भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २–१ ने पराभवाची धूळ चारूनज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
१५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता.
ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा हा अंतिम सामना लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारत आणि बेल्जियम या संघांमध्ये झाला.
८व्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि २२व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले.
बिपिन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख
भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे.
सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील.
मुळचे उत्तराखंडयेथील बिपिन रावत यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
त्यांनी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए)मधून पदवी मिळवली आहे. त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ किताब प्राप्त झालेला आहे.
१९७८मध्ये ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती.
रावत यांना उंचावरील लढायांचा आणि घुसखोरीविरोधी मोहिमांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी चीन व पाकिस्तान सीमेवरील भारतीय तुकड्यांचे नेतृत्व केले आहे.
रावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्कर प्रमुखपद दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
१९७२मध्ये इंदिरा गांधी सरकारने लेफ्टनंट जनरल पी. एस. भगत या ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्याऐवजी सॅम माणेकशॉ यांची नेमणूक केली होती.
तर, १९८३मध्ये लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्याऐवजी अरुणकुमार वैद्य यांच्यावर लष्करप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
‘रॉ’च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना
भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संघटना रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ)च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते १ जानेवारी २०१७ ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.
धस्माना हे १९८१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्याचे ‘रॉ’ प्रमुख राजेंद्र खन्ना यांची जागा घेतील.
ते मध्य प्रदेश केडरचे असून केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष सचिव होते. त्यांनी रॉमध्ये २३ वर्षे सेवा बजावली आहे.
आयबीच्या प्रमुखपदी राजीव जैन
देशांतर्गत गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या प्रमुखपदी केंद्र सरकारने राजीव जैन यांची नियुक्ती केली आहे.
ते १ जानेवारी २०१७ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.
राजीव जैन हे १९८०च्या बॅचचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या ‘आयबी’मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.
‘आयबी’चे प्रमुख दिनेश्वर शर्मा हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून, त्यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली मुदतवाढ नाकारली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये १०० टक्के आधार नोंदणी
नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ७२,५२,८८० जणांनी आधार नोंदणी केली आहे.
आधार नोंदणीची २०१५च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील एकूण ६ राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्ये ठरली आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये २४० कायमस्वरुपी आधार नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
या केंद्रामध्ये नव्याने आधार नोंदणीसह, पूर्वी नोंदणी केलेल्या आधारमध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
शरद पवार यांचा एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा
लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
तसेच राजकीय व्यक्तींना संघटेनेच्या अध्यक्षपदी राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन कालावधीसाठी पदाधिकारी होता येते.
शरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.
या शिफारशींनुसार शरद पवार एमसीएचे अध्यक्षपद भुषविण्यास अपात्र ठरतात. शरद पवारांचे वय ७६ वर्ष असून त्यांनी याआधी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे.
एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.
फ्रान्सिस चेकाचा विजेंदर सिंगकडून पराभव
भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा पराभव करत ‘आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट’चे अजिंक्यपद कायम राराखले आहे.
विजेंदरने याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्या कॅरी होप याचा पराभव करत हा किताब मिळवला होता.
एकूण १० फेऱ्यांच्या या सामन्यामध्ये विजेंदरने तिसऱ्याच फेरीत चेका याला निर्णायक ठोसा लगावत पराभूत केले.
सामन्याच्या सुरुवातीस चेका याने आक्रमक खेळ केला. मात्र विजेंदरने आश्वासक खेळ करत चेकाला वेगवान व नेमक्या ठोशांनी जेरीस आणले.
या सामन्यापूर्वी चेकाकडे ४३ व्यवसायिक सामन्यांचा अनुभव होता. त्यापैकी ३२ सामन्यात त्याने विजय मिळवला होता.
व्हेनेझुएलाचा नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला असून आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
व्हेनेझुएला सरकारने १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्वाधिक मूल्याची शंभर बोलिव्हरची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
बँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने १०० बोलिव्हरची नोट रद्द करून ५००, २००० आणि २०,००० बोलिव्हरची नवी नोट बाजारात आणली होती. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी फक्त ७२ तासांचा वेळ देण्यात आला होता.
देशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता.
व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून, सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा