राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी गयारुल हसन
गेले दोन महिने एकही सदस्य नसलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर केंद्र सरकारने अखेर अध्यक्षासह पाच सदस्यांची नियुक्ती केली आहे.
उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते गयारुल हसन यांना आयोगाचे अध्यक्ष नेमण्यात आले आहे.
आयोगावर नियुक्त इतर सदस्य:-
केरळमधील भाजपा नेते जॉर्ज कुरियन
महाराष्ट्राच्या माजी मंत्री सुलेखा कुंभारे
जैन समाजाचे गुजरातमधील प्रतिनिधी सुनील सिंघी
उदवाडा अथोर्नान अंजुमनचे मुख्य पुरोहित वडा दस्तुरजी खुर्शेद
जैन समाजाला सन २०१४मध्ये अल्पसंख्य दर्जा मिळाल्यानंतर या समाजाचा प्रतिनिधी प्रथमच या राष्ट्रीय आयोगावर नेमला गेला आहे.
आयोगाचे आणखी दोन सदस्य येत्या दोन दिवसांत नेमले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराट्रियन आणि जैन या धार्मिक अस्पसंख्य समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा आयोग काम करतो.
या राष्ट्रीय आयोगाखेरीज जेथे अल्पसंख्य समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे अशा महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये राज्यस्तरीय अल्पसंख्य आयोगही कार्यरत आहेत.
आजवर आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश किंवा ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी नेमण्याची प्रथा होती.
यावेळी प्रथमच अध्यक्षांसह सर्व सदस्य सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांमधून नेमण्यात आले आहेत.
महाराष्ट्राची आदर्श अंगणवाडी योजना
राज्य सरकारने अंगणवाडीमधील शिक्षण आनंददायी व्हावे तसेच तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी ‘आदर्श अंगणवाडी योजना’ आखली आहे.
शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्याद्वारे ही योजना राबविण्यात येईल. यासाठी सुमारे ८५ कोटी रुपये खर्च खर्च अपेक्षित आहे.
या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ५ हजार अंगणवाड्या आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘आदर्श अंगणवाडी’मध्ये सौरऊर्जा संच, ई-लर्निंग, मुलांसाठी टेबल-खुर्च्या, शैक्षणिक साहित्य, स्वच्छ भारत कीट, वीजविरहित वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक वजन-काटे, उंची मोजण्यासाठीच्या टेप हे साहित्य असेल. तसेच अंगणवाडीची इमारत शैक्षणिक मदत केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.
या सर्व सेवा पुरविण्यासाठी एका अंगणवाडीला १.६५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार ५००० अंगणवाड्यांसाठी ८४.५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
त्यासाठी राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे.
६ महसूल विभागांत ५ हजार अंगणवाड्या आदर्श करताना प्रत्येक महसूल विभागात ८३३ तर प्रत्येक जिल्ह्यात १४४ अंगणवाड्या आदर्श केल्या जातील.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे या योजनेचे सनियंत्रण राहणार आहे.
यासाठी सनियंत्रण, मार्गदर्शनासाठी सुकाणू समिती व अंमलबजावणीसाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या आदर्श अंगणवाड्यांना अनुक्रमे ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
तर राज्यातील पहिल्या तीन आदर्श अंगणवाड्यांना १ लाख, ६५ हजार व ३५ हजार याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.
घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने जगातील दहा घनदाट लोकवस्तीच्या शहरांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये मुंबई शहर जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
या यादीमध्ये राजस्थानातील कोटा शहरानेही स्थान मिळविले असून, कोटा शहर घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये सातव्या स्थानावर आहे.
या यादीमध्ये बांगलादेशातील ढाका शहर पहिल्या स्थानावर आहे. ढाक्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी ४४,५०० नागरीक वास्तव्य करतात.
मुंबईत प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी ३१,७०० लोक राहतात. तर कोटामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी १२,१०० लोक वास्तव्य करतात.
या यादीत मेडीलीन तिसऱ्या, मनिला चौथ्या, कासाब्लानका पाचव्या, लागोस सहाव्या, अबुजा आठव्या, सिंगापूर नवव्या आणि जकार्ता दहाव्या स्थानावर आहे.
जगातील घनदाट लोकवस्तीची सहा शहरे आशिया खंडात, तीन आफ्रिका खंडात आणि एक दक्षिण अमेरिकेत आहे.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला सिडने शांतता पुरस्कार
मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या चळवळीला २०१७ या वर्षासाठीचा सिडने शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
जागतिक शांततेसाठी झटणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गेल्या सुमारे दोन दशकांपासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
यापूर्वी तत्त्वज्ञ नॉम चॉम्स्की, आर्चबिशप डेस्मण्ड टुटू, गरिबांसाठी ग्रामीण बँक सुरू करणारे प्रा. मोहम्मद यूनुस आदी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही मानवी हक्कांसाठी लढणारी चळवळ पॅट्रिस क्युलर्स, ॲलिशिया गार्झा आणि ओपल तोमेती या अमेरिकेतील ३ तरुणींनी सुरू केली.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ अशा हॅशटॅगचा वापर प्रथम गार्झा यांनी फेसबुकपोस्टद्वारे केला. वर्णविद्वेष आणि पोलिसी हिंसाचाराविरोधात तिने सुरू केलेल्या मोहिमेला अमेरिकेसह जगभरातून पाठिंबा मिळाला.
सामाजिक विषमता, कृष्णवर्णीयांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, पोलीस कोठडीत त्यांच्यावर होणारे अनन्वित अत्याचार या विरोधात ठिकठिकाणी त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले.
जगभरातील तरुणाई या चळवळीशी जोडली गेली. वर्णद्वेषातून कुणावरही अन्याय होत असल्यास या चळवळीतील कार्यकर्ते सनदशीर मार्गाने आंदोलन करतात.
२०१४मध्ये मायकेल ब्राऊन आणि एरिक गार्नर या दोन कृष्णवर्णीयांची अनुक्रमे फर्गसन आणि न्यूयॉर्क येथे हत्या झाली तेव्हा हा मुद्दा या चळवळीने हाती घेतला.
परिणामी, फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांनी अमेरिकी पोलिसांच्या दादागिरीवर तेव्हा प्रहार केला.
गार्झा, पॅट्रिस आणि ओपल या तिघी जणींना आणि त्यांच्या चळवळीला आज जगभरात मान्यता मिळाली आहे.
रविचंद्रन अश्विनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार
भारताचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला सीएट क्रिकेट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने (२०१७) गौरविण्यात आले आहे.
भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर आश्विनने भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय युवा फलंदाज शुभम गिलला वर्षांतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत झालेल्या भारत-इंग्लंड युवा संघांमधील सामन्यांत शुभमने लक्षवेधी कामगिरी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा