मोदी सरकारने १६ डिसेंबर रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची अधिकृत घोषणा केली.
लोकसभेत मंजूर झालेल्या प्राप्तिकर दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मंजुरी दिल्यामुळे या योजनेला सुरुवात झाली आहे.
या योजनेमुळे प्राप्तिकर विवरणपत्रात आजवर न दाखवलेली अघोषित संपत्ती वैध करण्याची अखेरची संधी करदात्यांना उपलब्ध झाली आहे.
योजनेची सुरुवात १७ डिसेंबरपासून सुरू होत असून, ३१ मार्च २०१७पर्यंत ई मेलव्दारे या अघोषित उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला देता येईल.
प्राप्तिकर कायदा दुरूस्तीनुसार अघोषित उत्पन्न घोषित करणाऱ्यांना ५० टक्के रक्कम करापोटी भरावी लागेल. हा कर ३० सप्टेंबरपूर्वी ४५ टक्के होता.
करदात्याने अघोषित उत्पन्न घोषित करण्याचे टाळले आणि प्राप्तिकर विभागाने ते शोधून काढले तर त्या रकमेवर ७५ टक्के कर व १० टक्के दंड भरावा लागेल.
नोटाबंदीनंतर अघोषित उत्पन्नावर ३० टक्के कर व १० टक्के दंड आकारला जाईल. याखेरीज ३० टक्के कराच्या रकमेवर ३३ टक्के सरचार्जही भरावा लागेल.
तसेच अघोषित उत्पन्नातील २५ टक्के रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत ४ वर्षांसाठी गुंतवावी लागेल.
या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. ४ वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.
असे अघोषित उत्पन्न जाहीर करणाऱ्या व्यक्तींची माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यांच्या खात्यांची माहितीही उघड केली जाणार नाही.
काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने blackmoneyinfo@incometax.gov.in हा ई-मेल पत्ता तयार केला आहे.
जनतेने त्यांच्याकडे असलेली काळा पैसाधारकांविषयीची माहिती या ई-मेल पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन सरकारने केले आहे.
ई-मेल पाठविणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. तसेच ई-मेल पत्त्यावर येणाऱ्या प्रत्येक माहितीची दखल घेऊन कारवाई केली केली जाणार आहे.
राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभांरभ
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी १७ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभांरभ केला.
‘सबके लिए भोजन, सबके लिए सन्मान’, या उद्दिष्टासह सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत ५ रुपयांत नाष्टा आणि ८ रुपयांत जेवण मिळणार आहे.
या योजनेचा लाभ गरीब, मजूर, विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिकांसह सर्वांनाच होणार आहे.
अन्नपूर्णा रसोई योजनेमध्ये जेवण पुरविण्यासाठी स्पेशल व्हॅन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या राज्यातील १२ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली असून एकूण ८० व्हॅन ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था करतात.
लवकरच राजस्थानमधील सर्व ३३ जिल्ह्यांत ३०० ठिकाणी या योजनेचा लाभ पोचविण्यात येणार आहे.
तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सरकारी अनुदान तत्वावर अम्मा कॅंटीन यशस्वीरित्या चालवली होती.
२०१३साली सुरू करण्यात आलेल्या या कॅंटीनमध्ये १ रुपयात नाष्टा आणि ५ रुपयांमध्ये जेवण देण्याची सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर राजस्थान सरकारने अन्नपूर्णा रसोई योजना सुरू केली आहे.
एलआयसीच्या अध्यक्षपदी विजय कुमार शर्मा
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)च्या अध्यक्षपदी विजय कुमार (व्ही. के.) शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणारे शर्मा यांची नियुक्ती ही पुढील पाच वर्षांसाठी असेल.
महामंडळाचे एस. के. रॉय यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाच जून २०१६मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते.
तर व्यवस्थापकीय संचालकपद असलेले शर्मा १६ सप्टेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होते.
१९८१मध्ये अधिकारी म्हणून महामंडळात रुजू झालेले शर्मा २०१३मध्ये व्यवस्थापकीय संचालक बनले. कंपनीच्या दक्षिण परिमंडळाचे ते व्यवस्थापकही राहिले आहेत.
एलआयसी समूहातील एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपयांचा नफा कमाविला असून मार्च २०१६ अखेरचे कंपनीचे एकूण उत्पन्न ४.३१ लाख कोटी रुपये नोंदविले आहे.
एलआयसीचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात १५ टक्के हिस्सा (२२.१० लाख कोटी रुपयांची मालमत्ता) असून आणि ती आरबीआयनंतर सरकारला सर्वाधिक नफा मिळवून देणारी कंपनी आहे.
स्थलांतरीतांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर
अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
प्यू रिसर्चच्या अहवालानुसार १.५६ कोटी भारतीय परदेशात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या सविता वैद्यनाथन महापौरपदी
अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यातील कुपरटिनो शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या सविता वैद्यनाथन यांची निवड झाली आहे.
अमेरिकेच्या एखाद्या शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाची महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सविता यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून त्या शाळेत गणिताच्या शिक्षिका म्हणून व बँकेत अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे.
सविता वैद्यनाथन या गेल्या १९ वर्षांपासून कुपरटिनो शहरात राहत आहेत. शहरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमात त्या सक्रीय सहभाग नोंदवत असतात.
अॅपल कंपनीमुळे कुपरटिनो ओळखले जाते. या शहरातच अॅपल कंपनीचे मुख्यालय आहे.
AIDWAच्या सरचिटणीसपदी मरियम ढवळे
मुंबईच्या मरियम ढवळे यांची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (AIDWA) राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल येथील माजी खासदार मलिनी भट्टाचार्य यांची संघटनेच्या नव्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. ढवळे या AIDWAच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रातील महिला चळवळीच्या लढाऊ नेत्या, माजी खासदार दिवंगत कॉ. अहिल्या रांगणेकर आणि आदिवासी मुक्ती लढ्याच्या प्रणेत्या दिवंगत कॉ. गोदावरी परुळेकर यांनी या संघटनेसाठी राष्ट्रीय पातळीवर काम केले होते.
मरियम ढवळे यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी महिलांसाठी अनेक लढे उभारून वनाधिकार, जमीन, रेशन, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा प्रश्नांवर आंदोलने केली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा