चालू घडामोडी : ३ मे
जगप्रसिद्ध गियार्रोहक ऊली स्टेक यांचा मृत्यू
- जगप्रसिद्ध गियार्रोहक ऊली स्टेक यांचा ३० एप्रिल रोजी एव्हरेस्ट शिखर परिसरातील नूपतसे (उंची ७८६१ मीटर्स) या शिखरावर चढाई करताना अपघाती मृत्यू झाला.
- जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट (उंची ८८५० मीटर्स) शिखरावर नव्या मार्गाने चढाई करण्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी ते नेपाळमध्ये आले होते.
- या मोहिमेच्या तयारीसाठी ते गेले २ महिने माऊंट एव्हरेस्टच्या परिसरातील वेगवेगळ्या शिखरांवर चढाई करत होते.
- या तयारीचा भाग म्हणून नूपतसे या शिखरावर ते चढाई करत असताना त्यांचा पाय घसरून हा पघात झाला.
- ऊली स्टेक हे स्वित्झर्लंड या देशाचे होते. उंच शिखरे सर करण्याच्या त्यांच्या वेगामुळे ते ‘स्विस मशीन’ या नावाने प्रसिद्ध होते.
- जगातील सर्वोत्तम गिर्यारोहकांपैकी ते एक असे होते. ते त्यांच्या स्पीड क्लायंबिंग आणि तंत्रशुद्ध क्लायंबिंगसाठी जगप्रसिद्ध होते.
- गिर्यारोहणामध्ये स्पीड क्लायंबिंगची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आणली. स्पीड क्लायंबिंगमधले अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.
- वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एका मागोमाग एक अशा अनेक दर्जेदार मोहिमा त्यांनी एकट्याने (सोलो) पूर्ण केल्या.
- त्यांना गिर्यारोहणामधले अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. २००८मध्ये माऊंट एंगर स्पीड क्लायंबिंगसाठी पुरस्कार मिळाला होता.
- तसेच २०१४मध्ये माऊंट अन्नपूर्णा साऊथ फेसची चढाई एकट्याने विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल गिर्यारोहणामधला सर्वोत्कृष्ट अशा मानाच्या पि लो डि-ओर या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
- उली स्टेक यांनी यापूर्वी २०१२ आणि २०१५साली ऑक्सिजन पुरवठ्याविना यशस्वीरित्या माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते.
मध्य प्रदेशमध्ये आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर
- मध्य प्रदेश सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एप्रिल ते मार्च हे वित्त वर्ष बदलून जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अलिकडेच झालेल्या नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वित्त वर्ष बदलण्याचा विचार बोलून दाखविला होता.
- कृषी उत्पन्नाला अनन्यसाधारण महत्त्त्व असलेल्या आपल्या देशात कृषी उत्पन्न येताच लगेच अर्थसंकल्प मांडला जायला हवा, असे मोदी म्हणाले होते.
- या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असून, यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये घेतले जाईल.
- आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे.
२४ जानेवारी ‘उत्तर प्रदेश दिवस’ म्हणून साजरा होणार
- उत्तर प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये २४ जानेवारी हा दिवस ‘उत्तर प्रदेश दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘युनायटेड प्रॉव्हिन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे २४ जानेवारी १९५०मध्ये ‘उत्तर प्रदेश’ असे नामकरण करण्यात आले.
- त्यामुळे २४ जानेवारी हा दिवस उत्तर प्रदेशमध्ये यापुढे ‘उत्तर प्रदेश दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करण्यात येईल.
- लखनौच्या राजभवनात साजऱ्या झालेल्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात उत्तर प्रदेशलाही स्थापना दिन असावा ही बाब योगी आदित्यनाथ यांना जाणवली.
- उत्तर प्रदेशचे राज्यपाल असलेल्या राम नाईक यांनी आदित्यनाथ यांच्यासमोर युपी दिनाचा प्रस्ताव मांडला.
- प्रत्येक राज्याला त्याची अस्मिता, संस्कृती जपण्यासाठी असा दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे असा राम नाईक यांचा आग्रह होता.
- याआधी त्यांनी अखिलेश सरकारलाही अशी विनंती केली होती. मात्र त्यावेळी दुर्लक्षित राहिलेली ही मागणी योगींनी मात्र तातडीने पूर्ण केली.
तिहेरी तलाक खटल्यात सलमान खुर्शिद न्याय मित्र म्हणून नियुक्त
- सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या तिहेरी तलाक खटल्यात न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद यांची अमायकस क्युरी (न्याय मित्र) म्हणून नियुक्ती करण्याला मान्यता दिली आहे.
- येत्या ११ मेपासून सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची कायदेशीर वैधता ठरविण्यासाठी रोज सुनावणी घेण्यात येणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या खटल्याच्या कामकाजाला गती देण्यासाठी सदर प्रकरण न्यायमूर्तींच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडे सुपूर्द केले होते.
- समान नागरी कायद्याच्या वादात न पडता या प्रकरणाचा विचार करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
- काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’च्या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका, असे आवाहन मुस्लिम समाजाला केले होते.
- याच समाजातील विचारवंत मंडळी या प्रथेच्या निर्मूलनासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
- भारतातील मुस्लिमांनी केवळ देशातील नव्हे तर जगातील मुस्लिमांना आधुनिकतेचा मार्ग दाखवावा, असे आवाहनही मोदी यांनी केले होते.
अमेरिकेचा व्हिसा असलेल्या भारतीयांना यूएईमध्ये थेट प्रवेश
- अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेल्या भारतीयांना १ मे पासून यूएईमध्ये थेट प्रवेश सुरू करण्यात आला आहे.
- ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिसा मिळणार आहे.
- यूएईच्या कॅबिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली होती. १ मे पासून त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे.
- भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने तसेच जागतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी यूएईने हे पाउल उचलले आहे.
- भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास ६ हजार कोटी डॉलरची उलाढाल होते.
- मेक इन इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे.
- यूएई भारतात २७०० कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत ३३०० कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो.
- त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा