निश्चलनीकरणांनतर डिजिटल किंवा कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना ‘निती’ आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.
यानुसार ‘लकी ग्राहक योजना’ आणि ‘डिजि-धन व्यापार योजना’ नावाने दोन योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत एकूण ३४० कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या योजनेचा गरीब, मध्यमवर्गीय ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा, हा वर्ग डिजिटल क्रांतीचा भाग बनावा हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
‘द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
२५ डिसेंबरपासून (नाताळ) पुढील १०० दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत या योजना राबवली जाणार आहेत.
या योजनेतील भव्यतम सोडत १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी काढण्यात येईल.
या योजनांचा भर सामान्य ग्राहक आणि लघु व मध्यम व्यापारी यांच्यावर असेल आणि त्यांना डिजिटल व्यवहारांसाठी प्रेरित केले जाईल.
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत
महामार्गांवरील दारूच्या दुकानांवर बंदी
देशातील अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूच्या सर्व दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मात्र दुकान मालकांना मुभा देत जोपर्यंत परवाना आहे तोपर्यंत दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या दुकानांच्या परवान्यांचे ३१ मार्च २०१७नंतर नूतनीकरण करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानांच्या बोर्डांवरही प्रतिबंध आणले आहेत.
दारुची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत असं न्यायालयाने सांगितले आहे.
बिल इंग्लिश न्यूझीलंडचे ३९वे पंतप्रधान
उपपंतप्रधानपद तसेच तीन वेळा अर्थखाते सांभाळलेल्या बिल इंग्लिश यांनी १२ डिसेंबर रोजी न्यूझीलंडचे ३९वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
काहीसे पुराणमतवादी अशी त्यांची ओळख असली तरी अनुभवातून नवे स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
१९८०पासून नॅशनल पार्टीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आता ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आहेत.
वाणिज्य व साहित्यातील ते पदवीधर आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेती करत होते.
१९९०साली ते पहिल्यांदा संसदेवर निवडले गेले. त्यानंतर त्यांच्याकडे उपपंतप्रधान तसेच अर्थखात्याची धुरा आली.
जॉन की यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लिश यांची नॅशनल पार्टीच्या पक्षनेतेपदी व नंतर पंतप्रधानपदी निवड झाली.
नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे निधन
नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस शिलिंग यांचे मेरिलँड येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
शिलिंग यांनी हार्वर्ड तसेच मेरिलँड विद्यापीठात प्राध्यापकी केली होती. शिलिंग यांना २००५मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते.
स्पर्धात्मक परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या गणितीय गेम थिअरीचा त्यांनी प्रभावी वापर केला होता.
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ
अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात ०.२५ टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हचा व्याज दर आता ०.२५ टक्क्यांवरून ०.५० टक्के झाला आहे.
यामुळे जगभरातील शेअर बाजार आणि सोन्या-चांदीचे बाजार घसरले आहेत. अमेरिकी डॉलर मजबूत होऊन अन्य देशांचे चलन घसरले आहेत.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असल्यामुळे व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
डेव्हिड फ्रीडमन इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत
अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेव्हिड फ्रीडमन यांची इस्राईलमधील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान फ्रीडमन हे ट्रम्प यांचे अमेरिका-इस्राईल संबंधांसदर्भातील सल्लागार होते.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिका-इस्राईल संबंध तणावग्रस्त झाले होते.
मात्र इस्राईलचे आक्रमक पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
आयटीएफचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
एकेरीमध्ये अँडी मरे आणि दुहेरीमध्ये जेमी मरे यांची आयटीएफचे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
एकाच वर्षात पुरुष विभागात एकेरी आणि दुहेरीत दोन भावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
अँडी मरे याने या मोसमात विंबल्डनसह एकूण नऊ विजेतीपदे मिळविली. त्याचबरोबर ऑलिंपिकचे दुसरे सुवर्णपदकही पटकावले आहे.
महिला विभागात एकेरीत अँजेलिक किर्बर सर्वोत्कृष्ट ठरली. स्टेफी ग्राफ (१९९६)नंतर प्रथमच जर्मनीची खेळाडू या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
दुहेरीत जेमी मरे आणि ब्रुनो सोआरेस, तर महिलांमध्ये कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्तिना म्लाडेनोविच यांनी हा पुरस्कार मिळविला.
nice information
उत्तर द्याहटवा