चालू घडामोडी : १४ डिसेंबर

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी अँटोनियो गुट्रेस

  • संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो गुट्रेस यांची निवड झाली असून १ जानेवारी २०१७पासून ते पदाची सूत्रे स्वीकारतील.
  • संयुक्त राष्ट्रांचे सध्याचे सरचिटणीस बान कि मून (दक्षिण कोरिया) ३१ डिसेंबर २०१६ रोजी निवृत्त होत आहेत.
  • संयुक्त राष्ट्र संघटना काळाच्या ओघात कालबाह्य़ ठरू नये व तिचे महत्त्व जागतिक घडामोडीत कायम राहावे यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागतील.
  • त्यांचा राजनैतिक क्षेत्रातील अनुभव फार मोठा आहे. लिस्बन येथील तंत्रज्ञान विद्यापीठातून ते इलेक्ट्रोटेक्निकल अभियांत्रिकीत पदवीधर झाले.
  • १९७३मध्ये ते पोर्तुगाल मंत्रिमंडळात उद्योग व्यवस्थापन विभागाचे प्रमुख बनले. त्यानंतर प्रथम ते सोशालिस्ट पार्टीचे प्रमुख नेते व १९९२मध्ये पक्षाचे सरचिटणीस झाले.
  • त्यांनी पोर्तुगीज शरणार्थी परिषदेची स्थापनाही केली. १९९५ ते २००१ या काळात ते पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
  • त्यांच्या काळात पोर्तुगालमधील गुंतवणूकही वाढली होती. पूर्व तिमोरमधील संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपात त्यांनी ठोस भूमिका घेतली.
  • स्थानिक निवडणुकांत सोशालिस्ट पक्षाचा पराभव झाल्याने त्यांनी २००१मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. २००५पर्यंत ते सोशालिस्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष होते.
  • २००५मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्यांची शरणार्थी विभागाचे आयुक्त म्हणून निवड केली होती. 

फोर्ब्सच्या यादीत दोन भारतीय वंशाचे व्यावसायिक

  • फोर्ब्स नियतकालिकाने दरवर्षीप्रमाणे ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अमेरिकी व्यावसायिकांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
  • या यादीत विवेक रामास्वामी व अपूर्व मेहता या दोन भारतीय वंशांच्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग सर्वोच्च स्थानी आहेत. झुकेरबर्ग यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर आहे.
  • बायोटेक व्यावसायिक विवेक रामास्वामी या यादीत २४व्या स्थानी, तर अपूर्व मेहता ३१व्या स्थानी आहेत.
  • रामास्वामी यांची संपत्ती ६०० दशलक्ष डॉलर, तर मेहता यांची संपत्ती ३६० दशलक्ष डॉलर आहे.
  • ३१ वर्षीय रामास्वामी हे हॉवर्ड आणि येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकलेले आहेत. मेहता हे सिलिकॉन व्हॅलीतील तरुण उद्योजकांपैकी एक आहेत.

सुषमा स्वराज यांना ग्लोबल थिंकर्सच्या यादीत स्थान

  • ‘ट्विटर डिप्लोमसी’ नावाचा अनोखा प्रकार प्रचलित केल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना परराष्ट्र व्यवहार मॅगझिनने २०१६च्या ‘ग्लोबल थिंकर्स’च्या यादीत स्थान दिले आहे.
  • या यादीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, जर्मन चॅंसेलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव बान की मून आदींचा समावेश आहे.
  • परराष्ट्र खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून स्वराज ट्विटरद्वारे मदत मागणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करत आहेत.
  • आजारी असताना रुग्णालयात दाखल असतानाही त्यांनी लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. यात भारतीय तसेच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
  • काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका ब्रिटीश दाम्पत्याला त्यांच्या सरोगसीद्वारे झालेल्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्रिटीश पासपोर्ट मिळण्यासाठी मदत केली होती.

सुरजीत राजेंद्रन यांना न्यू होरायझन्स इन फिजिक्स पुरस्कार

  • भारतीय अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ सुरजीत राजेंद्रन यांना विज्ञानातील नोबेल समजला जाणारा न्यू होरायझन्स इन फिजिक्स पुरस्कार मिळाला आहे.
  • त्यांना हा पुरस्कार ओंटारियोच्या पेरिमीटर संस्थेचे असिमिना अरवानितकी व स्टॅनफर्ड विद्यापीठाचे पीटर ग्रॅहम यांच्याबरोबर विभागून मिळाला आहे. या पुरस्काराची एकूण रक्कम १ लाख डॉलर्सची आहे.
  • त्यांनी २००४मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून गणितात पदवी घेतली. तर २००९मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएचडी केली.
  • राजेंद्रन हे बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असून पदार्थ विज्ञानातील अनेक चाचण्या त्यांनी शोधून काढल्या आहेत.
  • त्यांच्या संशोधनाचा विषय कृष्णद्रव्य, विश्वातील इतर गूढ बाबी हा आहे. संवेदकांचा वापर अचूक पद्धतीने करण्याचे कसब त्यांनी अनेक प्रयोगांत वापरले आहे.
  • आण्विक व प्रकाशीय इंटरफेरोमीटर तसेच मॅग्नेटोमीटर यांची रचना करण्यात त्यांनी भौतिकशास्त्रातील आधुनिक ज्ञानाचा वापर केला आहे.
  • गुरुत्वीय लहरी ओळखण्यासाठीची अणुघडय़ाळे, कृष्णद्रव्यातील ॲक्सियॉन ओळखण्याचे आण्विक चुंबकीय संस्पंदन तंत्र ही त्यांची विशेष कामगिरी आहे.
  • लार्ज हैड्रॉन कोलायडरच्या प्रयोगात नवीन कणांचे गुणधर्म तपासण्यात तसेच गुरुत्वीय लहरी संशोधन तंत्रात त्यांचा मोठा वाटा आहे.
  • प्रमाणित सिद्धांताच्या म्हणजे स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडे जाऊन त्यांनी भौतिकशास्त्रातील अनेक बाबींचा अभ्यास केला आहे.
  • हा पुरस्कार मिळालेले ते आतापर्यंतचे भारतीय वंशाचे पाचवे वैज्ञानिक आहेत. याआधी सौरभ झा, शिराध नवल मिनवाला, तेजिंदर सिंग विरदी व अशोक सेन यांना हा पुरस्कार मिळाला होता.

अपंग व्यक्ती हक्क संरक्षण कायद्याला राज्यसभेकडून मंजुरी

  • अपंग व्यक्ती हक्क संरक्षण कायदा, २०१४ला राज्यसभेकडून मंजुरी मिळाली आहे. अपंग व्यक्तीला संरक्षण मिळावे आणि त्याला योग्य प्रमाणात संधी मिळाव्या यासाठी हा कायदा आहे.
  • अपंग व्यक्तीस भेदभाव करणारी वागणूक दिल्यास दोन वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
  • संयुक्त राष्ट्राच्या अपंग व्यक्ती आणि त्या संदर्भातील मुद्दे या समितीने ज्या तरतुदी सुचवल्या होत्या त्यांचा समावेश या विधेयकात करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा