परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पारपत्र (पासपोर्ट) नियमांत मोठे फेरबदल २३ डिसेंबर रोजी जाहीर केले.
पासपोर्ट प्रक्रिया वेगवान आणि सोपी होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. नव्या नियमानुसार नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी असेल.
युवा भारतीय संघाला आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद
भारताने श्रीलंकेवर मात करत तिसऱ्यांदा १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. भारताने यापूर्वी २०१२ आणि २००४मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.
कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना हिमांशु राणा आणि शुभम गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ बाद २७३ धावांची मजल मारली होती.
भारतीय संघाच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४८.४ षटकांत २३९ धावांतच संपुष्टात आला.
सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.
नजीब जंग यांचा राजीनामा नामंजूर
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकारने तूर्तास मंजूर केलेला नाही.
सध्या पदावर कायम राहण्याची सूचना जंग यांना करण्यात आली आहे. यामुळे जंग यांना आपला प्रस्तावित गोवा दौरा रद्द करावा लागला आहे.
जंग यांनी यानंतरही आग्रह धरला तर पुढच्या महिन्यात त्यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाऊ शकते.
सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक
भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे आता पंजाबच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे सोपवण्यात आली आहेत. तो गेली दोन वर्षे या संघाचा सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
२०१४च्या आयपीएल हंगामाआधी सहाय्यक प्रशिक्षकपदाची सूत्रे बांगर यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली.
या वेळी पंजाबने आश्चर्यकारक कामगिरीचे प्रदर्शन करताना अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद प्राप्त केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा