महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) मजुरीची पुनर्रचना करण्याचा विचार सरकार करत आहे.
या योजनेंतर्गत ज्या निकषांवर मजुरांना मजुरी दिली जाते त्या निकषांवर आता पुनर्विचार करण्यात येणार आहे.
केंद्राने निश्चित केलेली मनरेगाची मजुरी आणि अनेक राज्यांकडून देण्यात येत असलेली मजुरी यात अंतर असल्याचे दिसून येते. राज्यांच्या किमान मजुरी दरापेक्षाही मनरेगाचे मजुरी दर कमी आहेत.
मजुरीतील हे अंतर दूर करण्यासाठी सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मनरेगाच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या मजुरीत आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ओडिशात २ रुपये तर पश्चिम बंगालमध्ये ४ रुपये वाढ करण्यात आली आहे. केरळ आणि हरियाणा या राज्याने मनरेगा अंतर्गत सर्वाधिक १८ रुपयांची मजुरी वाढविली आहे.
यावर्षी मनरेगाच्या मजुरीत २.७ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात यात ५.७ टक्के वाढ झाली होती. १ एप्रिलपासून मजुरीचे नवे दर लागू झालेले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी ही ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार दिली जाते.
प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील मजुरांना या माध्यमातून काम दिले जाते. केंद्र सरकारच्या एका समितीने मनरेगाच्या किमान मजुरीची शिफारस केली होती.
इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात युवा अध्यक्ष
युरोप समर्थक एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला आहे.
३९ वर्षीय मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. मॅक्रॉन यांनी या निवडणुकीत नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ले पेन यांचा पराभव केला.
प्राथमिक अंदाजानुसार इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ६५.५ ते ६६.१ टक्क्यांदरम्यान तर मेरी ले पेन यांना ३३.९ ते ३४.५ टक्क्यांदरम्यान मते मिळाली.
मॅक्रॉन हे उदारमतवादी विचारांचे प्रतिनिधित्व करत असून ले पेन या उजव्या राष्ट्रवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मॅक्रॉन यांनी ले पेन यांच्या विरोधात ६२ टक्के विरुद्ध ३८ टक्के अशी मतांची आघाडी होती.
फ्रान्स आणि युरोपसमोरील राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांना करावा लागणार आहे.
उत्तर फ्रान्समध्ये २१ डिसेंबर १९७७ रोजी जन्मलेल्या मॅक्रॉन यांनी २००४मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती.
२०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
नंतर २०१४ ते २०१६ या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते. २०१६च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.
श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे निधन
सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व असलेले श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कराची येथे निधन झाले.
रईस खान यांचा जन्म १९३९मध्ये इंदोर येथे झाला. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते.
रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले.
वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम मुंबईत केला. सततचा रियाझ व चिंतन यामुळे त्यांनी सतारवादनावर प्रभुत्व मिळवले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील असंख्य सुमधूर गाण्यांसाठी रईस खान यांनी सतारवादन केले आहे.
रईस खान सन १९६८मध्ये पाकिस्तानला वास्तव्यासाठी गेले. गेले काही दिवस ते आजारी होते. ६ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
हिंदुजा बंधू ब्रिटनमध्ये सर्वाधिक श्रीमंत
भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील २०१७ वर्षातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे.
हिंदुजा समूहाची संपत्ती १६.२ अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील १००० प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये ४० अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
‘द संडे टाइम्स रिच लिस्ट’ने ही यादी प्रसिद्ध केली असून ब्रेक्झिटचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे द संडे टाइम्सने म्हंटले आहे.
याउलट ब्रिटनमधील अब्जाधीशांची संपत्ती १४ टक्क्यांनी वाढली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
भारतीय वंशाचे डेव्हीड व सिमॉन रूबेन गेल्यावर्षी या यादीत अग्रस्थानी होते. सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असलेले लक्ष्मी मित्तल आता चौथ्या स्थानी आहेत.
ब्रिटनमधील १००० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ११० दशलक्ष डॉलर्स आहे. ही संपत्ती २०१६ मध्ये १०३ दशलक्ष पौंड होती.
सोहील महमूद भारतातील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त
भारतातील पाकिस्तानचे सध्याचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याजागी सोहील महमूद यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महमूद हे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असून, त्यांनी याआधी अनेक ठिकाणी तणावाच्या परिस्थितीत काम केलेले आहे.
महमूद हे १९८५मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते. अधिकारी म्हणून ते अतिशय मुत्सद्दी असल्याने उच्चायुक्तपदी चांगल्या पद्धतीने काम करु शकतात, असे पाकिस्तान प्रशासनाने म्हटले आहे.
१९९१ ते १९९४ या कालावधीत महमूद यांनी तुर्कीचे उच्चायुक्त पद सांभाळले आहे. तर २००९ ते २०१३ दरम्यान त्यांनी थायलंडमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
याशिवाय त्यांनी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा