देशातील काळा पैसाधारकांना आणखी एक धक्का देत आता केंद्र सरकारने जुन्या नोटा जमा करण्यावर निर्बंध घातले आहेत.
आता नागरिकांना ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरुपात केवळ एकदाच ५००० रुपयांची रक्कम बँकेत जमा करता येणार आहे. नव्या नोटांसाठी मात्र हा नियम लागू असणार नाही.
परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणाऱ्या ठेवींवर कोणतेही निर्बंध नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
नोटा जमा करण्याची मुदत संपण्यापूर्वी नागरिकांना एका खात्यावर केवळ ५००० रुपयांची रक्कम जमा करता येणार आहे.
एखादी व्यक्ती दोनवेळा एकाच खात्यात पाच हजारांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असल्यास त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येईल.
याआधी जुन्या नोटा बँकेत का जमा केल्या नाहीत, याबद्दलची विचारणा या व्यक्तीकडे करण्यात येईल.
सुरक्षा दलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध
संरक्षण क्षेत्रासंबंधीची माहितीची गुप्तता कायम राखण्यासाठी सोशल मीडियाबाबत गृह मंत्रालयाकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
सुरक्षा दलांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्टमधून संवेदनशील गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिकारी आणि जवानांना समाज माध्यमांवर माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
जवानांनी ऑपरेशन दरम्यान काढलेले फोटो अनेकदा फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांवर पोहोचल्याचा उल्लेख या सूचनेत करण्यात आला आहे.
याप्रकारचे फोटो आणि व्हिडीओ फक्त अधिकृत वापरासाठी आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करणे या नियमाचे उल्लंघन आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात करुण नायरचे त्रिशतक
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस भारतीय विक्रमांचा ठरला.
नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर ७ बाद ७५९ धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची ९ बाद ७२६ ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध २००९मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती.
नायरने भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर (वय २५ वर्षे १३ दिवस) होण्याचा मानदेखील मिळविला. सेहवागने (वय २५ वर्षे १६० दिवस) २००४मध्ये पहिले त्रिशतक केले होते.
जेष्ठ अर्थतज्ज्ञ सौमित्र चौधरी यांचे निधन
देशाची अर्थव्यवस्था अडचणीतून जात असताना मदत करणारे अर्थतज्ज्ञ व नियोजन आयोगाचे माजी सदस्य सौमित्र चौधरी यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाले
त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीत युरो निकषांचा आग्रह धरून पर्यावरणाबाबतची संवेदनशीलता जागी ठेवली.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी २०१३मध्ये त्यांचे नाव चर्चेत होते. त्या वेळी रघुराम राजन यांनी नियुक्ती झाली होती.
सौमित्र चौधरी यांच्या समितीने २०२५पर्यंत सर्व तेलशुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यांना युरो-५ निकष लागू करण्याची शिफारस केली होती.
२०१७ पर्यंत युरो-४ व २०२० पर्यंत युरो-५ मानके पाळली गेली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.
भारत-६ निकष एप्रिल २०२४पासून अमलात येतील. त्यात त्यांच्या शिफारशींचा मोठा वाटा असणार आहे. इंधनातून प्रदूषण होऊ नये म्हणून हे निकष लावले जात असतात.
चौधरी हे जानेवारी २००५मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य बनले. नंतर २००९ ध्ये नियोजन आयोगाचे सदस्य झाले.
आयसीआरए या संस्थेवर त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून काम केले. मनी अॅण्ड फायनान्स या संशोधन नियतकालिकाचे ते संपादक होते.
ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल कॉस्टस अॅण्ड प्रायसेस, उद्योग मंत्रालय, स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अनेक संस्थांत त्यांनी काम केले. जागतिक बँकेतही त्यांनी अल्पकाळ काम केले.
त्यांची मूळ पदवी विज्ञानातील होती व नंतर त्यांनी दिल्लीतील स्कूल ऑफ सोशल सायन्सेस व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.
त्यांचे आर्थिक धोरण, प्रादेशिक विकास व उद्योगातील समस्या यावर एकूण २५ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.
पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या अर्थतज्ज्ञांमध्ये सौमित्र चौधरी यांचाही समावेश होता.
ज्युनिअर भारत संघ हॉकी विश्वविजेता
भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २–१ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
१५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता.
ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा हा अंतिम सामना लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारत आणि बेल्जियम या संघांमध्ये झाला.
८व्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि २२व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा