चालू घडामोडी : १५ सप्टेंबर
संजीव सिन्हा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुख्य सल्लागार
- जपान सरकारने बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुख्य सल्लागार म्हणून संजीव सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अंदाजित खर्च १.०८ लाख कोटी एवढा असून यातील ९० टक्के रक्कम जपानकडून भारताला कर्जरूपात मिळणार आहे.
- राजस्थानच्या दुष्काळग्रस्त बाडमेर शहरात २१ जानेवारी १९७३ रोजी संजीव सिन्हा यांचा जन्म झाला.
- कानपूर आयआयटीमधून अभियंता पदवी घेतल्यानंतर, त्यांनी पदार्थविज्ञान शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
- गोदरेजसहित अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. नंतर ते जनरल टेक कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यासाठी टोकियोत गेले.
- सिन्हा हे अनेक वर्षांपासून जपानमध्ये वास्तव्यास असून त्यांची पत्नीही जपानीच आहे. जपानमध्येच त्यांनी वित्तीय व्यवस्थापनातील पदवीही मिळवली आहे.
- त्यांनी गोल्डमन, मिझुहो सिक्युरिटीज यांसारख्या जपानी कंपन्यांत महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
- टाटा अॅसेट मॅनेजमेंट तसेच टाटा रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी जपानमधील मुख्य प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
कॅसिनी ह्युजेन्स अवकाशयानाचा प्रवास संपला
- नासा, इसा आणि आयसा यांनी संयुक्तरीत्या पृथ्वीवरून सोडलेले ‘कॅसिनी ह्युजेन्स’ हे अवकाशयान १३ वर्षे शनीचा अभ्यास केल्यानंतर इंधन संपल्यामुळे १५ सप्टेंबरला शनी ग्रहावर आदळले.
- आदळण्यापूर्वी शेवटच्या घटकेपर्यंत अवकाशयानाने शनी ग्रहाची आणि त्याच्या चंद्रांची छायाचित्रे पाठवली.
- शनी ग्रहाच्या कक्षेत १,५०० किमी उंचीवर शिरल्यावर, भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५५ वाजता कॅसिनीचा संपर्क तुटला.
- संपर्क तुटल्याच्या ३० सेकंदांमध्ये अवकाशयान नष्ट झाले आणि त्याचे अवशेष शनी ग्रहाच्या वातावरणात पडल्याची माहिती नासाकडून देण्यात आली.
- कॅसिनी मोहिमेचे प्रमुख अर्ल मेज यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करीत मोहीम संपल्याचे जाहीर केले.
- अमेरिकेची नासा, युरोपची इसा आणि इटलीची आयसा या देशांच्या संयुक्त अभियानाद्वारे ३.२६ अब्ज डॉलर खर्चून १५ ऑक्टोबर १९९७ला ‘केसिनी ह्युजेन्स’ हे अवकाशयान शनीच्या अभ्यासासाठी सोडण्यात आले होते.
- हे यान २००४मध्ये शनी ग्रहावर पोहोचले. यानाने शनीच्या ३०० फेऱ्या पूर्ण केल्या आणि शनी आणि त्याच्या कडीची अगदी जवळून छायाचित्रे घेतली.
- हे यान शनीचा मोठा चंद्र ‘टायटन’च्या २७०० किलोमीटर जवळ गेले. त्याच्या १२७ फेऱ्या मारल्या आणि तेथे तरल स्वरूपात मिथेन असल्याचा महत्त्वाचा पुरावा या यानाने दिला.
- आतापर्यंतची सर्वाधिक यशस्वी आणि जास्त काळ चाललेली ही मोहीम असल्याचे नासाने म्हटले आहे.
चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व
- रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न चर्चेत असतानाच, दुसरीकडे केंद्र सरकारने ईशान्य भारतातील चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
- स्थानिक जनतेच्या अधिकारांना न डावलता, चकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याची कसरत केंद्र सरकारला करावी लागणार आहे.
- १९६०च्या दशकात चकमा आणि हाजोंग समाजातील सुमारे १ लाख नागरिकांनी बांगलादेशमधून ईशान्य भारतात विशेषतः अरुणाचल प्रदेशमध्ये आश्रय घेतला होता.
- तेव्हापासून या लोकांचे भारतात वास्तव्य असून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने २०१५मध्ये दिले होते.
- अरुणाचल प्रदेशातील स्थानिक रहिवाशांनी या निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे राज्यातील लोकसंख्येची रचनाच बदलून जाईल अशी भीती व्यक्त होत आहे.
- या निर्वासितांना अरुणाचलमधील अनुसूचित जमातींसारखे जमिनीचे अधिकार न देता व्यावहारिक तोडगा काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल.
जातपंचायतींचा सामाजिक बहिष्कार आता दंडनीय गुन्हा
- महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार जातपंचायतींकडून टाकला जाणारा सामाजिक बहिष्कार आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे.
- ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१५’ विधिमंडळात १३ एप्रिल २०१६ला मंजूर झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
- या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाखापर्यंत दंडाचीही तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
- आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांत खटल्याचा निकाल लावण्याची तरतूदही या कायद्यात आहे.
- कोणत्याही संस्थेने जातीच्या आधारावर न्यायनिवाडा केला किंवा फतवा काढला, तर तो या कायद्यानुसार गुन्हा ठरेल.
- जातपंचायतीने संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबाला दंड ठोठावल्यास त्यांना त्याची नुकसानभरपाईही या कायद्यामुळे मिळू शकेल.
- अनेक वर्षांपासून खोट्या प्रतिष्ठेसाठी बळी देण्याच्या प्रकारांमुळे राज्यभरातील जातपंचायतींच्या भयावह कारभाराचे दाहक वास्तव उघड झाले होते.
- जातपंचायतीने दिलेल्या शिक्षा, त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, महिलांच्या चारित्र्याविषयी घेण्यात येणारी परीक्षा असे अनेक गंभीर प्रकार समोर आले.
- नंतर जातपंचायतीने बहिष्कृत केलेली शेकडो कुटुंबे न्याय मिळविण्यासाठी पुढे आली. पोलिस ठाण्यांत तक्रारीही दाखल झाल्या.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधन आणि पोलिसांचा वचक यामुळे राज्यातील भटके जोशी, स्मशान जोगी, आदिवासी गोंड, वैदू, नागपंथी डबरी गोसावी, गोपाळ, मढी यांसह जातपंचायती बरखास्त करण्यात यश मिळाले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘जातपंचायत मूठमाती मोहीम’ राबवून पंचायतींच्या अघोरी शिक्षांनी त्रस्त झालेल्यांना संघटित करून हा विषय सरकारसमोर मांडला.
गुगलकडून भारतात ‘तेज’ डिजिटल पेमेंट सेवा
- गुगलची ‘तेज’ या नावाची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा १८ सप्टेंबर रोजी भारतात सुरू होत आहे.
- भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यात आता गुगलचा प्रवेश होत आहे.
- तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून हे नाव गुगलने निवडले आहे.
- गुगलचे ‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’प्रमाणे ते काम करणार आहे.
- यूपीआय ही पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) लाँच केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ती चालवली केली जाते.
- मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांत पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा ही सिस्टीम उपलब्ध करून देते.
उत्तर कोरियाने पुन्हा जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले
- उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी केली असून, हे क्षेपणास्त्र जपानच्या होकाइडो बेटावरुन जाऊन पॅसिफिक महासागरात पडले. या क्षेपणास्त्राने १२०० मैल अंतर कापले.
- तीन आठवड्यांपूर्वीही जपानच्या भूभागावरुन जाणारे एक क्षेपणास्त्र उत्तर कोरियाकडून सोडण्यात आले होते.
- तसेच जपानच्या ४ प्रमुख बेटांना अणू बॉम्बच्या मदतीने समुद्रात बुडवण्याची धमकी काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाकडून देण्यात आली होती.
- उत्तर कोरियाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे उत्तर कोरिया आणि जपानमधील संबंध ताणले गेले आहेत.
- जपानच्या ज्या भागावरुन क्षेपणास्त्र गेले, त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांचा अनेकदा हवेतच स्फोट होऊन त्याचे तुकडे सर्वत्र पसरतात. त्यामुळेच जपानकडून अलर्ट जारी करण्यात आला.
- या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिले आहेत.
- हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने उत्तर कोरियावर व्यापाराची बंदी घातली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र सोडले असल्याची शक्यता आहे.
लंडनमध्ये इसिसकडून दहशतवादी हल्ला
- लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये १५ सप्टेंबर रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिसने या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
- लंडन स्टेशनजवळील भुयारीमार्गातून जाणाऱ्या एक भरगच्च ट्रेनमध्ये हा स्फोट घडवण्यात आला. यासाठी आयईडी स्फोटकांचा वापर करण्यात आला.
- डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टिकच्या बादलीत हा स्फोट झाला. यासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आला.
- या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत २९ प्रवासी जखमी झाले.
- याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा