चालू घडामोडी : २८ सप्टेंबर

‘ऑपरेशन अर्जुन’पुढे पाक लष्कर शरण

  • सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन अर्जुन'च्या माध्यमातून सीमेवरील पाकिस्तानच्या सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या घरांवर तसेच शेतात बेधूंद गोळीबार करून पाकिस्तानला भारताने जबरदस्त धडा शिकविला आहे.
  • 'आपरेशन अर्जुन'अंतर्गत घुसखोरी करणाऱ्या आणि भारत विरोधी अभियान राबविणाऱ्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सैनिक, आयएसआय आणि पाक रेंजर्सच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि शेतांवर गोळीबार करण्यात आला होता.
  • त्यात पाकिस्तानचे ७ सैनिक आणि ११ नागरिक मारले गेले. तसेच पाकच्या अनेक आऊट पोस्टही उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.
  • भारताच्या या आक्रमक माऱ्यामुळे पाक लष्कराची भंबेरी उडाली आणि त्यांनी गोळीबार थांबवा अशी विनंती भारतीय लष्कराला केली.
  • गेल्यावर्षी भारताने 'ऑपरेशन रूस्तम' सुरू करून पाकिस्तानला असेच सळो की पळो करून सोडले होते. त्याच धर्तीवर 'ऑपरेशन अर्जुन' सुरू केले आहे.
  • सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडूनरंवार होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफकडून 'ऑपरेशन अर्जुन' सुरू करण्यात आले होते.

पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार

  • गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
  • लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
  • पुष्पाताईंचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला. वडील जनार्दन चामरे यांच्याकडून पागधरे यांना लहानपणापासूनच संगीताचे धडे मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु आर डी बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
  • त्यानंतर त्या मुंबई आल्या व गीत, गझल, भजन आणि ठुमरी शिकल्या. आकाशवाणीवरही त्यांनी गाणी गायली आहेत.
  • प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी त्यांना ‘प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात गायनाची संधी दिली.
  • बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, विठ्ठल शिंदे, राम-लक्ष्मण, यशवंत देव आदी संगीतकारांबरोबर त्यांना गायनाची संधी मिळाली. 
  • ‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता’, ही प्रार्थना पुष्पातार्इंनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली. 
  • पुष्पाताईंनी ‘खून का बदला’, ‘बिना माँ के बच्चे’, ‘मुक्कदर का सिकंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
  • त्यांनी अनेक लावण्याही गायल्या आहेत. सुलोचना चव्हाण यांच्याप्रमाणेच त्यांच्या आवाजातील लावण्याही खूपच गाजल्या.
  • त्यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी आदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
  • यापूर्वी पुष्पातार्इंना राज्य शासनातर्फे पार्श्वगायनाबद्दल दोनवेळा पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.
 पुष्पातार्इंची लोकप्रिय ठरलेली गाणी: 
  • इतनी शक्ती हमे देना दाता
  • राया मला पावसात नेऊ नका
  • राया मला जरतारी शालू आणा
  • आला पाऊस मातीच्या वासात
  • मैत्रिणींनो थांबा थोडं
  • खुशाल मागनं हसा
  • अगं पोरी संबाळ दर्याला तुफान आयलंय भारी

आतापर्यंतचे लता मंगेशकर पुरस्कार विजेते
माणिक वर्मा श्रीनिवास खळे
गजानन वाटवे दत्ता डावजेकर
पं. जितेंद्र अभिषेकी पं. हदयनाथ मंगेशकर
ज्योत्स्ना भोळे आशा भोसले
अनिल विश्वास सुधीर फडके
प्यारेलाल रवींद्र जैन
स्नेहल भाटकर मन्ना डे
जयमाला शिलेदार खय्याम
महेंद्र कपूर सुमन कल्याणपूर
सुलोचना चव्हाण यशवंत देव
आनंदजी शहा अशोक पत्की
कृष्णा कल्ले प्रभाकर जोग
उत्तम ब्रीदपाल सिंग

शिक्षणाचा दर्जा खालावलेल्या देशांमध्ये भारत दुसरा

  • जागतिक बँकेने ‘जागतिक विकास अहवाल २०१८ : लर्निग टू रिअलाइज एज्युकेशन्स प्रॉमिस’ हा अहवाल प्रसिद्ध केला.
  • जागतिक बँकेने शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाबाबत सादर केलेल्या या अहवालामध्ये भारतासह १२ देशांचा समावेश आहे. 
  • शिक्षणाचा दर्जा खालावलेल्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर पूर्व आफ्रिकेतील मालवी देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
  • ज्या देशातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक शब्दही वाचता येत नाही, तसेच दोन आकडी संख्येची वजाबाकीही येत नाही अशा सात देशांची यादी जागतिक बँकेने तयार केली आहे. यामध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे.
  • कोणतेही शिक्षण न देणाऱ्या शाळा फक्त विकासाच्या संधी नाकारतच नाहीत, तर या शाळा मुलांवरदेखील अन्याय करतात, असे या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे.
  • भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देण्यात अपयशी ठरते, अशा शब्दांमध्ये जागतिक भारतीय शिक्षण क्षेत्रातील जळजळीत वास्तवाची पोलखोल केली आहे.
 या अहवालातील ठळक मुद्दे 
  • जागतिक स्तरावर व प्रामुख्याने अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या भारतासारख्या देशांत सध्या शिक्षणसंकट असल्याचा इशारा.
  • प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या घसरत्या दर्जामुळे भारतातील लाखो तरुण विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधींवर पाणी सोडावे लागते.
  • आवश्यक ते शिक्षण न मिळाल्याने त्यांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागते.
  • ग्रामीण भारतात इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन चतुर्थाश विद्यार्थ्यांना ४६ मधून १७ उणे केल्यास किती राहतात, अशी साधी आकडेमोड जमत नाही. पाचवीतील निम्म्या विद्यार्थ्यांनाही आकडेमोड करता येत नाही.
  • भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण जर लहान वयात विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर दारिद्रय़ निर्मूलन, सर्वासाठी सामायिक संधी आणि समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय अपयशी ठरेल.
  • शैक्षणिक संकट हे नैतिक आणि आर्थिक संकट आहे. शैक्षणिक संकट निर्माण झाल्यामुळे सामाजिक दरी वाढते आहे.
  • शैक्षणिक संकट दूर करण्यासाठी विकसनशील देशांनी शिक्षणाचे ठोस धोरणात्मक मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे.
  • शैक्षणिक बदलांसाठी चालना देणाऱ्या ‘सर्वासाठी शिक्षण’ या अभियानावर अधिक भर देणे आवश्यक आहे.

सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास परवानगी

  • कर्मठ व पुराणमतवादी देश असलेल्या सौदी अरेबिया देशातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझित अल सौद यांनी या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा करत, देशातील महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा वटहुकुम काढला आहे.
  • सौदीत महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. येथे महिलांवर अनेक बंधने आहेत. महिलांवर दडपशाही करणाऱ्या आखाती देशांमधील एक अशी सौदीची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे.
  • ही बंधने हटविण्यासाठी महिला कार्यकर्त्या तेथे अनेक वर्षांपासून लढा देत आहे. बंदी झुगारल्यामुळे अनेक उजव्या विचारसरणीच्या महिला कार्यकर्त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे.
  • राजे सलमान यांनी दिलेल्या आदेशानुसार, यासंदर्भात मंत्री स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • ही समिती पुढील ३० दिवसात वाहन चालवण्याच्या परवानगीच्या निर्णयावर मत मांडणार आहे. त्यानंतर जून २०१८मध्ये शरिया कायद्यानुसार हा आदेश लागू करण्यात येईल.
  • महिलांना गाडी चालविण्यावर असलेली बंदी एक सामाजिक मुद्दा मानला जातो आहे. कारण धर्म आणि कायद्याच अशा कुठल्याही बंदीचा उल्लेख नाही.
  • यापूर्वी २०१५मध्ये सौदी अरेबियातील महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार देण्याचा महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.

क्रिकेटचे नवे नियम लागू

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) क्रिकेटचे नवे नियम २८ सप्टेंबरपासून अमलात येणार असून ते सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांना लागू होतील.
 नवीन नियम खालीलप्रमाणे: 
  • बॅटच्या लांबी-रुंदीच्या मापात कोणताही बदल नाही. मात्र बॅटच्या कडांची जाडी ४० मिमीपेक्षा जास्त व मागील भागाच्या मधला फुगीरपणा ६७ मिमीपेक्षा जास्त असू शकणार नाही.
  • फलंदाज खेळण्यासाठी घेऊन आलेली बॅट ‘वैध’ आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार पंचांना असेल. त्यासाठी त्यांना बॅटच्या मोजमापाचे साधन (गेज) दिले जाईल.
  • क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर हवेत उडी मारून झेल पकडण्यासाठी सीमारेषेच्या आतून उडी मारली असेल तरच तो झेल वैध मानला जाईल अन्यथा चेंडू सीमापार गेला असे मानले जाईल.
  • क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटवर आपटून आलेला चेंडू ‘डेड’ मानला जाणार नाही. अशा हेल्मेटवर आपटून आलेल्या चेंडूवरही फलंदाज झेलबाद, धावबाद किंवा यष्टिचीत होऊ शकेल.
  • क्रीझच्या दिशेने धावणाऱ्या किंवा झेप घेणाऱ्या फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीझच्या आत टेकलेली असेल पण चेंडू प्रत्यक्ष यष्टीला लागताना त्याच्या शरीराचा जमिनीशी स्पर्श झालेला नसेल तरी त्याला धावचीत ठरविले जाणार नाही. यष्टिचीत होण्याचे टाळण्यासाठी मागे वळणाऱ्या फलंदाजासही हाच नियम लागू असेल.
  • फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचाला धमकावणे, त्याच्या अंगावर जाणे, धक्काबुक्की करणे आणि कोणावरही शारीरिक हल्ला करणे यासारखे बेशिस्त वर्तन केल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार असेल.
  • कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर (डीआरएस)च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.
  • वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही डीआरएसचा वापर करण्यात येणार आहे.
  • डीआरएसमध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणे अनिवार्य होणार आहे.
  • पंचांच्या ‘कॉल’मुळे ‘डीआरएस’नंतर एखादा निर्णय कायम राहिला तर त्या संघाने ‘रिव्ह्यू’ची एक संधी गमावली, असे मानले जाणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा