भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक महिला (१८ वर्षांखालील) हॉकी स्पर्धेत कोरियाचा ३-० असा पराभव करून ब्रॉंझपदक जिंकले.
रितुने ४५व्या मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. त्यानंतर संगीताने ५५ आणि नंतर ५८व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय निश्चित केला.
कोरियन खेळाडूंनीदेखील चांगले प्रतिआक्रमण केले. त्यांनी अनेक पेनल्टी कॉर्नरदेखील मिळविले. पण, त्यापैकी एकही सार्थकी लागला नाही.
या उल्लेखनीय कामगिरीनंतर हॉकी इंडियाने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस एक लाख, तर सपोर्ट स्टाफला ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले.
बौद्धिक संपदा हक्क संरक्षण प्राधिकरणाची पुनर्रचना
राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरणांतर्गत सरकारने पीक वाण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची जपणूक यासाठी बौद्धिक संपदा हक्क संरक्षण प्राधिकरणाची पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे.
हे संरक्षण प्राधिकरण बौद्धिक संपदा अधिकारांच्या निकषांमध्ये सुधारणा करणे आणि संकरित वाणांमध्ये बौद्धिक संपदेचा वापर करणे यासाठी काम करेल.
त्याचप्रमाणे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था, राज्यांमधील कृषी विद्यापीठे, एनएसएआय (नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थांशीही प्राधिकरणाचे सहकार्य असेल.
सरकारने प्राधिकरणाला पालमपूर (हिमाचल प्रदेश), पुणे (महाराष्ट्र) आणि शिवमोगा (कर्नाटक) या तीन ठिकाणी शाखा कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
वनस्पतींच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे त्याचप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांचे संरक्षण यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाचे आहे.
लिबियाच्या विमानाचे अपहरण आणि सुटका
लिबियाच्या आफ्रिकिया एअरवेजच्या एअरबस ए३२० या विमानाचे दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण केले.
हे विमान १११ प्रवासी आणि ७ केबिन क्रू सदस्यांसह लिबियातील सेबावरुन त्रिपोली येथे निघाले होते.
हे अपहणकर्ते गद्दाफी समर्थक होते. त्यांनी हे विमान त्रिपोलीऐवजी हे माल्टा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविले होते.
आपली मागणी पूर्ण झाल्यास विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांची सुटका केली जाईल असे अपहरणकर्त्यांचे म्हणणे होते.
त्यानंतर या अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी यशस्वी झाल्याने सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.
अपहरणकर्त्यांशी माल्टामध्ये राजकीय आश्रयाची मागणी केली होती. पण माल्टा सरकारने ही मागणी अमान्य केल्यामुळे अपहरणकर्त्यांनी शरणागती पत्करली.
माल्टामध्ये विमान अपहरणाची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी १९८५मध्ये माल्टामध्ये इजिप्त एअर ७३७ हे अपह्रत विमान उतरवण्यात आले होते.
२४ तासांच्या हिंसक लढ्यानंतर या विमानातील प्रवाशांची सुटका झाली होती. या घटनेत ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
अल्लेप्पो शहरावर सीरियन लष्कराने पूर्ण नियंत्रण
वर्ष २०११मध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर सुमारेचार वर्षानंतर सीरियन लष्कराने अल्लेप्पो शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
सीरियातील अल्लेप्पो शहराला बंडखोरांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आल्याची घोषणा सीरियाच्या लष्कराकडून करण्यात आली.
याबरोबरच गेल्या एक महिन्यांपासून पूर्व अलेप्पोमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्षही संपुष्टात आला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ३ लाख १० हजार लोक मारले गेले आहेत.
सीरियन लष्कराने आतापर्यंत देशातील अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया या पाच प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा