६०च्या दशकात ‘प्लेबॉय’सारखे सनसनाटी मासिक सुरू करून खळबळ उडवून दिलेल्या ह्यूग हेफ्नर यांचे २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
पुरुषांसाठी लैंगिक विषयावरचे मॅगझीन सुरू करून हेफ्नर त्याकाळी जणू लैंगिक क्रांतीचे प्रतीक ठरले.
ह्यूग हेफ्नर यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. ते हेफ या नावानेही ओळखले जात होते. याशिवाय, हेफ्नर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.
शिक्षक दाम्पत्याच्या पोटी १९२६साली जन्मलेल्या हेफ्नर यांनी शिक्षणानंतर सर्जनशील लेखनामध्ये उमेदवारी सुरू केली.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर हेफ्नर ऑर्मीमध्ये क्लर्क पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘एस्क्वायर’ लाइफस्टाइल मासिकात कॉपी रायटर म्हणून काम केले.
‘एस्क्वॉयर’मध्ये असताना मागितलेली ५ डॉलर पगारवाढ न केल्यामुळे ती नोकरी सोडून त्यासारखेच नवे मासिक उभारण्याचा चंग त्यांनी बांधला.
त्यानानात्र १९५३मध्ये ह्यूग हेफ्नर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती या सगळ्यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले.
परंतु सगळ्या वादानंतरही सुमारे दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले होते. याच मासिकाच्या बळावर हेफ्नर यांनी स्वतःचे व्यवसाय साम्राज्य तयार केले.
बिनधास्त साहित्य तसेच समाज आणि राजकारणातील वृत्तीप्रवृत्तींना तिरकस चावा घेणारी लेखणी प्लेबॉयमध्ये स-छायाचित्र छापली गेली. अमेरिकेत या मासिकाने लैंगिक क्रांती केली.
हेफ्नर यांनी अमेरिकेतील विघटनाकडे जाणारी कुटुंबसंस्था, लग्नसंस्था यांच्या सूक्ष्मदर्शनासोबत शरीरसंबंधांबाबत होणाऱ्या मुक्त विचारांचा आपल्या मासिकाद्वारे प्रचार आणि प्रसार केला.
पहिल्याच अंकापासून लेख, चित्रकथा, व्यंगचित्रे, विनोद आणि आघाडीच्या स्त्री सेलिब्रेटींची ‘विशेष चित्रे’ या मासिकातून देण्याचे आश्वासन हेफ्नर यांनी आजतागायत पाळले.
सर्वाधिक मानधन देऊन त्यांनी आघाडीच्या सर्वच लेखकांना आपल्या मासिकामध्ये लिहिण्यासाठी आमंत्रित केले.
साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांची चौकट मोडत या मासिकाचा जगभर प्रसार झाला.
जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते.
‘प्लेबॉय’ मासिकाने विसाव्या अखेरची पाच दशके लैंगिक संस्कृतीची केवळ परिभाषाच बनवली नाही, तर तिला एक नवी दिशा दिली.
मासिक सुरु केल्यानंतर ७ वर्षांनी १९६०मध्ये हेफ्नर यांनी पहिला प्लेबॉय क्लब सुरू केला. त्यानंतर हळुहळु दुनियाभरात प्लेबॉयचे क्लब सुरू केले गेले.
प्लेबॉय एंटरप्रायजेस सध्या टेलिव्हिजन नेटवर्क, वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन आणि रेडिओच्या माध्यमातून अॅडल्ट कंटेन्ट पोहचविण्याचे काम करते.
प्लेबॉय या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी शर्लिन चोपडा भारतातील एकमेव मॉडेल होती. २०१२मध्ये शर्लिन चोपडाने प्लेबॉयच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते.
जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका जाहीर
जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी जपानची संसद बरखास्त केली आहे.
जपानमध्ये २२ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्याचा लाभ उठवत आबे यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे. जनमत चाचण्यांमध्येही त्यांचा एलडीपी पक्ष आघाडीवर आहे.
उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचण्या आणि करप्रणालीची नवी योजना याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत शिंझो आबे यांना जनमताचा कौल घ्यावयाचा आहे.
उजव्या विचारसरणीच्या आबे यांच्या लिबरल डेमोक्रॅट पक्ष २०१२मध्ये सत्तेवर आला. आप्तस्वकीयांना महत्त्वाची पदे दिल्याच्या आरोपावरून यावर्षीच्या सुरुवातीला आबे अडचणीत आले होते.
पण आता उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने दोन बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर आबे यांनी त्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला जपानी जनतेचा पाठिंबा वाढला आहे.
टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोइके यांनी ‘पार्टी ऑफ होप’ स्थापन करून अबे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. जपानचे राजकीय चित्र बदलण्याची या पक्षाची इच्छा आहे.
गोवा टुरिझमला राष्ट्रीय पुरस्कार
गोवा टुरिझमला जागतिक पर्यटनाच्या दिवशीच दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांसाठी हे पारितोषिक देण्यात आले.
गोव्याला ‘पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य’ हा सन्मान मिळाला. तसेच ‘सोशल मीडिया, मोबाईल अॅप’ यांच्या सर्वाधिक उपयोगासाठीही पुरस्कार देण्यात आले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
एनटीए अर्थात राष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील पुरस्कारांची सुरूवात १९९०पासून करण्यात आली. पर्यटनाला चालना देणाऱ्या राज्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
मागील पाच वर्षांपासून गोवा पर्यटन विभागाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कारांची भर पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा