केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत नंदिनी केआर हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तर विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून प्रथम आली असून, देशात तिने अकरावा क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत १०९९ उमेदवारांना यश मिळाले आहे.
बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती
लहान मुलांचे दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम बनवण्यासाठी कार्यरत असलेली राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.
बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ रोजी बालचित्रवाणीची स्थापना केली.
बालचित्रवाणीकडून आतापर्यंत ६ हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.
दूरदर्शनवर दररोज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात येत होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
पुण्यामध्ये राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाजवळ बालचित्रवाणीचे प्रशस्त कार्यालय आहे.
बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता संस्थेच्या रेकॉर्डसह बालभारती या संस्थेकडे वर्ग करण्यात येणार आहे.
याठिकाणी लवकरच ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालचित्रवाणी संस्थेमार्फत दूरदर्शनवरून १९८६ ते २०१२ या कालावधीमध्ये नि:शुल्क कार्यक्रम प्रक्षेपित केले जात होते.
मात्र दूरदर्शनने हे कार्यक्रम दाखविण्यासाठी प्रक्षेपण शुल्क आकारल्यामुळे फेब्रुवारी २०१४पासून प्रक्षेपण बंद करण्यात आले.
संस्थेला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानही एप्रिल २००३नंतर बंद झाले. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती.
औद्योगिक कलह कायद्यानुसार ५० पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते. त्यानुसार ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात ‘दरवाजा बंद’ अभियान
संपूर्ण महाराष्ट्र मार्च २०१८ सालापर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘दरवाजा बंद’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० मे रोजी केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेयजल व स्वच्छता मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी २०१८पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, असे प्रतिपादन केले.
आजपर्यंत राज्यातील २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त झालेली आहेत. मार्च २०१८पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त केले जाईल.
तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, वर्धा आणि गोंदिया हे ११ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त झालेले आहेत.
प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दसरी नारायण राव यांचे निधन
प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि यूपीएच्या सरकारमधील माजी कोळसा राज्यमंत्री दसरी नारायण राव यांचे ३० मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दसरी यांनी साधारणपणे १२५ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यासाठी त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही समाविष्ट करण्यात आले होते.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांपैकी प्रेमाभिषेकम, मेघा संदेशाम, ओसे रामुलामा आणि टाटा मनावदु हे चित्रपट पडद्यावर खूप गाजले होते.
तसेच, चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. ते कोळसा मंत्रालयात राज्यमंत्री होते. कोळसा घोटाळा प्रकरणात त्यांच्या नावाचाही समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा