चालू घडामोडी : २० डिसेंबर
२०१६ची विश्वसुंदरी स्टेफनी डेल व्हॅले
- पोर्तु रिकोच्या स्टेफनी डेल व्हॅले या सौंदर्यवतीने ‘मिस वर्ल्ड २०१६’ (विश्वसुंदरी) हा मानाचा किताब पटकाविला आहे.
- १९५१मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे ६६वे वर्ष होते. ही स्पर्धा ऑक्सन हिल, मेरीलॅण्ड, अमेरिका येथे झाली.
- परीक्षकांनी जगभरातील ११७ स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.
- गेल्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या स्पेनच्या मेरिया लालागुना हिने डेल व्हॅलेला मिस वर्ल्डचा किताब प्रदान केला.
- १९ वर्षीय विद्यार्थी असलेल्या डेल व्हॅलेला स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत.
- कॅरेबियन आयलँडच्या विल्नेलिया मर्सेडनंतर (१९७५) हा किताब पटकाविणारी डेल व्हॅले ही दुसरी कॅरेबियन सौंदर्यवती आहे.
- डॉमिनिकन रिपब्लीकची यारित्झा मिग्युलिना रेज रमिरेझ हिने दुसरे स्थान तर इंडोनेशियाच्या नताशा मॅन्युएला हिने तिसरे स्थान पटकाविले.
- मिस फिलीपिन्स कैट्रीओना एलिसा ग्रे आणि मिस केनिया एवलिन एनजाम्बी यांनी अंतिम फेरीत शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते.
- या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व प्रियदर्शनी चॅटर्जी हिने केले. प्रियदर्शनीने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’ हा खिताब जिंकला आहे.
डिजिटल लघुउद्योगांना प्राप्तिकरात सवलत
- लघुउद्योगांमध्ये रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्राप्तिकरात सवलत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
- सरकारच्या धोरणानुसार असे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना ‘डिजिटल पेमेंट’वरील करातही सूट मिळणार आहे.
- दरवर्षी २ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अंदाजित उत्पन्न ८ टक्के (१६ लाख) मानून त्यावर प्राप्तीकर आकारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
- परंतु, हे व्यापारी जर रोखरहित (कॅशलेस) व्यवहार करायला तयार असतील तर त्यांचं अंदाजित उत्पन्न सहा टक्के (१२ लाख) गृहित धरून कर आकारणी केली जाणार आहे.
- याशिवाय त्यांना ‘डिजिटल पेमेंट’वर आकारल्या जाणाऱ्या ८ टक्के करातही सूट देण्यात येणार आहे.
- काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
- रोखरहित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लकी ग्राहक योजना आणि डिजि-धन व्यापार योजनादेखील जाहीर केल्या आहेत.
डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे निधन
- श्वास अवरोध होऊन उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रथमोपचार शोधून काढणारे अमेरिकेचे डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
- १९७०मध्ये त्यांनी व्यक्तीच्या ओटीपोटात विशिष्ट पद्धतीने दाब देऊन श्वासनलिका व अन्ननलिका मोकळी करण्याचे तंत्र शोधले.
- त्यांच्या या तंत्राने ४० वर्षांत अनेकांचे प्राण वाचले. ही पद्धती ‘हेम्लिच मॅन्युव्हर’ म्हणून ओळखली जाते.
- अशा अटीतटीच्या प्रसंगी प्राण वाचवणाऱ्या काही उपकरणांचे पेटंटही त्यांनी घेतले होते.
- त्यांच्या या तंत्राची कुचेष्टा झाली असली तरी नंतर त्याला जगात मान्यता मिळाली.
- व्हिएतनाम युद्धात त्यांच्या ‘हेम्लिच चेस्ट ड्रेन व्हॉल्व्ह’ने अनेक सैनिकांचे प्राण युद्धभूमीवर वाचवले.
- हेन्री हेम्लिच यांचा जन्म डेलावरमधील विलमिंग्टन येथे झाला. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते होते.
- वेल कॉर्नेल मेडिकल कॉलेजमधून ते १९४३मध्ये पदवीधर झाले. नंतर छातीचे शल्यचिकित्सक झाले. ते निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होते.
- सिनसिनाटीच्या झेवियर विद्यापीठात ते प्राध्यापक होते, तर हेम्लिच इन्स्टिटय़ूटचे अध्यक्षही होते.
- त्यांची पत्नी जेन हिने त्यांच्यासमवेत ‘व्हॉट डॉक्टर वोंट टेल यू’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
हाँगकाँगला जाण्यासाठी भारतीय पर्यटकांना व्हिसा अनिवार्य
- भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी आता भारतीय पर्यटकांना व्हिसा घ्यावा लागणार आहे. याआधी भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी व्हिसा लागत नसे.
- नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय पर्यटकांना हाँगकाँगला जाण्यासाठी प्री-अराइव्हल रजिस्ट्रेशन किंवा जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे.
- आतापर्यंत, १४ दिवसांपेक्षा कमी काळ हाँगकाँगमध्ये राहण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती.
- हाँगकाँगमध्ये आसरा घेणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- दरवर्षी हाँगकाँगला हजारो निर्वासितांचे अर्ज येतात. या निर्वासितांना परवानगी मिळेपर्यंत त्यांना तेथे राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते.
- भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशातून अनेक निर्वासित अर्ज करतात.
एटीकेला दुसऱ्यांदा आयएसएलचे जेतेपद
- अटीतटीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर ऍटलेटिको द कोलकता (एटीके) संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
- सौरव गांगुलीची सहमालकी असलेल्या एटीके संघाने केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशा फरकाने हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.
- तर सचिन तेंडुलकरची सहमालकी असलेल्या केरळास दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- नवी मुंबईत दोन वर्षांपूर्वी झालेल्या अंतिम लढतीत कोलकताने केरळास एका गोलने हरवून जेतेपद मिळविले होते.
तमिळनाडूतील शरिया न्यायालयांवर बंदी
- तमिळनाडूतील मशिदींमध्ये भरणाऱ्या शरिया न्यायालयांवर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
- अनिवासी भारतीय अब्दुल रहमान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश संजय कौल व एम. सुंदर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
- चेन्नईतील अण्णा सलाई मशिदीत अगदी न्यायव्यस्थेनुसार न्यायालय सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत अशा ठिकाणी फक्त प्रार्थना होणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
- या न्यायालयांत समन्स बजावणे, विवाह, तलाकसंबंधी प्रकरणांवर सुनावणी घेणे, अशी अन्य कामे पार पडतात.
- राज्य सरकारने अशा शरिया न्यायालयांवर बंदी घालून त्याबाबतचा अहवाल चार आठवड्यात न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
रेयाल माद्रिदला क्लब विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद
- स्ट्रायकर ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या हॅटट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने कशिमा अँटलर्सचा ४-२ असा पराभव करून क्लब विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
- रोनाल्डोसाठी हे विजेतेपद खास ठरले. या वर्षी त्याने चॅंपियन्स लीग, युरोपियन चॅंपियन्स लीग अशा दोन विजेतेपदाबरोबरच वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताबही मिळविला आहे.
- क्लब विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेयालसाठी रोनाल्डोने तीन, तर करीम बेन्झेंमाने एक गोल केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोनाल्डोच ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरला.
पाकिस्तानमध्येही नोटाबंदी
- काळ्या पैशावर नियंत्रणासाठी भारताने घेतेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनुकरण पाकिस्तानने केले आहे.
- काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पाच हजाराची नोट बंद करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत बहूमताने पारित करण्यात आला आहे.
- पाच हजाराची नोट चलनातून रद्द केल्याने देशातील भ्रष्टाचार व काळ्यापैशावर नियंत्रण आणणे सोपे होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
- त्यानुसार येत्या तीन ते पाच वर्षांत पाच हजार रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा