चित्रा रामकृष्णा यांचा एनएसईच्या सीईओपदाचा राजीनामा
चित्रा रामकृष्णा यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला.
एनएसईचे वरिष्ठ कार्यकारी जे. रवीचंद्रन यांच्याकडे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्षपद सध्या माजी केंद्रीय अर्थ सचिव अशोक चावला यांच्याकडे आहे.
संचालक मंडळाने चित्रा यांचा राजीनामा मंजूर करताना, नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवड समितीही नियुक्त केली आहे.
५२ वर्षीय चित्रा या मार्च २०१८मध्ये निवृत्त होणार होत्या. भांडवली बाजाराचे प्रमुखपद भूषविणाऱ्या जगातील निवडक महिलांपैकी त्या एक होत्या.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या त्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या.
राष्ट्रीय शेअर बाजाराची १९९२मध्ये स्थापना होण्यापूर्वीपासून चित्रा रामकृष्णा या बाजाराच्या जडणघडणीत सहभागी झाल्या.
बाजाराचे पहिले अध्यक्ष आर. एच. पाटील यांच्यानंतर रवी नरेन हे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.
त्यांच्याकडून चित्रा यांनी २०१३मध्ये बाजाराच्या प्रमुखपदाची सूत्रे घेतली.बाजाराचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदही त्यांनी राखले होते.
गेल्याच महिन्यात जागतिक भांडवली बाजारांची संघटना असलेल्या ‘डब्ल्यूएफई’करिताही त्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या आहेत.
भारतीय महिला संघाला आशिया करंडक
महिला आशिया करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानवर १७ धावांनी दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा आशिया कप जिंकला.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ५ बाद १२१ धावा केल्या.
सलामीला आलेल्या मिताली राजने ६५ चेंडूंमध्ये ७३ धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या बाजूने कोणतीही साथ मिळत नसताना २० षटके फलंदाजी करत मितालीने एक बाजू लावून धरली.
भारताने दिलेल्या १२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकांमध्ये ६ बाद १०४ धावाच करता आल्या.
भारतीय महिलांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे पाकिस्तानला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या.
भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देणाऱ्या मिताली राजला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
निको रोसबर्गने निवृत्त
नुकतेच फॉर्म्युला-वन शर्यतीचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या निको रोसबर्गने निवृत्तीची घोषणा केली.
मर्सिडिज संघाच्या या शर्यतपटूने व्हिएन्ना येथे एफआयए विश्वविजेतेपद पुरस्कार वितरण सोहळ्यात ही घोषणा केली.
अबुधाबी येथे पार पडलेल्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत दुसरे स्थान निश्चित करताना रोसबर्गने कारकीर्दीतले पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते.
त्याने संघ सहकारी व तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या लुईस हॅमिल्टनला पाच गुणांनी पिछाडीवर टाकत हे विजेतेपद मिळविले होते.
बोल्ट आणि अयाना ट्रॅक अँड फिल्डमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू
जमेकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट आणि इथिओपियाची अल्माज अयाना यांची ट्रॅक अँड फिल्डमधील यंदाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने बोल्टला या सन्मानासाठी सहाव्यांदा निवडले आहे.
ऑलिम्पिकमधील १०,००० मीटर महिला शर्यतीत विक्रमी वेळेसह सुवर्ण जिंकणारी इथिओपियाची अयाना हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.
भारतात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रेटी सनी लिओनी
याहू इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये सनी लिओनीने सलग पाचव्या वर्षी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.
सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूड स्टार सलमान खानला मागे टाकत नंबर एकचे स्थान पटकावले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर सलमान खानला चौथे स्थान मिळाले आहे.
दरवर्षी ही वेबसाईट भारतीय लोक, कार्यक्रम आणि कथानकाच्या आधारावर वर्षभरातील आकडेवारी जारी करण्यात करते.
बीबीसीने नुकताच जाहीर केलेल्या १०० प्रतिभावान महिलांच्या यादीतही सनी लिओनीने स्थान मिळवले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा