चालू घडामोडी : १९ सप्टेंबर
पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
- देशातील एकूण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संख्येमध्ये आणि खर्चामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
- देशातील सर्व राज्यांची ३० एप्रिल २०१७ पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शविणारा अहवाल निती आयोगाने तयार केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
- ५ कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.
- या अहवालातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारी, सार्वजनिक तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांचा (पीपीपी) समावेश आहे.
- या अहवालानुसार, देशात एकूण ८,३६७ पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत ५०,५८,७२२ कोटी इतकी आहे.
- त्यापैकी महाराष्ट्रात एकूण १,०९७ पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत ५,९७,३१९ कोटी इतकी आहे.
- देशातील या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमती मध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा सर्वात जास्त म्हणजे ११.८ टक्के इतका आहे.
- महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य असून, देशातील एकूण प्रकल्प किमतीच्या ७ टक्के वाटा उत्तर प्रदेशाचा आहे.
- अरूणाचल प्रदेशाचा क्रमांक तिसरा असून, या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमतीत ६.३ टक्के इतका आहे.
- तमिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये या राज्यांचा वाटा अनुक्रमे ६.२ टक्के व ५.७ टक्के इतका आहे.
- या राज्यांच्या खालोखाल कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.
राज्य |
प्रकल्पांचा खर्च (कोटींत) |
महाराष्ट्र |
५,९७,३१९ |
उत्तर प्रदेश |
३,५४,४१९ |
अरुणाचल प्रदेश |
३,१७,३१० |
तामिळनाडू |
३,१४,०६६ |
गुजरात |
२,९०,२२६ |
९१वे मराठी साहित्य संमेलन बडोद्यामध्ये
- ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान गुजरातमधील बडोदा या शहराला देण्यात आला आहे.
- गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे.
- ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलढाणा जिह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते.
- मात्र शुकदास महाराजांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती.
- बडोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असेल. सुमारे ८३ वर्षांनंतर बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे.
- यापूर्वी १९०९मध्ये सातवे, १९२१मध्ये अकरावे व १९३४मध्ये विसावे साहित्य संमेलन बडोद्यात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न. चिं. केळकर, ना. गो. चापेकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
लोकसंख्या नियंत्रणासाठी आसाममध्ये कायदा
- दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार नाही, असा कायदा आसाम सरकारने मंजूर केला आहे.
- यासोबतच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्याची तरतूदही या कायद्याद्वारे करण्यात आली आहे.
- नव्या नियमानुसार, लग्न करताना किमान वयोमर्यादेचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल.
- लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आसामच्या विधानसभेत मोठ्या वादळी चर्चेनंतर हा नवा कायदा मंजूर केला आहे.
- २००१ मध्ये आसामची लोकसंख्या २.६६ कोटी होती. २०११ च्या जनगणनेनुसार आसामची लोकसंख्या ३.१२ कोटी इतकी आहे. गेल्या १० वर्षांमध्ये लोकसंख्येत १७.०७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
- लोकसंख्येच्या तुलनेत रोजगारांत वाढ होत नसल्याने जनतेसमोर अनेक आर्थिक समस्या आहेत. त्यामुळेच आता लोकसंख्येला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- याशिवाय वृद्ध आई-वडील आणि अपंग बहिण-भावाच्या जबाबदारीशी संबंधित एक कायदादेखील आसामच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.
- या कायद्याचे नाव प्रणाम (पॅरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड नॉर्म्स फॉर अकाऊंटेबिलिटी अॅण्ड मॉनिटरिंग) असे आहे.
- याअंतर्गत वृद्ध आई-वडिल आणि अपंग बहिण-भावाची जबाबदारी नाकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील १० ते १५ टक्के रक्कम कापून, ही रक्कम पीडित व्यक्तीच्या खात्यात वळवली जाणार आहे.
- आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार निवडून आले आहे. या सरकारचे नेतृत्त्व भाजपच्या सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे आहे.
किडनी रोग तज्ज्ञ डॉ. कृपालसिंग यांचे निधन
- भारताचे ‘फादर ऑफ नेफ्रॉलॉजी’ (किडनी रोग तज्ज्ञ) म्हणून ओळखले जाणारे डॉ कृपालसिंग चुग यांचे रक्ताच्या कर्करोगाने १७ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
- चुग पोस्टग्रॅज्युएट इन्स्टट्यिूट ऑफ मेडकिल एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे माजी प्राध्यापक आणि नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख होते.
- त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच सन २०००मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते.
चीनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. नान रेन्डाँग यांचे निधन
- खगोलशास्त्र संशोधनात चीनला एका वेगळ्या क्षितिजावर नेणारे चीनचे खगोलशास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभियंता डॉ. नान रेन्डाँग यांचे १५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
- ‘फाइव्ह हंड्रेड मीटर अॅपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप’ (फास्ट) ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण उभारण्यामध्ये नान रेन्डाँग यांचा सिंहाचा वाटा होता.
- चीनच्या गुझाऊ प्रांतात उभारण्यात आलेल्या या रेडिओ दुर्बिणीचे काम १९९४मध्ये सुरू झाले व ते पूर्ण करण्यासाठी सुमारे बावीस वर्षे लागली.
- ही रेडिओ दुर्बीण कुठे, कशी उभारायची या सगळ्याचे नियोजन त्यांनीच अचूकपणे केले. ‘फास्ट’ दुर्बिणीमागे सर्वात मोठे शक्तिस्थान तेच होते.
- या दुर्बिणीच्या मदतीने विश्वातील पल्सार म्हणजे स्पंदक तारे, कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे अशा असंख्य घटकांचा वेध घेता येणार आहे.
- या दुर्बिणीद्वारे चीनला अवकाशावर नजर ठेवणारा महानेत्रच डॉ. नान रेन्डाँग यांनी प्राप्त करून दिला आहे.
- खगोलशास्त्र व खगोलभौतिकीत चीनच्या हेफेई शहरात असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली.
- नान रेन्डाँग हे तीन वर्षे जपानमधील राष्ट्रीय वेधशाळेत प्राध्यापक होते. तेथे त्यांना मायदेशात वर्षांला मिळणारे वेतन एका दिवसाला मिळत होते.
- असे असतानाही देशाला गरज असताना ते परत आले व रेडिओ दुर्बिणीच्या प्रकल्पाचे नेतृत्व हाती घेतले.
- नान यांना रेडिओ दुर्बिणीशिवायही अनेक कौशल्ये ज्ञात होती. त्यांना दृश्यकला अवगत असल्याने ‘फास्ट’ या दुर्बिणीचे ओळखचिन्हही त्यांनी तयार केले होते.
- त्यात त्यांचे अनेक विद्यार्थी काम करीत होते. त्यामुळे रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची पुढची पिढी घडवण्याचे कामही त्यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा