इस्रोने २३ जून रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही-सी३८ या प्रक्षेपकाद्वारे ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
एकाचवेळी ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्त्रोने पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
यापूर्वी इस्त्रोने जून २०१५मध्ये २३ उपग्रह तर फेब्रुवारी २०१७मध्ये महिन्यात १०४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४०वे उड्डाण होते. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांमध्ये भारताचे २ आणि इतर १४ देशांचे २९ नॅनो उपग्रह आहेत.
या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसेट-२ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे.
याशिवाय कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला आहे. शेती पीक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल.
कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे वजन ७१२ किलो, तर प्रक्षेपित करण्यात आलेल्या इतर ३० उपग्रहांचे वजन २४३ किलो आहे.
या देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले:- ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका
इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार
न्या. दलवीर भंडारी
नेदरलॅण्ड्समधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे.
तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी भंडारी यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी १५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते.
दलवीर बंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ रोजी राजस्थानमध्ये झाला. जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानवशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली.
अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांनी शिकागो येथेही काही काळ वकिली केली.
अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली.
१९७७ साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. नंतर १९९१साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची १९ जून २०१२ रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली.
२००७साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.
दलवीर भंडारी यांच्या अनेक महत्वाच्या निर्णयांमुळे देशाच्या अनेक क्षेत्रांत बदल घडून आला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत २०१४साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
कर्नाटकामधील टुमकूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज, तर कोटा येथील वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी बहाल केली आहे.
पुणे महानगरपालिका कर्जरोखे सूचीबद्ध
पुणे महानगरपालिका कर्जरोख्यांची २२ जून रोजी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली आहे.
या माध्यमातून पुणे शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी महानगर पालिकेने २०० कोटी रुपये उभारणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
वार्षिक ७.५९ टक्के दराने १० वर्षांचे रोखे याद्वारे उभारले गेले आहेत. याकरिता रोख्यांना सहापट प्रतिसाद मिळाला.
भारतीय कर्जरोखे आणि नियामक मंडळ अर्थात सेबीने महानगरपालिका अधिनियम २०१५द्वारे चालू केलेल्या कर्जरोख्यांची सूची संदर्भातील ही पहिली प्रक्रिया आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वर्षभरात १० शहरांनी ही प्रक्रिया राबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
या व्यतिरिक्त केंद्र सरकारने एकूण कर्ज रोख्यांच्या आकारावर आधारित २ टक्के व्याज अनुदान देण्याचे सुचविले होते.
पुणे महानगरपालिकेने आगामी कालावधीतही याच माध्यमातून २,२६४ कोटी रुपये उभारण्याचा संकल्प केला आहे.
महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वा क्रमांक
मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते.
यावर्षीच्या सर्वेक्षणात जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईला ५७वे स्थान मिळाले आहे. २०१६साली मुंबईचा याबाबत ८२वा क्रमांक होता.
अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे.
ल्युएण्डा या शहरानंतर अनुक्रमे हाँगकाँग, टोकियो, झ्युरिच, सिंगापूर ही जगभरातील महागडी शहरे आहेत.
याशिवाय सेऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या १०मध्ये समावेश आहे.
तर टय़ुनिस (२०९वे स्थान), बिशकेक (२०८वे स्थान) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
भारताचा विचार केल्यास नवी दिल्ली ९९व्या, चेन्नई १३५व्या, बेंगळूरु १६६व्या आणि कोलकाता १८४व्या स्थानावर आहे.
कोलकात्यात भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो
कोलकत्यातील हुगळी नदीखाली सुरु असलेल्या अंडरवॉटर बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावणार आहे.
देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून, या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोद्वारे जोडण्यात येणार आहे.
कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बांधकाम केले आहे. १९८४मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे.
हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी ८० किमी असेल.
या मार्गावर मेट्रो १०.६ किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी ५२० मीटर इतकी आहे.
नदीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्यासाठी ६० कोटी खर्च करण्यात आले आहेत.
आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा
आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व आणि कसोटी संघांचा दर्जा देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.
त्यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता १२ होणार आहे. यापूर्वी २०००साली बांगलादेश कसोटी संघाचा दर्जा प्राप्त करणारा १०वा देश ठरला होता.
अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश आहे. तर आयर्लंड कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा