‘टाइम मॅगझीन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘टाइम पर्सन ऑफ द इयर २०१६’ या पुरस्कारासाठी ऑनलाइन वाचकांनी मोदी यांच्या बाजूने कौल दिला आहे.
या नियतकालिकाचे संपादक ७ डिसेंबर रोजी ‘टाईम मॅगझीन पर्सन ऑफ द इअर’ची घोषणा करतील.
या पुरस्कारासाठी ऑनलाइन वाचकांकडून मागवण्यात आलेल्या मतदानानुसार मोदी यांना १८ टक्के मते मिळाली आहेत.
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच विकिलिक्सचे ज्युलियन असांजे यांना मोदींनी मागे टाकले आहे.
देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी चलन बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे सध्या मोदींच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली आहे.
टाईम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर चांगल्या किंवा वाईट प्रकारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते..
या पुरस्काराचे स्पर्धक म्हणून मोदी यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी २०१४मध्येही त्यांना ऑनलाइन वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली होती.
२०१५मध्ये पर्सन ऑफ द इयर चा खिताब जर्मन चान्सलर अँजेला मर्कल यांनी हा खिताब पटकावला होता.
ओ. पनीरसेल्वम तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री
जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आहे.
पनीरसेल्वम यापूर्वी दोनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००१मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.
त्यानंतर सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या काळात सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यावर कार्यभार पुन्हा पनीरसेल्वम यांच्याकडे आला.
या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला. खुर्चीवर जयललिता यांचा फोटो ठेवून त्याशेजारी नव्या खुर्चीवर बसून कारभार केला.
विराट कोहलीचे ट्विट ‘गोल्डन ट्विट ऑफ द इअर’
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माची पाठराखण करणारे केलेले ट्विट ‘गोल्डन ट्विट ऑफ द इअर’ ठरले आहे.
ट्विटर प्रत्येक वर्षी भारतातील एक ट्विट निवडते ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे.
टी-२० वर्ल्ड कपमधील भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील पराभवानंतर सोशल मीडियावर अनुष्काची खिल्ली उडवली जात होती.
यावरुन विराट कोहलीने संताप व्यक्त करत अनुष्काची बाजू घेत टीकाकारांना उत्तर दिले होते. त्याचे हे ट्विट ४० हजाराहून जास्त वेळा रिट्विट करण्यात आले.
इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंझी यांचा राजीनामा
इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंझी यांच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या योजनेस तेथील जनतेने सार्वमताच्या माध्यमामधून धुडकावून लावल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
माझा सरकार चालविण्याचा अनुभव येथे संपला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या प्रस्तावासाठी देशभरात सुमारे ७० टक्के मतदान झाले. या सार्वमतामध्ये ६० टक्के जनतेने रेंझी यांच्या योजनेस स्पष्ट नकार दर्शविला.
इटलीमधील केंद्रीय सरकार अधिक सशक्त करण्याचा रेंझी यांचा प्रयत्न होता. रेंझी यांना त्यांच्या पक्षामधीलही काही नेत्यांनी विरोध केला होता.
यामुळे पंतप्रधानंच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटली जाईल, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती.
रेंझी यांची घटलेली लोकप्रियता, देशातील रखडलेली अर्थव्यवस्था आणि आफ्रिकेमधून इटलीमध्ये येणारे हजारो स्थलांतरित हे मुद्दे सार्वमतामध्ये कळीचे ठरले.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटासाठी आधारसक्ती
ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ एप्रिल २०१७पासून सवलतीतील रेल्वे तिकीट काढताना, आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधार कार्ड’वर आधारित तिकीट यंत्रणा राबवण्याचा विचार केला असून, ती दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे.
यानुसार १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट काढताना ऐच्छिक स्वरूपात आपला आधार क्रमांक देता येईल. मात्र, १ एप्रिल २०१७ पासून तो बंधनकारक असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा