आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सुमारे ९.१५ किमी लांबीच्या धोला-सादिया पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ मे रोजी झाले.
भविष्यात ईशान्य भारताचा र्सवकष विकास सांधणारा हा सेतू पंतप्रधानांनी देशाला अर्पण करताना या पुलाला प्रख्यात आसामी गायक भूपेन हजारिका यांचे नाव देण्याची घोषणा केली.
या पुलामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आसाम व तिथून पुढे देशभर पाठविण्यास मदत होणार आहे.
सुपरकॉप केपीएस गिल यांचे निधन
‘सुपरकॉप’, ‘पंजाबचा शेर’ अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक कंवरपाल सिंह गिल ऊर्फ केपीएस गिल यांचे २६ मे रोजी दिल्लीत निधन झाले.
गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गिल तेवीसाव्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती ईशान्य भारतात करण्यात आली.
आपल्या कार्यपद्धतीने आसाम-मेघालयातही दरारा निर्माण केला. त्यांनी आसामचे पोलीस महानिरीक्षक पदही भूषविले.
पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करण्यात गिल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे ते ‘सुपरकॉप’ नावाने ओळखले जाऊ लागले.
१९८८मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’चे नेतृत्त्व गिल यांनी केले होते.
१९८८ ते १९९० दरम्यान पंजाब पोलीस महासंचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर १९९१मध्ये त्यांची पुन्हा पंजाबच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
निवृत्तीनंतर छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गिल भारतीय हॉकी संघाचे माजी अध्यक्षसुद्धा होते.
प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल १९८९मध्ये केपीएस गिल यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
यूएनएफसीसीसीच्या उपकार्यकारी सचिवपदी ओवैस सरमद
मूळचे भारतीय, पण लंडनमध्ये राहणारे ओवैस सरमद यांची नियुक्ती आता युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी)चे उपकार्यकारी सचिव या पदावर झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अॅण्टोनियो गेटरस यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सरमद यांची नियुक्ती केली.
वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार अशी ओळख असलेल्या सरमद हे मूळचे हैदराबादचे असून, त्यांचा जन्म १९६०साली झाला.
स्थानिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बीकॉम पदवी मिळवली.
नंतर ते लंडनला गेले व तेथील चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स या विख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली.
नंतर सरकारी आणि खासगी क्षेत्रांत वित्तीय व्यवस्थापनातील विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९०मध्ये स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत ते रुजू झाले.
सुरुवातीची काही वर्षे ते या संघटनेच्या अर्थसंकल्प विभागात होते. कालांतराने ते या विभागाचे प्रमुख बनले.
संघटनेच्या व्यवस्थापनाबरोबरच संघटनेची धोरणे निश्चित करण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
संघटनेचे काम वाढवण्याबरोबरच संघटनेतील सदस्यांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचे मोठे काम त्यांनी केले.
ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या कामाशी निगडित राहावी, यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा