सेंटर फॉर मीडिया स्टडीजने देशभरातील २० राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून पोलीस विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागरी सेवा देणाऱ्या विभागांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण जाणून घेण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील ३ हजार लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली होती.
पोलीस विभागानंतर भ्रष्टाचारात जमीन व गृहनिर्माण, न्याय व्यवस्था आणि करसंबंधी विभाग यांचा क्रमांक लागतो.
एफआयआर/तक्रार दाखल करण्यासाठी, आरोपी म्हणून नाव रद्द करण्यासाठी, अटक टाळण्यासाठी आणि वाहतूक पोलिसांनी पावती फाडू नये, म्हणून लाच दिली जात असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
देशातील १० नागरी सेवा देणाऱ्या विभागांनी २०१७मध्ये एकूण ६,३५० कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचे या अहवालातून समोर आले.
२००५साली २०,५०० कोटी रुपयांची लाच देशातील नागरी सेवा देणाऱ्या १० विभागांनी स्वीकारली होती.
नागरी सेवा मिळवण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने लाच द्यावी लागते, असे सर्वेक्षणादरम्यान २० राज्यांमधील जवळपास प्रत्येकाने सांगितले.
दहा रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची लाच नागरी सेवा देणाऱ्या विभागांकडून स्वीकारली जाते.
सर्वेक्षणादरम्यान माहिती घेण्यात आलेल्या व्यक्तींनी सरासरी १,८४० रुपयांची लाच दिल्याची आकडेवारी अहवालातून समोर आली.
८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर भ्रष्टाचाराचे प्रमाण घटल्याची माहिती अनेकांनी दिली.
सुमीत कुमारने हिंद केसरी किताब जिंकला
रेल्वेचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुमीत कुमारने पुण्याचा अभिजीत कटकेवर ९-२ गुणांनी मात करत, ५०व्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ‘हिंद केसरी’ किताब पटकावला.
हिंद केसरी किताबाच्या उपांत्य साखळी गटात सुमीतने अभिजीतला ६-१ अशा गुणांनी हरविले होते. अंतिम फेरीत अपेक्षेइतकी लढत अभिजीत देऊ शकला नाही.
विजेत्या सुमितला रोख अडीच लाख रुपये व चांदीची गदा; तसेच उपविजेत्या अभिजितला रोख दीड लाख व करंडक प्रदान करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
भारताच्या जोश्ना चिनप्पाने भारताच्याच दीपिका पल्लीकलला पराभूत करत आशियाई स्क्वॉश स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी १९९६मध्ये भारताच्या मिशा ग्रेवालने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
पाच गेममध्ये झालेल्या लढतीत जोश्नाने १३-१५, १२-१०, ११-१३, ११-४, ११-४ अशी मात करत विजेतेपद पटकावले.
पुरुष गटात मात्र भारताच्या सौरव घोषालला उपविजेतेपद मिळाले. हाँगकाँगच्या मॅक्स ली याने घोषालला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
आशियाई अॅथलेटिक्स ग्रांप्रि स्पर्धेत भारताला २ सुवर्णपदके
राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू मुहम्मद अनास आणि गोळाफेकपटू ओम प्रकाश कऱ्हाना यांनी आशियाई अॅथलेटिक्स ग्रांप्रि स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सुवर्णपदक जिंकले.
अनासने ४५.६९ सेकंदांची नोंद करून पहिले आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले. मात्र त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची ४५.५० सेकंदांची पात्रता वेळ गाठण्यात अपयश आले.
याआधी त्याने ४५.४० सेकंदांसह राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता आणि गतवर्षी त्याने ४५.४४ सेकंदांची नोंद केली होती.
व्हिएतनामच्या चाँग लीच व कझाकस्तानच्या मिखल लिटव्हीन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कऱ्हानाने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम १९.५८ मीटर अंतर गाठून सुवर्णपदकाची कमाई केली.
त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. चीनच्या वू जिक्सिंग आणि इराणच्या अली समारी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
कऱ्हानाने पहिल्या दोन लीगमध्ये कांस्यपदकांची कमाई केली होती. २०१२साली त्याने सर्वोत्तम २०.६९ मीटरची नोंद केली होती.
तर नीरज चोप्रा (भालाफेक) आणि एमआर पूवाम्मा (महिला ४०० मी.) यांनी आपापल्या गटात कांस्यपदक जिंकले.
गिर्यारोहक उली स्टेकचा अपघाती मृत्यू
जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेट दोन वेळा यशस्वीरित्या पार केलेल्या स्वित्झर्लंडचा सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेकचा माऊंट एव्हरेट चढताना अपघाती मृत्यू झाला.
उली स्टेकने याआधी २०१२ आणि २०१५साली यशस्वीरित्या एव्हरेस्ट सर केला होता. तेही ऑक्सिजन पुरवठ्याविना त्याने ही कमाल केली होती.
अतिशय सहजपणे पर्वत रांगा सर करणाऱ्या स्टेकला ‘स्विस मशीन’ या नावाने ओळखले जायचे.
४०वर्षीय स्टेक यावेळी एव्हरेस्ट शिखर तिसऱ्या नव्या मार्गाने सर करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान ३२८० फूट उंचीवर असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.
स्टेकच्या जाण्याने जगातील गिर्यारोहकांनी दु:ख व्यक्त केले आहे. स्टेकने गिर्यारोहणादरम्यान चित्रीत केलेले व्हिडिओ पाहून युवकांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा