लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्यानुसार सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
बेहिशेबी मालमत्तेनंतर सरकार आता जनतेकडे असणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
सरकारच्या नव्या नियमानुसार विवाहित महिलांना ५० तोळे (५०० ग्रॅम) सोने, अविवाहित महिलांना २५ तोळे (२५० ग्रॅम), तर पुरुषांना १० तोळे (१०० ग्रॅम) सोने बाळगता येणार आहे.
त्यापेक्षा जास्त सोने आढळले आणि ते अघोषित उत्पन्नातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले तर ते जप्त केले जातील.
मात्र या मर्यादेपर्यंतचे (प्रत्येकी ५०, २५ आणि १० तोळे) दागिने अघोषित उत्पन्नातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले तरी ते जप्त न करण्याचे आदेश आयकर अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
घोषित किंवा कृषी उत्पन्नातून (ज्याला आयकरातून सवलत देण्यात आली आहे) खरेदी केलेल्या सोन्यावर कोणताही कर लावला जाणार नाही.
त्याचबरोबर ज्ञात उत्पन्नातून, बचतीच्या माध्यमातून व कायदेशीररित्या खरेदी केलेल्या सोन्यावर देखील कर लागणार नाही.
तसेच वारसाहक्काने मिळालेले सोने आणि दागिन्यांवर कर लागू करण्याची कोणतीही तरतूद विद्यमान किंवा सुधारित कायद्यामध्ये नाही.
सरकारने सर्दी, डोकेदुखीवरील विक्स अॅक्शन ५००, कोरेक्स कफ सिरफ व डीकोल्डसह ३४४ औषधांवर लादलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे.
केंद्र सरकारने १० मार्च रोजी या औषधांवर बंदी घातली होती. तर न्यायालयाने १४ मार्च रोजी या बंदीला स्थगिती दिली.
फायजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बलर, सिप्ला आणि काही स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला आहे.
या ३४४ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेताना केंद्राने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होत असल्याचे कारण त्यावेळी सरकारने दिले होते.
आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे सरकारने औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
बंदी घातलेली औषधे ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय मेडिकलमधून घेण्यात येत होती. तसेच ही औषधे जाहिरातबाजीमुळे लोकप्रिय झाली होती.
डॉ. शारदा पोटुकुची यांना वनस्पती वैज्ञानिक पुरस्कार
जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महिला वैज्ञानिक डॉ. शारदा पोटुकुची यांना ‘एपीएसआय’ (अॅकॅडमी ऑफ प्लाण्ट सायन्सेस, इंडिया) या संस्थेचा आंतरराष्ट्रीय वनस्पती वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी वनस्पतींच्या उती व जनुकीय अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा हा गौरव आहे.
डॉ. शारदा यांचा वनस्पती जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. काही औषधी वनस्पतींच्या मेटॅबोलाइट उत्पादन प्रक्रियेत त्यांनी वेगळा संशोधनात्मक दृष्टिकोन मांडला आहे.
१९९८मध्ये त्यांनी हैदराबाद विद्यापीठात जैव विज्ञानात एम.एस्सी.ला पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले होते. सध्या त्या श्रीमाता वैष्णोदेवी विद्यापीठात जैवतंत्रज्ञान शास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.
वनस्पती जैवतंत्रज्ञान विषयात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील क्वाझालू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली, त्यासाठी त्यांना नॅशनल रीसर्च फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.
प्लांट टिश्यू कल्चर, जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, बायोरिअॅक्टर कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लॅण्टस, बायोअॅक्टिव्ह मेटॅबोलाइट प्रॉडक्शन हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले असून त्यांचे संशोधन तरुण पिढीला प्रेरणादायी असेच आहे.
पंकज अडवाणीला कांस्यपदक
भारताच्या पंकज अडवाणीला दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात वेल्सच्या अँड्र्यू पॅगेटने ७-२ अशा फरकाने गतविजेत्या पंकजचे आव्हान संपुष्टात आणले.
स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळणारा पंकज हा जगातील एकमेव खेळाडू आहे.
महा वजीरालोंककोर्न यांना थायलंडचे राजेपद
थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यादेज यांच्या जागी युवराज महा वजीरालोंककोर्न यांना तेथील पार्लमेंटने राजेपद बहाल केले आहे.
थायलंडचे राजे भूमीबोल यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते व ते जगातील सर्वात जास्त काळ सिंहासनावर राहिलेले राजे होते.
थायलंडच्या १९२४च्या कायद्यात राजेपदी कुणाची नेमणूक करायची हे ठरवून दिलेले आहे. तेथील राजांनाच उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार दिलेला आहे.
त्यात भूमीबोल यांनी त्यांचे द्वितीय पुत्र वजिरालोंककोर्न यांना उत्तराधिकारीपद दिले होते.
नवनियुक्त राजे ६४ वर्षांचे असून त्यांचे आयुष्य थायलंडबाहेर व्यतीत झाले आहे. ते जर्मनीत असतात व ते मायदेशात राहत नसल्याने काही आक्षेप होते.
त्यांनी अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियातून अपारंपरिक युद्धतंत्र व नौदलाचे प्रशिक्षण घेतले आहे. ते लष्कराचे वैमानिक व हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून पात्रताधारक आहेत.
त्यांच्या नेमणुकीत काही वाद जरूर होते पण आता ते बाजूला पडले आहेत.
इन्विन्सिबल इंडियन्सचा बजाजकडून गौरव
सर्व प्रतिकूल परिस्थिती झुगारून समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या, देशासाठी काम करणाऱ्या पाच व्यक्तींना बजाजने सन्मानित केले. नेमबाज अभिनव बिंद्राच्या हस्ते पाच जणांचा गौरव करण्यात आला.
बजाज कंपनीने ‘इन्विन्सिबल इंडियन्स : स्टोरीज दॅट इव्होक प्राइड एव्हरी डे’ या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाची सुरुवात केली.
या उपक्रमाद्वारे सामान्य भारतीयांच्या असामान्य कथा प्रकाशात येतील. भविष्यात अधिकाधिक ‘इन्विन्सिबल इंडियन्स’ तयार व्हावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा