‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल व क्रमवारीरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रसिद्ध केला.
‘ए वन’ श्रेणीतील ७५ व ‘ए’ श्रेणीतील ३३२ अशा एकूण ४०७ प्रमुख रेल्वे स्थानकांचे हे स्वच्छता सर्वेक्षण केले गेले होते.
या दोन्ही श्रेणींमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले १० क्रमांक पटकाविणाऱ्या स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन स्थानकांचा समावेश आहे.
‘ए वन’ श्रेणीमध्ये पुणे नवव्या तर ‘ए’ श्रेणीमध्ये अहमदनगर स्टेशन क्रमवारीत तिसऱ्या आणि बडनेरा सहाव्या क्रमांकावर आहेत. ‘ए वन’ श्रेणीमध्ये विशाखापट्टणम पहिल्या स्थान पटकावले आहे.
‘ए वन’ विभागात पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तवी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनऊ अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बॅंगलोर यांचा समावेश आहे.
ए विभागात बियास, खम्माम, अहमदनगर, दुर्गापूर, मंचेरीयल, बडनेरा, रंगिया, वर्णागळ, दामोह आणि भूज हे टॉप टेनमध्ये आहेत.
याबरोबरच अस्वच्छ स्टेशनची यादीही तयार करण्यात आली असून दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅंट सर्वात अस्वच्छ स्टेशन असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे.
या विभागाला ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग’ असे नाव देण्यात आले आहे.
या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित करण्यात आले आहेत.
विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे या नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.
या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे काम हा विभाग करेल. तसेच इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील.
चारही प्रवर्गांसाठी स्वयंसेवी आणि अशासकीय संस्थांना अर्थसहाय्य आणि अनुदान देणे, या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे ही कामेही नवीन विभागामार्फत चालतील.
या विभागासाठी पदनिर्मिती व आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली असून लवकरच पूर्णवेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
मेक्सिकोतील ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची हत्या
अमली पदार्थाची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी याबाबतचे वृत्तांकन करण्यात हातखंडा असलेले ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोतील सिनाओला येथे हत्या करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांत हत्या करण्यात आलेले वाल्डेझ हे सहावे आणि रेजिना मार्टिनेझ पेरेझ यांच्यानंतर हत्या करण्यात आलेले दुसरे मोठे पत्रकार आहेत.
सिनाओलाची राजधानी क्युलिअॅकन येथे १५ रोजी वाल्डेझ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
वाल्डेझ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार होते आणि अमली पदार्थाच्या व्यापारावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
‘लोस मोरोस डेल नार्को’ हे अमली पदार्थविक्रीत नकळत ओढल्या जाणाऱ्या लहान मुलांविषयीचे तसेच 'मिस नार्को' ही प्रसिद्ध पुस्तके वाल्डेझ यांनी लिहिलि आहेत.
कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट्स’ या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना २०११सालचा ‘प्रेस फ्रीडम अॅवॉर्ड’ हा पुरस्कार दिला.
तसेच आंतर-अमेरिका खंडीय सामंजस्य वाढविण्यासाठीचा पुरस्कार अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिला.
फोर्ब्सच्या ‘मिडास २०१७’ यादीत ११ भारतीय
फोर्ब्स नियतकालिकाने जारी केलेल्या ‘मिडास २०१७’ या जगातील १०० सर्वोत्तम व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्सच्या यादीत ११ भारतीय गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स हे स्टार्टअप किंवा छोट्या कंपन्यांना भांडवल पुरवितात अथवा भांडवल उभारण्यास मदत करतात.
आयपीओ, अधिग्रहण किंवा खाजगी धारण या माध्यमातून पैसे उभे करणाऱ्या तसेच केलेल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळविणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
सेक्वेईया कॅपिटलचे भागिदार जीम गोयेट्झ या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी व्हॉटसअॅपची फेसबुकला २२ अब्ज डॉलरला विक्री केली होती.
या यादीतील ११ भारतीयांमध्ये नीरज अग्रवाल हे सर्वोच्च स्थानी आहेत. यादीतील त्यांचा क्रमांक १७वा आहे. मिडास यादीत स्थान मिळविण्याची अग्रवाल यांची ही सलग सातवी वेळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा