चालू घडामोडी : २८ जून
अमेरिका भारताला गार्डियन ड्रोन देणार
- अमेरिकेने भारताशी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे ठरवले असून, टेहळणीसाठी भारताला गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी दिली आहे.
- गार्डियन ड्रोन विमाने मानवरहित असून, ती २७ तास आकाशात राहू शकतात व ५०,००० फूट उंचीवरून उडू शकतात.
- भारताच्या सागरी सुरक्षेला मजबुती देण्यासाठी गार्डियन ड्रोन उपयोगी पडणार आहेत. भारतीय नौदलाची गुप्तचर, टेहळणी क्षमता यामुळे वाढणार आहे.
- हा करार दोन ते तीन अब्ज डॉलर्सचा असून, त्यानुसार २२ गार्डियन ड्रोन अमेरिका भारताला देणार आहे.
- याशिवाय अमेरिकेने एफ १६ व एफए १८ विमाने भारताला विकण्याची तयारी दर्शवली आहे.
- तसेच अमेरिका व भारत वज्र प्रहार, रेड फ्लॅग युद्ध अभ्यास या कवायतीत एकत्र सहभागी होणार आहेत.
राजधानी आणि शताब्दी गाड्यांसाठी प्रोजेक्ट सुवर्ण
- राजधानी आणि शताब्दी या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
- येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ‘प्रोजेक्ट सुवर्ण’अंतर्गत अशा प्रकारच्या १५ राजधानी आणि १५ शताब्दी गाड्यांमध्ये या सुधारणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- प्रवाशांना भोजन पुरविण्यासाठी ट्रॉली, गणवेशधारी नम्र कर्मचारी आणि करमणुकीची साधने, असे बदल तीन महिन्यांसाठी केले जाणार आहेत.
- या वेगवान गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, हा ‘प्रोजेक्ट सुवर्ण’चा उद्देश आहे. यासाठी रेल्वेला २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
- यारोबरच डब्यांमधील स्वच्छतेवरही मोठा भर दिला जाणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.
- याशिवाय रेल्वेमधील सुरक्षा व्यवस्थाही वाढविली जाणार असून, त्यासाठी रेल्वे पोलिस दलाला सज्ज राहण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने केल्या आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या आखणीसाठी कस्तुरीरंगन समिती
- नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी संचालक के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली आहे.
- शिक्षणातील विविध क्षेत्रांतील नऊ तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश केला आहे. हे तज्ज्ञ विविध राज्यांमधील असल्याने विविधताही जपली गेली आहे.
- शिवाय, या तज्ज्ञांचा वयोगटही वेगवेगळा असल्याने अनुभव आणि धडाडी यांचा संगम या समितीमध्ये झाला आहे.
- या विविधतेमुळेच शैक्षणिक धोरण आखताना विविध दृष्टिकोनांवर चर्चा होऊन शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
- या समितीतील इतर सदस्य
- माजी सनदी अधिकारी के के अल्फोन्स कानमथानम
- मध्य प्रदेशमधील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू रामशंकर कुरील
- कर्नाटक राज्य शोध परिषदेचे माजी सचिव डॉ. एम के श्रीधर
- भाषा कौशल्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. टी व्ही कट्टीमनी
- गुवाहाटी विद्यापीठात पर्शियन भाषेचे प्राध्यापक असलेले डॉ. मझहर असीफ
- उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक कृष्णमोहन त्रिपाठी
- प्रिन्स्टन विद्यापीठातील गणितज्ञ मंजुळ भार्गव
- मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत
एमपीएससीकडूनही आधार क्रमांक बंधनकारक
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक भरणे अनिवार्य केले आहे.
- त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना प्रोफाईल तयार करताना आधार क्रमांकाचा आधार घ्यावा लागेल.
- ज्या उमेदवारांची प्रोफाईल तयार आहे, त्यांना आयोगाच्या नियमानुसार त्वरित त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात.
- प्रोफाईलच्या माध्यमातून अतिरिक्त महत्त्वाची माहिती उमेदवारांकडून प्राप्त करण्याचा आयोगाचा विचार आहे.
- निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांची ओळख पटण्यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन प्रोफाईलमध्ये त्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याच्या निर्णय आयोगाने घेतला.
- त्यामुळे ज्या उमेदवारांकडे आधार कार्ड नाही. त्यांनी त्वरित आधार कार्ड काढावे असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले.
- आधार कार्ड क्रमांक नसल्यास उमेदवारांना आयोगाच्या कार्यालयासमोर आपली ओळख निश्चित करून देणे बंधनकारक राहणार आहे.
‘पेट्या’ रॅन्समवेअरचा भारतासह अनेक देशांवर हल्ला
- गेल्या महिन्यातील सायबर हल्यानंतर २७ जून रोजी ‘पेट्या’ नावाच्या रॅन्समवेअर व्हायरसने युरोपसह जगभरातील देशांना लक्ष्य केले.
- रशिया, फ्रान्स. स्पेन आणि युरोपमधील अन्य देशांमधील ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, ऑईल आणि गॅस कंपन्या या सायबर हल्ल्यांमधील प्रमुख लक्ष्य ठरल्या.
- युक्रेनला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे सरकारी विभाग, वीज कंपन्या, विमानतळ आणि बँकांमधील कॉम्प्यूटर बंद पडले.
- भारतालाही या हल्ल्याची झळ बसली असून, यामुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथील ऑनलाईन कामकाज ठप्प पडले.
- गेल्या महिन्यात जगातील सुमारे १५० देशांना वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसचा फटका बसला होता. पिटरॅप (पेट्या) हे वान्नाक्राय या व्हायरसचे नवीन व्हर्जन असल्याचा अंदाज आहे.
- रॅन्समवेअर हा मालवेअरचा एक प्रकार असून यामुळे कॉम्युटरमधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो.
- रॅन्समवेअरच्या मदतीने हॅक केलेला कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी समिती स्थापन
- न्यायाधीश आर एम लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
- माजी कर्णधार सौरभ गांगुली, अमिताभ चौधरी (समन्वयक सचिव), टी सी मॅथ्यू, ए भट्टाचार्य, जय शाह आणि अनिरुद्ध चौधरी (बीसीसीआय कोषाध्यक्ष) या सदस्यांचा समितीत समावेश आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींची योग्य आणि त्वरित अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
- यासाठी या समितीला १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर ही समिती आपला अहवाल बीसीसीआयकडे सदर करेल.
कौशिक बसू आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या अध्यक्षपदी
- भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांची २३ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाच्या (आयईए) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या पदावरील त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
- कॉर्नेल विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टडीज विभागात व्याख्याते म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
- आयईए जगभरातील व्यावसायिक अर्थतज्ज्ञांचे नेतृत्व करणारा आघाडीचा महासंघ असून, जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे व संशोधनाचे काम हा महासंघ करीत असतो.
- आयईएच्या माजी अध्यक्षांमध्ये नोबेलविजेते केनेथ अॅरो, रॉबर्ट सोलोव, अमर्त्य सेन आणि जोसेफ स्टिग्लिट्झ यांचा समावेश आहे.
- कौशिक बसू हे २००९ ते २०१२ या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.
- तसेच २०१२ ते २०१६ या दरम्यान त्यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला.
चीनची टाईप ०५५ युद्धनौका नौदलात दाखल
- चीनने टाईप ०५५ ही सर्वाधिक शक्तीशाली नवी युद्धनौका आपल्या नौदलाच्या ताफ्यात दाखल केली आहे.
- सुमारे १२ हजार टन वजन असलेल्या टाईप ०५५ युद्धनौकेची क्षमता भारताच्या १५ बी ‘आयएनएस विशाखापट्टणम’ या युद्धनौकेपेक्षा जास्त आहे.
- विशाखापट्टणम युद्धनौका अद्याप भारतीय नौदलात सहभागी झालेली नाही. मात्र आयएनएस विशाखापट्टणमची क्षमता टाईप ०५५ पेक्षा खूप कमी आहे.
- पूर्णपणे शस्त्रसज्ज करण्यात आल्यावर आयएनएस विशाखापट्टणमचे वजन ८,२०० टनांपर्यंत जाऊ शकते.
- जमिनीवरून हवेत मारा करु शकणारी, युद्धनौकाविरोधी आणि जमिनीवर मारा करणारी अशी एकूण ५० क्षेपणास्त्रे आयएनएस विशाखापट्टणमवर तैनात केली जाऊ शकतात.
- चीनच्या टाईप ०५५ या महाकाय युद्धनौकेवर जवळपास १२० क्षेपणास्त्रे तैनात करता येऊ शकतात.
- त्यामुळेच टाईप ०५५ चा समावेश जगातील सर्वाधिक धोकादायक असणाऱ्या युद्धनौकांमध्ये होणार आहे. चीनकडून अशा प्रकारच्या चार युद्धनौकांची उभारणी करण्यात येत आहे.
- टाईप ०५५ युद्धनौकेवर ऐरे रडार आहे. यामुळे समुद्र, जमीन आणि हवेतील लक्ष्य भेदण्यात महत्त्वाची मदत होणार आहे.
- टाईप ०५५ ही चीनची आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आहे. यामधील युद्ध व्यवस्थापन यंत्रणा अतिशय उच्च दर्जाची आहे.
- मार्च २०१४ पासून चीनने पाच टाईप ५२ डी युद्धनौका नौदलात सामील केल्या आहेत. या सर्व नौका शस्त्रसज्जतेत भारताच्या विशाखापट्टणम युद्धनौकेची बरोबरी करतात.
- भारत आयएनएस विशाखापट्टणमसारख्या अजून ७ युद्धनौकांची उभारणी करणार आहे. तर आयएनएस विशाखापट्टणम इतकी क्षमता असणाऱ्या १८ युद्धनौकांची निर्मिती चीनकडून केली जाणार आहे.
श्रीलंकेच्या लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी
- श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
- चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीलाही सामोरे जावे लागले.
- श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. मलिंगावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
- मलिंगावर एक वर्षांची बंदी घालताना त्याच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के दंडही वसूल करण्याचे आदेश मंडळाकडून देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा