जीएसटी परिषदेने गेल्या महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवा ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांच्या कररचनेत बसवल्या आहेत.
जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी करसुधारणा आहे. वस्तू आणि सेवांवरील विविध राज्यांचे आणि केंद्रीय कर एकत्र करुन एकसमान करआकारणी हे जीएसटीचे मुख्य उद्दिष्टय आहे.
जीएसटीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. येत्या १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
आरोग्य, शिक्षण आणि विनाएसी रेल्वेप्रवास जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे. अन्नधान्य, डाळी, दूध हे पदार्थ सुद्धा जीएसटीमधून वगळण्यात आले आहेत.
बी साई प्रणितला थायलंड ओपनचे विजेतेपद
भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणित याने थायलंड येथे झालेल्या पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
अंतिम फेरीत त्याने इंडोनेशियाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टी याला १७-२१, २१-१८, २१-१९ अशा फरकाने पराभूत केले.
याच्या आधीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणित याने थायलंडचा खेळाडू कांटाफोन वांगचारोएन याला हरविले.
साई प्रणित याने २०१६च्या कॅनडा ओपन ग्रॅंड प्रीक्समध्येही विजय मिळवला होता. यंदाच्या वर्षातील साईचे हे तिसरे विजेतेपद ठरले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या सलामवीरांचा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्माने शानदार शतकी भागिदारी रचत संघाला दमदार सुरुवात करुन दिली.
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत तीन शतकी भागिदाऱ्यांची नोंद करणारी पहिली जोडी होण्याचा मान शिखर आणि रोहितने पटकावला आहे.
रोहित-धवनने १४७ चेंडूंमध्ये १३६ धावांची भागिदारी रचत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला.
आजच्या सामन्यापूर्वी रोहित आणि धवनने २०१३मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन वेळा शतकी भागिदारी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा