पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारला ३ वर्ष पूर्ण होत असून, या यशस्वी वाटचालीचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपने ‘मोदी फेस्टिव्हल’चे (Making Of Developing India) आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला २६ मे रोजी ३ वर्षपूर्ण होत आहे. त्यानिमित्त २६ मे ते १५ जून पर्यंत देशभरात हा फेस्टिव्हल साजरा केला जाणार आहे.
केंद्रातील मंत्री आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्ते या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असून, देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मोदी देशातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहेत.
२६ मे रोजी गुवाहाटीवरून या दौऱ्याला सुरूवात होईल. त्यानंतर बंगळुरू, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि जयपूर किंवा कोटा या शहरात ते जाणार आहेत.
यावेळी या शहरांमध्ये होणाऱ्या रॅलींना ते संबोधित करतील. यावेळी ते ‘न्यू इंडिया’ नावाने एक कँम्पेनही सुरू करणार आहेत. ही मोहिम २५ मे पासून सुरू होईल.
याशिवाय मोदी देशभरातील २ कोटी सर्वसामान्य लोकांना पत्र पाठवून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे १० कोटी लोकांना एसएमएसही पाठविण्यात येणार आहेत.
‘मोदी फेस्टिव्हल’च्या काळात ५०० शहरात ‘सबका साथ सबका विकासा’चे कार्यक्रमही पार पडणार आहेत.
२६ मे रोजी देशातील ४०० वर्तमानपत्रांमध्ये सरकारच्या कामाचा आढावा घेणाऱ्या जाहिरातीही छापण्यात येणार आहेत. शिवाय टीव्ही आणि रेडियोवरही जाहिराती झळकणार आहेत.
या काळात प्रत्येक मंत्री ४ शहरात जातील. शेतकरी, मजूर, महिला, तरूण, दलित आणि मागासवर्गातील लोकांशी हे मंत्री संवाद साधणार आहेत.
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे
आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट मीडिया लिमिटेडच्या एफडीआयला मंजुरी दिल्या प्रकरणी सीबीआयने वरिष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्थी चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर छापे मारले.
सीबीआयने याप्रकरणी कार्थी, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी, दोन खासगी कंपन्या आणि अर्थमंत्रालयाच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई केली.
पीटर मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया कंपनीच्या एफडीआयला मंजुरी देताना त्यामध्ये भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कारस्थान केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
चिदंबरम पिता-पुत्रांच्या निवासस्थान, कार्यालयासह अन्य आरोपींच्या मुंबई, दिल्ली आणि गुरगाव येथील एकूण १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे मारले.
काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन टर्ममध्ये चिदंबरम यांनी देशाचे अर्थमंत्री आणि गृहमंत्रीपद भूषवले आहे.
रेल्वे स्टेशन्सवर सीसीटीव्हीसाठी ५०० कोटी रुपये मंजूर
रेल्वे परिसरातील सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेद्वारे देशातील रेल्वे स्टेशन्सवर निर्भया निधीतून सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली बसवण्यात येणार आहे.
त्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, या निधीतून ९८३ स्थानकांवर एकूण १९ हजार सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांसह प्रवाशांना सुरक्षित वातावरण लाभणार आहे.
केंद्र सरकारने निर्भया बलात्कारानंतर २०१३मध्ये महिलांच्या संरक्षणासाठी १००० कोटींच्या निर्भया निधीची स्थापना केली होती.
रेल्वेची देशात एकूण ८००० स्थानके असून त्यातील ३४४ स्थानकांवर आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.
याशिवाय राजधानी, हमसफर एक्सप्रेस व तेजस सेवेतील गाड्यांमध्येही सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
माजी प्रमुख माहिती अधिकारी आय राममोहन राव यांचे निधन
देशाचे माजी प्रमुख माहिती अधिकारी तसेच राजीव गांधी, व्ही पी सिंह, आय के गुजराल आणि पी व्ही नरसिंह राव या पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्य केलेले आय राममोहन राव यांचे १३ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
मूळचे कारवारचे असलेले राममोहन शिकण्यासाठी मुंबईला आले. पुढे ते दिल्लीच्या ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो’त (पीआयबी) शिकाऊ उमेदवार म्हणून कामास लागले.
बढत्या मिळवत राव यांनी ‘पीआयबी’तील सर्वोच्च प्रमुख माहिती अधिकारी हे पद ग्रहण केले. पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणून त्यांनी याच पदावरून काम केले.
१९९३साली पी व्ही नरसिंह राव यांनी राममोहन यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जनरल के. व्ही. कृष्ण राव यांचे सल्लागार म्हणून केली.
१९७१च्या युद्धात लष्कराचे ‘युद्धकालीन संप्रेषक’ (कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर) म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.
राममोहन यांनी ‘कॉन्फ्लिक्ट कम्युनिकेटर’ या आत्मचरित्रपर परंतु कामाबद्दल अधिक माहिती असलेल्या पुस्तकाचे लिखाण केले.
नदाल आणि सिमोनाला माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद
माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिइमवर मात करत विजेतेपदावर नाव कोरले.
माद्रिद स्पर्धेचे नदालचे हे पाचवे जेतेपद आहे. ‘एटीपी मास्टर्स १०००’मधील नदालचे हे ३०वे जेतेपद आहे. तर एटीपी कारकिर्दीतील हे त्याचे एकूण ७२वे विजेतेपद आहे.
या विजेतेपदासह राफेल नदालने जागतिक टेनिस क्रमवारीतील पुरुष गटात चौथे स्थान मिळविले आहे. तर इंग्लंडच्या अँडी मरेने प्रथम स्थान राखले आहे.
महिलांच्या विभागात जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सेरेना विल्यम्सला मागे टाकून प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.
‘वन्नाक्राय’ रॅन्समवेअरपासून देशातील राष्ट्रीय संस्थांना धोका
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’ नामक रॅन्समवेअर व्हायरसपासून आपल्या संगणकप्रणालींचे संरक्षण करा, अशा सूचना आयटी मंत्रालयाने महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांना दिल्या आहेत.
यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनआयसी आणि यूआयडीएआय (आधार) यासारख्या संस्थांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) या सायबर सुरक्षा संस्थेलाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रॅन्समवेअर व्हायरसने १५०पेक्षा जास्त देशांत धुमाकूळ घातला आहे. रशिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
‘एक्सपी’सारख्या जुन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या संगणकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.
व्हायरसच्या हल्ल्यानंतर संगणक लॉक होतो. तो उघडण्यासाठी व्हायरस बिटकॉनसारख्या आभासी चलनातील ३०० डॉलरची खंडणी मागतो.
या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून, तो तात्काळ डाऊनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.
वॉनाक्रायपासून बचाव करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सीईआरटी-इन या संस्थेच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
सीईआरटी-इन संस्थेने या रॅन्समवेअरपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याची यादी प्रसिद्ध केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा