ब्रिटीश नियतकालिक टाइमने पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली आहे.
ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिन्टन या पर्सन ऑफ द इअर स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर द हॅकर हा ग्रुप तिसऱ्या स्थानी आहे.
टाईम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर चांगल्या किंवा वाईट प्रकारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अनपेक्षित यश मिळविणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन, ब्लादिमिर पुतीन, मार्क झुकरबर्ग, नरेंद्र मोदी यांना मागे टाकत हा सन्मान मिळविला.
आतापर्यंत १० वेळा ट्रम्प यांचा फोटो टाइमच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला आहे. सर्वप्रथम १९८९मध्ये त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता.
‘रिसोर्स सॅट २ ए’चे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) ७ डिसेंबर रोजी रिसोर्स सॅट २ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-३६ या प्रक्षेपकाद्वारे रिसोर्स सॅट २ ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला.
ज्येष्ठ राजकीय पत्रकार चो रामास्वामी यांचे निधन
ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे चो रामास्वामी ‘तुघलक’ या तामिळ राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांच्याशी त्या राजकीय सल्लामसलतदेखील करत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना ‘राज गुरु’ असे संबोधत.
चो यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी वकिलीचा अभ्यास केला होते. त्यांच्या 'थेन्मोझियल' नाटकातल्या पात्रावरून त्यांना ‘चो' हे नाव पडले.
महाविद्यालयीन जीवनात ते एका नाटकाच्या ग्रुपमध्ये सक्रीय होते. तेथे त्यांची जयललिता यांच्याशी मैत्री झाली.
चो यांनी मद्रास उच्च न्यायालयात सहा वर्षे वकिली केली. नंतर टीटीके ग्रुपचे विधी सल्लागार म्हणून काम पाहिले.
त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांनी २०० सिनेमांत अभिनय केला आहे. २३ नाटके आणि १४ सिनेमाचे संवादलेखन केले आहे तर ४ सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे.
पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा ‘फिरोज गांधी स्मृती’ पुरस्कार त्यांना मिळाला होता.
आरबीआयचे पाचवे द्वैमासिक पतधोरण
यंदाच्या आर्थिक वर्षातील हे पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेचरिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के, तर बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
नोटाबंदीनंतर बॅंकांतील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे रेपो दरात आरबीआय कपात करेल अशी आशा होती. मात्र, तसे झालेले नाही.
बॅंकांमध्ये ठेवी वाढल्याने रिझर्व्ह बॅंकेने २८ नोव्हेंबर सीआरआर तात्पुरत्या स्वरूपात शंभर टक्क्यांवर नेला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्के इतका राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तविली आहे.
पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर हे पहिलेच पतधोरण आहे. तर पतधोरण समितीच्या शिफारशीवर आधारित हे दुसरे पतधोरण आहे.
गेल्या पतधोरण आढाव्यापासून सरकारने ६ सदस्यीय पतधोरण समिती नियुक्त केली असून तिचे अध्यक्षपद आरबीआय गव्हर्नरांकडे देण्यात आले आहे.
समितीतील गव्हर्नर वगळता अन्य पाच सदस्यांना व्याजदराबाबत निर्णय अधिकार आहेत. गव्हर्नरना केवळ अधिक मतांच्या बाजुने कौल द्यावयाचा आहे.
ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या पहिल्या त्यांच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून तो ६.२५ टक्क्यांवर आणला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा