चालू घडामोडी : ९ मे
पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लीला सेठ यांचे निधन
- दिल्ली हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांच्या त्या मातोश्री होत्या.
- लीला सेठ यांनी १९५८साली लंडनमध्ये विधी परिक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. या परिक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- त्यानंतर त्यांनी पटना हायकोर्टात वकिली व्यवसायाला सुरूवात केली. लीला सेठ यांची १९७८साली दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली.
- त्यानंतर १९९१साली हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक होणाऱ्या त्या महिला न्यायाधीश ठरल्या.
- हिंदू वारसा हक्क कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. या बदलामुळे एकत्रित कुटुंबात मुलींनाही संपत्तीचा अधिकार मिळाला.
- देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बलात्कार विरोधी कायद्यात सुधारणांसाठी निवृत्त न्यायाधीश जे एस वर्मा यांची जी समिती नेमली होती त्यात त्यांचा समावेश होता.
- समलिंगींच्या हक्कांबाबत त्यांनी ‘इंडिया यू आर क्रिमिनल इफ गे’ हा टीकात्मक लेख ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता.
- ‘शक्तिमान’ या मालिकेचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित ‘वुइ दी चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.
- त्यांचे आत्मचरित्र ‘ऑन बॅलन्स’ २००३मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी व्यावसायिक जीवनात त्यांना आलेल्या लिंगभेदाच्या अनेक अनुभवांचा उल्लेख केला आहे.
- पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत ज्या समस्या त्यांना जाणवल्या त्यावर ‘टॉकिंग ऑफ जस्टिस – पीपल्स राइट्स इन मॉडर्न इंडिया’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
वादग्रस्त न्यायाधीश कर्णन यांना ६ महिने कारावास
- न्यायाधीशांविरोधात बंड पुकारणारे कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीश सी एन कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
- कर्णन यांनी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह न्यायालयीन व्यवस्थेबाबत बंड पुकारले होते.
- कर्णन यांनी काल अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे एस खेहर यांच्यासह आठ न्यायमूर्तींना पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.
- त्याविरोधात खेहर यांच्यासह उर्वरित न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- त्यामुळे कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावली.
- न्यायधीश म्हणून कार्यरत असताना अशाप्रकारे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्णन हे पहीलेच न्यायाधीश आहेत.
झुलन गोस्वामी सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज
- भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज ठरली आहे.
- मध्यमगतीने गोलंदाजी करणाऱ्या झुलन गोस्वामीने ९ मे रोजी दक्षिण आफ्रिकेविरुध्द ७.३ षटकांमध्ये ३ विकेट घेत हा विक्रम केला.
- झुलनने ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रिक हिला मागे टाकून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान पटकावला आहे.
- झुलनने २००२साली आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात केली होती. तिने आतापर्यंत १५३ सामन्यांमध्ये १८१ विकेट्स घेतल्या आहेत.
- तर कॅथरिनने १९९३-२००७ पर्यंतच्या करिअरमध्ये १०९ सामने खेळले आहेत. यात तिने ३.०१ च्या इकोनॉमीने गोलंदाजी करून १८० विकेट घेतल्या होत्या.
प्रा विक्रम विशाल यांना तरुण वैज्ञानिक पुरस्कार
- आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
- भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि २५ हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- प्रा विशाल सध्या कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.
- २०१५पर्यंत भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ७३७ तरुण वैज्ञानिकांचा सन्मान केला आहे.
लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी
- चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
- लालू प्रसाद यादव आणि अन्य व्यक्तींच्या विरोधातील कलमे काढून टाकण्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
- चारा घोटाळ्यातील विविध प्रकरणांची सुनावणी स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य केली आहे.
- चारा घोटाळ्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेला लालू प्रसाद यादव यांनी आव्हान दिले होते.
- सुमारे ९०० कोटींचा चारा घोटाळा १९९०मध्ये बिहारच्या पशुपालन विभागात झाला होता. त्या कालावधीत लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा