परदेशी निधी नियंत्रण कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन करणाऱ्या २० हजार बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) एफसीआरएअंतर्गत झालेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
अशा एनजीओंचा एफसीआरएचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांना आता परदेशातून निधी स्वीकारता येणार नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परदेश विभागाला अशा प्रकारच्या कारवाईचे अधिकार आहेत.
देशभरात आतापर्यंत एकूण ३३ हजार एनजीओ अधिकृतरीत्या कार्यरत होते. या कारवाईनंतर त्यांची संख्या १३ हजार झाली आहे.
एनजीओंकडून सुरू असलेल्या कामकाजाची तपासणी वर्षभरापासून सुरू असून, त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सुरेश कलमाडी यांना आयओएचे आजीवन अध्यक्षपद
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले सुरेश कलमाडी यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
परंतु सध्याच्या परिस्थितीत हे पद स्वीकारणे योग्य नसल्याचे सांगत कलमाडी यांनी आयओएचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
२०१०मध्ये दिल्लीत आयोजन करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते.
फसवणूक व कटकारस्थानच्या आरोपावरून कलमाडी यांना सुमारे १० महिने तुरुंगात काढावे लागले होते. तसेच त्यांना आयओएचे अध्यक्षपदही गमवावे लागले होते.
कलमाडी यांच्यासोबतच बॉक्सिंग महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष अभय चौटाला यांचीही आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते असलेल्या अभयसिंह चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्नाप्रकरणी खटला सुरू आहे.
अभय चौटाला यांनी याआधी विविध क्रीडा संघटनांवर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते सध्या हरयाणा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत.
आयओएच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्व माजी अध्यक्षांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला पुन्हा परवानगी मिळावी यासाठी त्रिसदस्यीस समितीही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शंख घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
प्रसिद्ध बंगाली कवी व समीक्षक शंख घोष यांना साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. अकरा लाख रुपये रोख व वाग्देवीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कवी व समीक्षक याशिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. आदिम लता गुलमोमय, मुर्खो बारो, सामाजिक नॉय, बाबोरेर प्रार्थना, दिंगुली रातगुली, निहिता पतलछाया या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या.
त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, मराठी, आसामी, पंजाबी व मल्याळम तसेच पंजाबी या भारतीय तसेच काही परदेशी भाषांत भाषांतर झालेले आहे.
त्यांना २०११मध्ये पद्मभूषण हा सन्मान मिळाला, त्याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, रवींद्र पुरस्कार, नरसिंहदास पुरस्कार हे इतर मानाचे पुरस्कार त्यांना पूर्वीच मिळाले आहेत.
घोष यांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या चांदपूर येथे १९३२मध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले.
त्यांनी टागोरांवर काही निबंधही लिहिले आहेत. टागोरांवर अधिकारवाणीने लेखन करणारे साहित्यिक म्हणून ते परिचित आहेत.
दिल्ली विद्यापीठ, सिमल्याची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज तसेच विश्वभारती विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
ताराशंकर, विष्णू डे, सुभाष मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी या बंगाली ज्ञानपीठ विजेत्यांमध्ये आता शंख घोष यांचाही समावेश झाला आहे.
९५ कोटी भारतीय इंटरनेट सुविधांपासून वंचित
अॅसोचेम आणि डेलॉइट यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत भारतातील फक्त ३० ते ३५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.
‘सायबर गुन्ह्यांविरोधी धोरणात्मक राष्ट्रीय उपाय’ असे या अहवालाचे शीर्षक असून डिजिटल साक्षरतेचा प्रसार आवश्यक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.
हरियाणात धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन
प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या अश्वनी उपाध्याय या अधिकाऱ्याने तयार केले आहे.
एमआयटीमधून पीएचडी झालेल्या इमिल जेकब यांच्या मदतीने उपाध्याय यांनी कॅटरपिलर ट्रेनची संकल्पना विकसित केली आहे.
अश्वनी उपाध्याय यांनी एमआयटीमधून पीएचडी केली असून या संकल्पनेसाठी यासाठी त्यांना एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या कार्यालयाला कॅटरपिलर ट्रेनच्या प्रकल्पात प्राधान्याने लक्ष घालण्यास सांगितले आहे.
कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. १०० किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.
एक ट्रेन रुळांवरुन जात असताना दुसरी ट्रेन रुळांच्या खालील बाजूने जाऊ शकते, हे कॅटलपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा