भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या तपासासाठी ६ महिन्यांचा निश्चित कालावधी
केंद्र सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्धच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.
बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्मचारी प्रशिक्षण विभागाने केंद्रीय लोकसेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, १९६५ मध्ये बदल केले आहेत.
याअंतर्गत भ्रष्टाचाराच्या तपासाचे टप्पे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ निश्चित केला आहे. याआधी तपास पूर्ण करण्यासाठी कोणतीही मर्यादा नव्हती.
नव्या बदलांनुसार तपास समितीला ६ महिन्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी पूर्ण करावी लागेल आणि अहवाल सादर करावा लागेल.
नवा नियम अखिल भारतीय सेवा (भारतीय प्रशासकीय, पोलीस आणि वन सेवा) आणि काही अन्य विभागातील अधिकारी वगळता सर्वांना लागू असेल.
नेपाळच्या पंतप्रधानपदी शेर बहादूर देउबा
नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. देउबा हे नेपाळचे ४०वे पंतप्रधान आहेत.
५९३ खासदार असलेल्या नेपाळच्या संसदेत देउबा यांना ३८८ मते पडली असून त्यांच्याविरोधात १७० मते पडली. पंतप्रधानपदासाठी त्यांना किमान २९७ मतांची गरज होती.
गेल्या महिन्यात माओवादी नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नेपाळचे पंतप्रधानपद रिक्त झाले होते.
प्रचंड यांनी सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
देउबा हे चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी १९९५ ते ९७, २००१ ते ०२ आणि २००४ ते ०५ या कालावधीत ते नेपाळचे पंतप्रधान होते.
देउबा यांचा जन्म १३ जून १९४६ मध्ये झाला असून १९९४मध्ये त्यांची नेपाळी काँग्रेसचे संसदीय नेते म्हणून निवड झाली होती.
नेपाळमध्ये माओवादी नेते प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापन केली होती. यानुसार दोन्ही पक्षांना पंतप्रधानपदावर संधी मिळणार होती.
नेपाळमध्ये वीस वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका सुरु आहेत. १४ जून रोजी या निवडणुकीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे.
हा टप्पा पूर्ण होईपर्यंत दहल यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली होती.
ट्रायचे नवे माय कॉल अॅप
कॉल ड्रॉपची समसया कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) माय कॉल (My Call App) हे नवे अॅप सुरू केले आहे.
या अॅपवर यूजर्स आपल्या मोबाईल फोन कॉलला क्वालिटी रेटिंग देऊ शकतील. तसेच ही माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरणालाही देऊ शकतील.
या अॅपद्वारे मोबाईल फोन यूजर्सला आपल्या व्हाईस कॉलच्या गुणवत्तेबाबत त्याच वेळेस आपल्याला आलेला अनुभव ‘ट्राय’ला सांगता येणार आहे.
या माध्यमातून ग्राहकांना आलेले अनुभव, नेटवर्कची गुणवत्ता याबाबतची आकडेवारी जमा करण्यास ‘ट्राय’ला मदत मिळणार आहे.
हे अॅप डाऊनलोड केल्यास प्रत्येक कॉलनंतर युजरला पॉप-अप नोटिफिकेशन येईल. त्यात कॉलच्या गुणवत्तेबाबत आलेला अनुभव आणि त्याची माहिती देण्यासंबंधी विनंती करण्यात येईल.
यात यूजर्सला रेटिंगसह आवाज, आवाजातील अडथळा आणि कॉल ड्रॉपसारख्या समस्यांविषयीही अधिकची माहिती ट्रायला देता येणार आहे.
देशातील पहिले खासगी स्थानक मध्यप्रदेशमध्ये
भोपाळमधील हबीबगंज स्थानकाचा पब्लिक प्रायव्हेट, पार्टनरशिप म्हणजे पीपीपी मॉडेलवर आधारित विकास करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे तयार करण्यात येणारे हे देशामधले हे पहिले स्थानक असेल. प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयी या स्थानकावर उपलब्ध असतील.
या स्थानकाच्या देखभाल आणि सुविधांची बांधणी करण्याचा अधिकार भोपाळमधील बन्सल समुहाला आठ वर्षांच्या कराराने देण्यात आलेला आहे.
प्रवाशांसाठी सोयी बन्सल समुहाच्य़ा माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.
प्रवाशांसाठी विश्रांतीगृह, हॉटेल्स, स्टॉल्स, पार्किंग यांची निर्मिती आणि देखभाल बन्सल समूह करेल. परंतु रेल्वे, पार्सलसेवा, प्रवासी तिकीट ही सर्व कामे रेल्वेद्वारेच होतील.
पर्यावरणपूरक असे हे नवे स्थानक सौरऊर्जेवर चालवण्यात येईल. प्रवाशांसाठी सरकते जीवन, अंपंगासाठी मदतीसाठी सुविधा त्यामध्ये असतील.
धोकादायक प्रसंगी चार मिनिटांमध्ये संपूर्ण स्थानक रिकामे करता येईल आणि सहा मिनिटांमध्ये लोक सुरक्षित जागी पोहोचतील अशी व्यवस्थाही त्यामध्ये करण्यात येईल.
२००९साली अशा प्रकारची जागतिक दर्जाची स्थानके निर्माण करण्याची संकल्पना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा