रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलती जाहीर
नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईवर मात करण्यासाठी पकडून रोखरहित व्यवहारांच्या डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रकारच्या ११ सवलती जाहीर केल्या.
रोख व्यवहार कमी करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढवणे व त्यामुळे चलनटंचाईची झळ कमी व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
याचा फायदा घेऊन डिजिटल व्यवहार वाढविल्यास वर्षभरात रोख चलनाची गरज काही लाख कोटी रुपयांनी कमी होईल, असा सरकारला विश्वास आहे.
बर्नार्ड कॅझनूव फ्रान्सचे नवे पंतप्रधान
फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अंतर्गत सुरक्षा मंत्री बर्नार्ड कॅझनूव यांची नियुक्ती झाली आहे.
६ डिसेंबर रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. मे २०१७मध्ये निवडणुका होईपर्यंत ते या पदावर राहतील.
२ जून १९६३ रोजी जन्मलेले बर्नार्ड हे व्यवसायाने वकील आहेत. १९९७पासून ते खासदार असून त्यापूर्वी ते चेरबर्गचे महापौर होते.
सन २०१२मध्ये ऐरॉ हे पंतप्रधान असताना त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांच्याकडे युरोपीय देशांतील प्रकरणे हाताळणाऱ्या खात्याची जबाबदारी देण्यात आली.
जागतिक राजकारण आणि संरक्षण व्यवहार या क्षेत्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास असल्याने ऐरॉ सरकारच्या पूर्वार्धात त्यांच्या कामाचे कौतुक झाले.
नंतर मॅन्युअल वॉल्स हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना अंतर्गत सुरक्षा (गृहमंत्री) हे सर्वात महत्त्वाचे खाते देण्यात आले.
त्यांच्याच काळात फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले झाले. २३० जणांना यात प्राण गमवावे लागल्याने काही काळ त्यांना माध्यमांची तसेच विरोधी पक्षांची टीका सहन करावी लागली.
युरोपीय देशांतील अनेक मंत्र्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध असल्याने त्यांची पंतप्रधानपदाची अल्प कारकीर्दही यशस्वी ठरेल, असे मानले जाते.
आंध्रप्रदेशला वरदाह वादळाचा धोका
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या एका तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे सागरी वादळामध्ये रुपांतर झाले असून, या वादळाचे नामकरण ‘वरदाह’ असे करण्यात आले आहे.
हे वादळ सध्या विशाखापट्टणमच्या आग्नेयेस सुमारे १,०४० किमी अंतरावर; तर मछलीपट्टणम शहरापासून १,१३५ किमी अंतरावर आहे.
येत्या काही तासांत हे वादळ अधिक विध्वंसक होत, येत्या चार दिवसांत ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीस धडकण्याची शक्यता आहे.
या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, मच्छिमारांना सागरामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानचे १० कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द
जागतिक बॅंकेकडून पाकिस्तानला नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासंदर्भात मंजूर करण्यात आलेले १० कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द करण्यात आले आहे.
प्रकल्पासाठी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले अपयश तसेच गॅस वितरण कंपनीचा निरुत्साह या मुख्य कारणांच्या पार्श्वभूमीवर हे कर्ज रद्द करण्यात आले.
या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘सुई सदर्न गॅस कंपनी (एसएसजीसी)’ या कंपनीकडून करण्यात येणार होती.
या प्रकल्पांतर्गत कराची, सिंध प्रांताचा अंतर्गत भाग आणि बलुचिस्तानला नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यात येणार होता.
नैसर्गिक वायुच्या वाहिनीच्या माध्यमामधून करण्यात येणाऱ्या पुरवठ्यामधील वायुगळती व आर्थिक नुकसान टाळणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.
मात्र नैसर्गिक वायुची गळती सुरुच असल्याचे निरीक्षण जागतिक बॅंकेच्या यासंदर्भातील अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. या प्रकल्पास जागतिक बॅंकेने ‘असमाधानकारक’ असा दर्जा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा