पोलादी नेत्या जे. जयललिता
खालील नोट्स PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी
MPSC Toppers App डाउनलोड करा.
अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता या ‘अम्मा’ म्हणून जनतेत लोकप्रिय होत्या.
प्रकृती अस्वस्थामुळे जयललिता २२ सप्टेंबरपासून चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होत्या. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने, दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या पथकासह लंडन येथील डॉक्टर रिचर्ड बेल यांनाही रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते.
मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर भारतीय राजकारणात गेली तीन दशके घोंगावणारे वादळ शांत झाले.
राजकारणापूर्वीचे आयुष्य
जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी पूर्वीच्या तामिळनाडूमधील पण सध्याच्या कर्नाटकमधील मेलूकोटे या गावात अय्यर कुटूंबात झाला.
त्या दोन वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटूंबाला गरिबीचे चटके सहन करावे लागले. नंतर जयललिता यांच्या आईने तामिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
दहावीच्या परीक्षेत त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत राज्य सरकारचा गोल्ड स्टेट अॅवॉर्ड मिळवला होता.
जयललिता यांनी चेन्नईच्या स्टेला मॉरिस कॉलेजातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविली. त्यांना वकील व्हायचे होते.
वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी एपिसल या इंग्रजी चित्रपटात मुख्य भुमिका साकारली आणि तिथून त्यांच्या सिने कारकिर्दीला सुरुवात झाली.
कन्नड, तमिल, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे ३०० चित्रपटात त्यांनी काम केले. ‘चिन्नाडा गोम्बे’ हा कन्नड भाषेतील त्यांचा पहिला चित्रपट होता.
तामिळ भाषेसह कन्नड, मल्याळम, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.
२० वर्षाच्या आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र त्यांचे नायक होते.
दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये स्कर्ट घालून काम करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
राजकीय कारकीर्द
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार मरुधुर गोपालन् रामचंद्रन (एमजीआर) हे जयललितांचे गुरू होते. एमजीआर यांच्याबरोबर देखील जयललिता यांनी काही चित्रपट केले आहेत.
१९८२मध्ये जयललिता यांनी एमजीआर यांच्या नेतृत्वाखालील अन्ना द्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर पक्षाच्या प्रचार सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली.
नंतर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या संसदीय राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८४ ते १९८९ दरम्यान त्या राज्यसभेवर निवडून गेल्या.
१९८४मध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रामचंद्रन यांनी त्यांना पक्षातील उपनेते पदावरुन काढून टाकले.
१९८७मध्ये रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वत:ला रामचंद्रन यांचे उत्तराधिकारी घोषित केले.
१९८९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत २७ जागा जिंकून जयललिता यांचा पक्ष विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला.
१९९१मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबरोबर युती करुन त्यांनी सरकार बनविले.
२४ जून १९९१ रोजी त्यांनी तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री व जानकी रामचंद्रन यांच्यानंतर दुसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळविला.
त्यानंतर १९९६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २००१मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या.
२०११मध्ये डीएमकेच्या एम करुणानिधी यांचा पराभव करत जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हापासून त्या मुख्यमंत्रीपदी कायम होत्या.
तमिळनाडूच्या गेल्या ३२ वर्षाच्या इतिहासात लागोपाठ दोन विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या.
मुख्यमंत्रीपद आणि वाद
जयललितांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त आणि धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार त्यांना लक्ष्य करण्यात येत होते.
संपत्तीवरून जयललिता वादात सापडल्या होत्या. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जयललिता यांची संपत्ती दुप्पट झाल्याचे समोर आले होते.
२०११मध्ये जयललिता यांची मालमत्ता ५१.४० कोटी रुपयांची होती. त्यात वाढ होऊन ती ११७.१३ कोटी रुपये झाली होती.
२०१४मध्ये वैध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडल्यामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले.
कोर्टाने त्यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली व जयललिता यांच्यावर निवडणूक लढवण्याची बंदी ही घालण्यात आली.
मात्र यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने जयललिता या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने एकहाती यश संपादन केले आणि त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या होत्या.
पुरस्कार व सन्मान
मद्रास विद्यापीठाने त्यांना १९९१मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यानंतर त्यांना अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
१९९७मध्ये त्यांच्या जीवानावर 'इरुवर' या तामिळ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यात ऐश्वर्या रायने जयललितांची भूमिका साकारली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा