विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या धोरणांतर्गत केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील पहिली ‘नो फ्लाय लिस्ट’ जारी केली आहे.
यातील नियमांनुसार विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना या काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्ह्याच्या प्रमाणानुसार २ महिन्यांपासून आजीवन विमान प्रवास करण्यास बंदी घातली जाईल. या शिक्षेविरुद्ध संबंधित न्यायालयात जाऊ शकतात.
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी यावर्षी मार्चमध्ये एअर इंडियाच्या अधिकाऱ्यास भरविमानात सॅंडलने मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते.
त्यानंतर विमानात गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईबाबत हालचाली करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर, विविध देशांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास केल्यावर मंत्रालयाने ही नो फ्लाय नियमावली तयार केली.
इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट संघटनेच्या (आयएटीए) माहितीनुसार विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे.
विमान प्रवास कायदा १९७२नुसार विमान कंपन्याना एखाद्या प्रवाशावर प्रवासबंदीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
नो फ्लाय लिस्टच्या नियमांची खालील तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपर्यंत बंदी: प्रवाशाने असभ्य वर्तन केल्यास, शिवीगाळ केल्यास, मद्यपान करून गोंधळ घातल्यास.
सहा महिन्यांपर्यंत बंदी: कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे, मारणे.
दोन वर्षे व अधिक काळासाठी बंदी: कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यास, विमानाला इजा पोहोचेल अशी कृत्ये केल्यास किंवा घातपाताचा प्रयत्न केल्यास.
हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी जोर्द मरीन
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्यावर भारतीय सिनियर पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय महिला संघ युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर मारिन हे २० सप्टेंबर रोजी नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत.
भारतीय सिनियर पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर हॉकी इंडियाने प्रशिक्षक पदासाठी जाहिरात दिली होती. ही जाहिरात आता मागे घेण्यात आली आहे.
याबरोबरच विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांना महिला संघाचे नवे हाय परफॉमर्न्स संचालक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक पदावर बढती देण्यात आलेली आहे.
मरीन आणि हरेंद्रसिंह हे दोघेही आगामी २०२० टोकीयो ऑलिम्पिकपर्यंत भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना
केंद्र सरकारकडून १००० विद्यार्थ्यांना ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती’ देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
या योजेनेंतर्गत अंतर्गत प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या १ हजार विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांची मासिक शिष्यवृत्ती दिली जाईल
देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील.
देशातील २० विद्यापीठांमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा मानस आहे.
ईशान्येकडील ६ राज्यांना रणजीमध्ये प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने ईशान्येकडील ६ राज्यांना भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे ईशान्येतल्या मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या ६ राज्यांना रणजी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.
बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी यांच्याकडे या ६ राज्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार दिले आहेत.
यंदाचा रणजी हंगाम हा ६ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे या पर्वात ६ संघाना समावेश देता येणे शक्य होणार नाही.
परंतु पुढील हंगामात या ६ राज्यांना स्वतंत्र संघ म्हणून रणजी स्पर्धेत सहभाग घेता येईल, असे आश्वासन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिले आहे.
बीसीसीआयच्या १६ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या विनू मंकड आणि २३ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या सी के नायडू स्पर्धेसाठीही ईशान्येच्या राज्यांकरता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे.
पराली १ बेट संपुर्णपणे पाण्याखाली
अरबी समुद्रातील लक्षद्वीप समुहातील पराली १ हे बेट सततच्या विदारणामुळे संपुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते.
आर एम हिदायतुल्ला यांनी केलेल्या अभ्यासातून हे बेट आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९६८साली हे बेट ०.०३२ चौकिमी इतक्या आकारमानाचे होते तसेच ते बेट बंगारम प्रवाळद्विपाचा एक भाग होते असे हिदायतुल्ला यांनी आपल्या अभ्यास अहवालात लिहिले आहे. आता ते १०० टक्के पाण्याखाली गेले आहे.
हिदायतुल्ला हे लक्षद्वीपच्या अॅंड्रोथ येथील राहणारे असून जुलै महिन्यामध्ये त्यांनी कालिकत विद्यापिठात पीएचडी पदवी संपादित केली आहे.
सागरी लाटांच्या विदारणामुळे लक्षद्वीपमधील जैवसमृद्ध बेटांवर होणारा परिणाम असा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
सागरी विदारणाचा बेटांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर केला.
हिदायतुल्ला यांनी सागरी विदारणाचा अभ्यास करण्यासाठी लक्षद्वीपमधील बंगारम, थिन्नकारा, पराली १, पराली २, पराली ३ या बेटांची निवड केली होती.
यामध्ये या पाचही बेटांवर सागरी विदारणाचा मोठा परिणाम होत असल्याचे हिदायतुल्ला यांच्या लक्षात आले.
पुढील विदारण प्रक्रिया रोखण्यासाठी आताच उपाय शोधण्याची गरज असल्याचे लक्षात आले असे हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे.
मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का
मेक्सिकोला ७ सप्टेंबर रोजी ८.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपामुळे कमी तीव्रतेचे त्सुनामी वादळही आले. ज्यामुळे आलेल्या लाटांनी काही इमारतींचे नुकसान केले.
मेक्सिकोतील पिजिजियापन आणि चिआपास या दोन शहरांना भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
पिजिजियापन शहरापासून १२३ किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मेक्सिकोत १९८५ नंतर आलेला हा सर्वात मोठा भूंकप आहे. १९८५मध्ये जो भूकंप मेक्सिकोत आला होता त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा