भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) ५ मे रोजी दक्षिण आशियाई उपग्रहाचे (जीसॅट-९) अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या जीएसलव्ही एफ-०९ या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-९ चे प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट-९च्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा असेल.
या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे.
जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल.
दक्षिण आशियातील ७ देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवचा समावेश आहे. पाकिस्तानचा या उपक्रमात सहभाग नाही.
या उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यातदेखील जीसॅट-९ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
या उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये नेपाळमधल्या १८व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती. त्यानंतर इस्रोकडून ‘सार्क उपग्रह’ विकसित करण्याचे काम सुरू झाले होते.
पाकिस्तानने यात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे सार्कऐवजी 'दक्षिण आशियाई उपग्रह' असे या उपग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे.
सीआयआयच्या अध्यक्षपदी शोभना कामिनेनी
‘सीआयआय’ अर्थात भारतीय औद्योगिक महासंघाच्या अध्यक्षपदी शोभना कामिनेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय औद्योगिक महासंघ ही उद्योग जगताची सर्वोच्च व देशव्यापी बिगरसरकारी संघटना आहे.
सीआयआयच्या स्थापनेपासून या संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या शोभना या पहिल्या महिला आहेत.
शोभना यांनी अर्थशास्त्रातील स्नातक पदवी तसेच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून रुग्णालय व्यवस्थापन विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
दक्षिणेत विशेष लोकप्रिय असलेल्या व रुग्णालय साखळीचे विस्तृत जाळे असलेल्या अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेसच्या त्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत.
अपोलो रुग्णालयाचे प्रकल्प, पायाभूत सुविधा आदींमध्ये त्या लक्ष घालतात. तसेच अपोलो फार्मसी या औषध व्यवसायाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
अपोलो समूहातील केईआय या मालवाहतूक तसेच पायाभूत सेवा कंपनीच्याही त्या उपाध्यक्षा आहेत. पतीबरोबर त्यांनी या कंपनीची स्थापना केली.
समूहाची आरोग्य विमा क्षेत्रातील अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्सची त्यांनी सहा वर्षांपूर्वी स्थापना केली.
अपोलो ग्लोबल प्रोजेक्ट्स कन्सल्टन्सी आणि अपोलो फार्माच्या संशोधन व नावीन्य विभागाचे प्रमुखपदही त्या सांभाळतात.
ब्ल्यु स्टार, हीरो मोटोकॉर्पसारख्या कंपन्यांवर त्या स्वतंत्र संचालक आहेत. एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प.), सिस्कोसारख्या कंपन्यांवर त्या सल्लागार आहेत.
आरोग्यनिगासारख्या क्षेत्रात येणाऱ्या संबंधांमुळे त्यांनी ‘बिलियन हार्ट्स बिटिंग’ ही सामाजिक संस्थाही स्थापन केली आहे.
निर्भया प्रकरणात चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या दिल्ली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
निर्भया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे निर्भयाला न्याय मिळवून दिल्याची भावना देशभरात व्यक्त होत आहे.
दोषींचे कृत्य प्रचंड घृणास्पद असल्याचे तसेच या प्रकरणातील क्रौर्य अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना साकेतच्या जलदगती न्यायालयाने फाशीची सुनावली होती. यावर १४ मार्च २०१४रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.
यानंतर दोषींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयाप्रमाणे केली. प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी आणि शनिवारी प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात असताना आत्महत्या केली, तर अल्पवयीन आरोपीने बालसुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे.
ब्रिटनचे प्रिन्स फिलिप शाही जबाबदारीतून निवृत्त
ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक ऑफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
९५ वर्षीय फिलिप येत्या ऑगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत.
राजे फिलिप सुमारे ७८० विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत.
ड्यूक ऑगस्टपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होत राहतील. त्यानंतर ते दौरे आणि भेटीगाठींचे कोणतेही नवे निमंत्रण स्वीकारणार नाहीत.
प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले आहेत. यात भारताच्या तीन दौऱ्यांचाही समावेश आहे.
त्यांनी १९६१मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर १९८३ आणि १९९७मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते.
फिलीप यांचा जन्म ग्रीसमध्ये झाला. ते १८ महिन्याचे असताना त्यांच्या कुटुंबाला ग्रीस सोडून बाहेर पडावे लागले.
वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी रॉयल आर्मीत कामाला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात ते लढले आणि त्यासाठी त्यांना ग्रीक वॉर क्रॉस ऑफ ऑनरही मिळाला.
ते उत्तम विमान चालवतात. वयाच्या ७०व्या वाढदिवसापर्यंत त्यांनी ५००० पायलट आवर्स इतके तास विमान चालविले आहे.
दूरदर्शनवर मुलाखत देणारे ते राजघराण्यातील पहिले सदस्य आहेत. १९६१मध्ये कॉमनवेल्थ संदर्भात त्यांची मुलाखत घेण्यात आली होती.
शिवपाल यादव यांचा समाजवादी सेक्युलर मोर्चा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर आता समाजवादी पक्षात फूट पडली असून पक्षाचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
समाजवादी सेक्युलर मोर्चा असे या पक्षाचे नाव असून या पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव असणार आहेत.
मुलायम सिंह यादव यांचा सन्मान परत आणण्यासाठी आणि समाजवादी लोकांना एकत्र आणण्यासाठी या पक्षाच्या माध्यमातून कार्य करण्यात येईल, असे शिवपाल यादव यांनी म्हंटले आहे.
मुलायम सिंह यादव यांनी १९९२मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पक्षात अंतर्गत वाद-विवाद होत होते.
त्याचबरोबर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाच्या तिकीट वाटपावरुन समाजवादी पक्षाचे नेत्यांमध्ये फुट पडली होती.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा एक गट आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्यासह काही नेत्यांचा दुसरा गट तयार झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा