ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जगन्नाथ वाणी यांचे निधन
विविध सामाजिक उपक्रमांतून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कॅनडास्थित डॉ. जगन्नाथ वाणी यांचे ५ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
डॉ. वाणी यांचा जन्म ११ सप्टेंबर १९३४ रोजी धुळ्यात झाला. त्यांनी धुळ्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर उच्चशिक्षण पुण्यात, तर विद्या वाचस्पती पदवी कॅनडात मिळवली.
पुणेस्थित गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधक साहाय्यक पदावर काम केल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठ, मेरीज विद्यापीठ, कॅलगिरी विद्यापीठात अध्यापन केले.
कॅलगिरी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद सांभाळताना विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती केली.
मराठी भाषा संशोधन व विकासासाठी डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था स्थापन करून या क्षेत्रात भरीव योगदान दिले.
मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी त्यांनी स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
कॅनडात त्यांनी वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी आणि महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. डॉ. वाणी हे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक होते.
कॅनडामध्ये भारतीय संगीताचा प्रसार करण्यासाठी ‘रागमाला म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगिरी’ची स्थापना केली.
मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळा, गरीब विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी, गरजू रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया अशा विविध कार्यात डॉ. वाणी यांचा अखेपर्यंत मोलाचा सहभाग राहिला.
२०१२मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच भारतात राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला होता.
वाणी यांच्या कार्याचा गौरव अल्बर्ट कल्चर, इंडिया-कॅनडा असोसिएशन ऑफ गॅलरी जीवन गौरव आदी पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात आला.
डॉ. वाणी यांनी जनजागृतीसाठी निर्माण केलेले चित्रपट:-
एक कप चा (माहिती अधिकाराच्या प्रचारासाठी)
डॉक्टर, बाळ बोलत नाही (जन्मतःच मूक-बधिर असलेल्या मुलांवर)
देवराई (स्किझोफ्रेनिया-मनोविदलतेच्या आजारावरील)
डॉ. वाणी यांनी लिहिलेली पुस्तके:-
अंधारातील प्रकाशवाटा
Probability and Statistical Inference
Triumphs and Tragedies
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवले.
पुनियाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या ली सीयुंग च्युलवर विजय मिळवला. या कुस्ती स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
याआधी महिला गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि दिव्या काकरन यांनी रौप्यपदक मिळविले होते.
पहिल्यांदाच ६० किलो वजनी गटातून खेळणाऱ्या साक्षी मलिकला अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
अमिताभ बच्चन ‘डब्लूएचओ’चे हेपेटायटिस सदिच्छा दूत
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) हेपेटायटिसबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
हेपेटायटिसचे या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील.
विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह आग्नेय आशियात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. भारतात पंजाबमध्ये हेपेटायटिसचे सर्वाधिक रुग्ण आढळतात.
बाळ जन्मल्यानंतर २४ तासांत एक आणि त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत लसीचे तीन डोस दिल्यास आईपासून बाळाला होणाऱ्या हेपटायटिसच्या संसर्गास पायबंद बसतो.
हिपेटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. तो कमी करण्यासाठी आणि औषधे सर्वत्र उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
९०हून अधिक देशांमध्ये एकाचवेळी सायबर हल्ले
जगभरातील ९०हून अधिक देशांमधील हॉस्पिटल्स, दूरसंचार कंपन्या आणि इतर अनेक कंपन्यांच्या वेबसाइट हॅकर्सनी १२ मे रोजी हॅक केल्या.
अमेरिकेच्या गुप्तचर संस्था ज्या तंत्राचा वापर करतात त्याच तंत्राचा उपयोग या सायबर हल्ल्यात करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या वेबसाइट हॅक करण्याच्या तंत्राचा वापर करून खंडणीच्या हेतूने हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात हे सायबर हल्ले केले.
या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका ब्रिटनमधील आरोग्य सेवांना बसला. हल्ल्यांमध्ये हॉस्पिटल्समधील वॉर्ड आणि आपत्कालीन विभाग बंद करण्यात आले होते.
ब्रिटन प्रमाणेच स्पेन, पोर्तुगाल आणि रशियातही सायबर हल्ले झाले. ९० हून अधिक देशांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला.
सायबर हल्लेखोरांनी मालवेअरद्वारे हॉस्पिटलच्या कम्प्युटर्स लॉक केले. आणि ३०० ते ६०० अमेरिकन डॉलर्स खंडणीची मागणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा