राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
या योजनेंतर्गत ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यात येईल.
अणवस्त्रसज्ज पृथ्वी-२ची यशस्वी चाचणी
भारताकडून ३ जून रोजी स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्रसज्ज पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
ही चाचणी ओदिशातील चंदिपूर येथील भारतीय लष्कराच्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) मोबाईल लाँचरच्या सहाय्याने पार पडली.
पृथ्वी-२ जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.
पृथ्वी-२ या क्षेपणास्त्रात द्रव इंधन असणाऱ्या दोन इंजिनांचा (लिक्विड प्रोपल्शन) वापर करण्यात आला आहे.
पृथ्वी-२ मध्ये ५०० ते १००० किलो अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. याशिवाय, लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रात दिशादर्शन प्रणालीही आहे.
क्षेपणास्त्राचा मार्ग संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे रडार, विद्युत प्रकाशीय मागोवा यंत्रणा, दूरसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने निश्चित करण्यात आला होता.
पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३मध्ये भारताच्या लष्करी दलांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते.
पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यापूर्वीची उपयोजित चाचणी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ओदिशातील याच चाचणी क्षेत्रातून घेण्यात आली होती.
अमेरिका पॅरिस हवामान करारातून बाहेर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
यामुळे आता अमेरिका जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा भाग असणार नाही.
ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी घोषणा देत पॅरिस करारातून बाहेर पडल्याचे आश्वासन दिले होते.
पॅरिस करार म्हणजे अमेरिकेसाठी एक प्रकारची शिक्षा होती. या करारामुळे ऊर्जा स्त्रोतांवर निर्बंध आले होते. अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग खुंटला होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
हा करार म्हणजे अमेरिकेला आर्थिकदृष्टया कमकुवत करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे असे त्यांचे म्हणणे होते.
जागतिक हवामानातील बदलांच्या आधारे कृती करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी २०१५मध्ये झालेल्या पॅरिस करारावर जगातील १९५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्याने हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर गंभीर परिणाम होणार आहेत.
सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळ यान ३१ जुलै २०१८ रोजी रवाना करण्याची घोषणा ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केली आहे.
ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती २०२५मध्ये संपेल. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल एवढे जवळ जाईल.
२,५५० फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी ४.३० लाख किमी वेगाने सूर्याच्या २४ प्रदक्षिणा करत सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल.
सुमारे १० फूट उंचीचे हे यान वितळून जाऊ नये यासाठी बाह्यभागावर एका विशिष्ट कार्बनी संयुगाचा पाच इंच जाडीचा मुलामा केलेला असेल.
मानवाने सहा दशकांपूर्वी अंतराळ संशोधनास सुरुवात केली तेव्हापासून सूर्याला गवसणी घालून त्याची रहस्ये उलगडणे हे त्याचे अंतिम उद्दिष्ट राहिले आहे.
‘नासा’ने याआधी पाठविलेल्या काही यानांनी याहूनही दूरवरचा प्रवास केलेला आहे. १९७७मध्ये ‘व्हॉयेजर-१’ हे यान ११.७ अब्ज मैलांचा प्रवास करून आपल्या सूर्यमालेच्या पार बाहेर निघून गेले.
सन २०१५मध्ये प्ल्युटो ग्रहाच्या जवळून गेलेले ‘दि न्यू होरायझन प्रोब’ या यानाने आत्तापर्यंत ३.५ अब्ज मैलांचा प्रवास केला असून ते अद्याप थांबलेले नाही.
थेठ सूर्यावर यान उतरविणे शक्य नसल्याने त्याच्या शक्य तेवढया जवळ जाऊन हे काम करणारे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे पहिले यान असणार आहे.
संपूर्ण ग्रहमालेस व्यापून टाकणाऱ्या सौरवाऱ्यांचा वैज्ञानिक सिद्धान्त ६० वर्षांपूर्वी मांडणारे थोर खगोलभौतिकी शास्त्रज्ञ प्रा. युजिन पार्कर यांच्या सन्मानार्थ या मोहिमेस ‘पार्कर सोलर प्रोब’ नाव देण्यात आले आहे.
‘नासा’ने त्यांच्या कोणत्याही अंतराळ यानास कोणाही जिवंत व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा