पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीय वंशाच्या केहकशा बासूला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तिला एक लाख युरोचा हा पुरस्कार आहे. अवघ्या सोळा वर्षांच्या वयात तिने केलेले काम थक्क करणारे आहे.
या पुरस्कारासाठी जगभरातून १२० नावे पुढे आली होती. आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने त्यातून ही निवड केली.
शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण झाले.
तिने वयाच्या चौदाव्या वर्षी ग्रीन होप ही संस्था दुबईमध्ये सुरू केली. आता ती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची जागतिक समन्वयक आहे.
ही संस्था दहा देशांमध्ये कार्यरत असून, टाकाऊ वस्तू गोळा करणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे आदी कामे तिच्या माध्यमातून होतात.
तिचे सगळे कार्य पर्यावरण क्षेत्रात असून एकूण ४५ देशांत फिरून तिने पृथ्वीच्या संरक्षणाचा संदेश पोहोचवला आहे.
अमेरिका, ओमा, नेपाळ, मेक्सिको, कोलंबिया, फ्रान्स या देशात पाच हजार झाडांची लागवड करण्याचा प्रयोग तिने केला आहे.
केहकशा ही वर्ल्ड फ्युचर कौन्सिलची युवा दूत आहे. तिला आतापर्यंत शेख हमदान पुरस्कार व डायना पुरस्कारही मिळाला आहे.
नॅशनल जिओग्राफीकच्या स्पर्धेत वरुण अदित्यला प्रथम क्रमांक
नॅशनल जिओग्राफीकतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर’ या छायाचित्रांच्या स्पर्धेत दोघा भारतीयांनी स्थान मिळविले आहे.
‘ऍनिमल पोट्रेट’ प्रकारात महाराष्ट्राच्या वरुण अदित्यच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तर ‘लॅंडस्केप’ प्रकारात प्रसेनजीत यादवच्या छायाचित्राला पारितोषिक मिळाले आहे.
‘ड्रॅगिंग यू डीप इनटू द वूड्स’ असे नाव देताना वरुणने एका २० सेंटिमीटर लांबीच्या हिरव्या सापाचे अप्रतिम छायाचित्र काढले आहे. याच छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
वरदाह चेन्नईच्या किनारपट्टीवर दाखल
बंगालच्या उपसागरात तयार झालेले वरदाह नावाचे चक्रीवादळ १२ डिसेंबर रोजी तामिळनाडूतील चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले.
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून वरदाहच्या तडाख्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मध्यरात्रीपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
व्हेनेजुएलामध्येही नोटबंदी
व्हेनेजुएलाने भारताच्या पावलावर पाऊल टाकत नोटबंदीचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देशातील सर्वाधिक मुल्याची १०० बोलिव्हरची नोट पुढील ७२ तासांत चलनातून रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
साठवलेल्या नोटा बदलण्याची संधीच माफियांना मिळू नये, म्हणून कोलंबिया, ब्राझीलमधून व्हेनेजुएलात येणारे सर्व सागरी, हवाई मार्ग आणि रस्ते बंद करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.
माफिया आणि तस्करांकडून सुरू असलेला काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.
सरकारच्या निर्णयानुसार १०० बोलिव्हरच्या २०० पट मुल्याच्या स्वरूपात नव्या नोटा आणि नाणी छापली जातील.
सध्या बाजारात १०० बोलिव्हरच्या नोटेचे मुल्य खूपच खालावले असून ते २ ते ३ अमेरिकन सेंट इतक्या निचांकी पातळीला पोहचले आहे.
चलनाची किंमत घसरल्यामुळे व्हेनेझुएलाला तेल निर्यातीच्या व्यवहारातही मोठा फटका बसला होता. त्यामुळे देशाच्या तिजोरीत डॉलर्सची चणचण निर्माण झाली होती.
व्हेनेझुएलातील महागाई दर या वर्षाच्या अखेरीपर्यंत ४७५ टक्के तर २०१७ पर्यंत १००० टक्के होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे.
मिस्त्रींची टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुन हकालपट्टी
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुनही हटवण्यात आले आहे.
सायरस मिस्त्रींना हटवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. त्यात मतदानाने मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
टाटा समूहातील कंपन्यांच्या ज्या पदांवर मिस्त्री आहेत त्या पदांवरुन त्यांना हटवण्यात येत आहे.
या कारवाईमुळे सायरस मिस्त्री यांचा टाटा इंडस्ट्रीजमधील अध्यक्षपदाचा अधिकारही संपुष्टात आला आहे.
रतन टाटा यांनी टाटा इंडस्ट्रीजच्या समभागधारकांना पत्र लिहून सायरस मिस्त्री यांना पदावरून दूर करण्यासाठी पाठिंब्याची विनंती केली होती.
आयएसआयच्या प्रमुखांची हकालपट्टी
पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी आयएसआय या देशातील अत्यंत प्रभावी गुप्तचर संथेच्या प्रमुखपदावरुन रिझवान अख्तर यांची हकालपट्टी केली आहे.
उचलबांगडी झालेल्या अख्तर यांचे स्थान सांभाळण्यासाठी लेफ्टनंट जनरल नाविद मुख्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिजवान अख्तर यांची राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ (एनडीयू) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्तार यांना गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आयएसआयच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुखपदही भूषवले आहे.
दोन आठवडयांपूर्वी जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झालेला हा महत्वाचा बदल आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अख्तर यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.
नोव्हेंबर २०१४मध्ये अख्तर यांची तीन वर्षांसाठी आयएसआयप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
१०० मिलियन्स फॉर १०० मिलियन्स
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त बालकामगार, बालगुलामगिरी आणि बालहिंसेविरोधातील ‘१०० मिलियन्स फॉर १०० मिलियन्स’ या मोहिमेला सुरुवात केली.
नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन’तर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ५००० मुलांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
देश-विदेशातील लहान मुले, तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
आणखी तीन भाषांना घटनात्मक दर्जा मिळणार
भोजपूरी, भोटी आणि राजस्थानीया ३ भाषांना घटनात्मक दर्जा मिळणार असून त्यांचा राज्यघटनेच्या ८व्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे.
या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस, त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, परंतु आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार आहे.
जगातील सर्वांत मोठा बोगद्यातून वाहतूक सुरु
जूनमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठा बोगदा असलेल्या स्वित्झर्लंडमधील गॉटहार्ड बेस टनेलमधून ११ डिसेंबरपासून प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.
झ्युरिच ते लुगानो रेल्वे प्रवासी घेऊन या बोगद्यातून धावली. बोगद्यामुळे या प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी झाला आहे.
हा बोगदा ५७ किलोमीटरचा आहे. तो बांधण्यासाठी १७ वर्षे लागली असून, त्यासाठी १.८ कोटी डॉलर खर्च आला आहे.
या बोगद्याच्या बांधणीत पारंपरिक ब्लास्ट अँड ड्रिल या तुलनेने जोखमीच्या पद्धतीऐवजी टनेल बोअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या बोगद्यामुळे रॉटरडॅम (पश्चिम नेदरलँडमधील शहर) आणि अॅड्रियाटिक समुद्र (इटलीचा पूर्व किनारा) या दरम्यानचे अंतर कमी वेळात कापणे शक्य होणार आहे.
अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी शशिकला यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
जयललिता ‘अम्मा’, तर शशिकला या ‘चिनम्मा’ (लहान मावशी) म्हणून ओळखल्या जातात.
जयललिता यांचे अनेक वर्षे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे तंबीदुराई तसेच सेनगोट्टयन हेही अण्णा द्रमुकच्या सरचिटणीसपदाच्या शर्यतीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा