केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन
केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय ६०) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी त्यांची ओळख होती.
दररोज दोन वेळा न चुकता योगसाधना करणारे दवे प्रकृतीबाबत अत्यंत दक्ष मानले जायचे. दवे यांना जानेवारीमध्ये न्यूमोनिया झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती विलक्षणरीत्या ढासळली होती.
६ जुल १९५६ मध्ये उज्जनजवळील बारनगर येथे जन्मलेल्या दवेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी नेते होते, नंतर संघप्रचारक बनले.
नर्मदा अभियानात ते सहभागी झाले होते. ‘चरैवेती चरैवेती’ आणि ‘जन अभियान परिषद’ अशा दोन नियतकालिकांचे ते संपादन करायचे.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते वैमानिक झाले होते. २००३मधील उमा भारतींच्या मध्यप्रदेशातील विजयात त्यांचा मोठा वाटा होता.
२००९मध्ये ते प्रथम राज्यसभा खासदार झाले. २०१५मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. मागील वर्षीच ते वने व पर्यावरण मंत्री झाले.
छत्रपती शिवराय, विवेकानंद आणि भगतसिंह ही दवेंची आराध्य दैवते होती. शिवरायांबद्दलची त्यांची ओजस्वी भाषणे खूप गाजली.
शिवरायांच्या रणनीतीवर, प्रशासन कौशल्यावर लिहिलेले ’शिवाजी आणि सुराज्य’ हे त्यांचे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण मानले जाते.
दवे यांच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा विशेष ठरावही संमत केला.
त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
श्रीनिवास कुलकर्णी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कार
भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
वैज्ञानिक श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीची स्थापना आणि संचालनाच्या कामासाठी श्रीनिवास कुलकर्णी ओळखले जातात.
अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशाने त्यांनी केलेले सर्वेक्षण जगभरात वाखाणले गेले आहे.
‘रेडिओ पल्सर’ (खगोल प्रकाशस्त्रोत) या ताऱ्यासंदर्भात त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी भरीव संशोधन केलेले आहे.
दहा नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंत्रिमंडळाची मंजुरी
देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या १० नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे.
एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.
जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत. तर २००५ आणि २००६मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे.
नव्या अणुभट्ट्यांची क्षमता जुन्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत जास्त म्हणजेच सुमारे ७०० मेगावॉट इतकी असणार आहे.
त्यांची उभारणी राजस्थानातील माही बंसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा आणि मध्य प्रदेशातील चुटकामध्ये करण्यात येणार आहे.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
२०२१-२२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार आहेत. त्यामुळे उर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ होणार असून वीजेचे दरदेखील कमी होणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन
मराठी नाटक, तसेच मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (वय ५९ वर्ष) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रीमा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव नयन भडभडे होते. रंगभूमीचा वारसा त्यांना आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून लाभला.
हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा चित्रपटांतून बेबी नयन या नावाने बालकलाकार म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.
कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांचे हे सर्व रोल्स चांगलेच गाजले.
कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर बरोबरची तूतू-मेंमें, श्रीमान-श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या.
पुरुष, सविता दामोदर परांजपे, घर तिघांचं हवं, झाले मोकळे आकाश, के दिल अभी भरा नही या नाटकांतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
आई शपथ, सातच्या आत घरात, मुक्ता अशा काही मराठी चित्रपटांतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आप के हैं कौन, वास्तव आदी हिंदी चित्रपटांतील कसदार अभिनयातून ‘आई’च्या भूमिकेलाही त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले.
मैने प्यार किया (१९९०), आशिकी (१९९१), हम आपके हैं कौन (१९९५), वास्तव (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी रीमा लागू यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नाटके : घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे कार्ट चालू आहे, छापाकाटा.
मालिका : खांदान, श्रीमान-श्रीमती, तूतू-मेंमें, दो और दो पाच, धडकन, कडवी खट्टी मिठ्ठी, दो हंसो का जोडा, तुझ माझ जमेना, नामकरण इत्यादी
हिंदी चित्रपट : मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी इत्यादी
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जाधव हे हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून जाधव हे ‘रॉ’चे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना राजनैतिक तसेच कायदेशीर मदत मिळाली पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.
भारताने पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा