३ ते ५ सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले.
सुमारे ७३ दिवस चीनबरोबर भारताचा डोकलाम येथे वाद सुरू होता. तो मिटल्यानंतर मोदी यांचा हा शिखर परिषदेसाठीचा प्रथमच चीन दौरा आहे.
ब्रिक्स शिखर बैठक ३ दिवस चालणार असून त्याचा प्रारंभ ब्रिक्स व्यापार मंडळाच्या कार्यक्रमाने फुजियान प्रांतातील शियामेन शहरात झाला.
यामध्ये इजिप्त, केनिया, ताजिकिस्तान, मेक्सिको, थायलंड या देशांना अतिथी देश जाहीर केले असून त्यांच्या प्रतिनिधींना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना, लष्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला.
यानंतर ब्रिक्स देशांच्या घोषणापत्राच्या ४८व्या परिच्छेदात दहशतवादाबद्दल चिंतादेखील व्यक्त करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे वक्तव्य केले होते.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र भारताच्या प्रयत्नांना चीनकडून अनेकदा खीळ घालण्यात आली.
प्रसिध्द भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड एगर यांचे निधन
आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने २६ ऑगस्ट रोजी निधन झाले.
वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याच्या अॅलोपॅथीतील वैद्यकीय तंत्रात मोठी सुधारणा घडवून आणण्याचे कार्य डॉ. एडमंड एगर यांनी केले.
दरवर्षी विशिष्ट ३० कोटी लोकांवर औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या हालचाली थांबवण्याकरिता भूल वापरली जाते. त्यातही कमीत कमी औषध वापरून हा परिणाम साधण्याचे ‘मिनिमम अलव्हेलॉर कॉन्स्ट्रेशन’ तंत्र त्यांनी विकसित केले.
आजपर्यंत डॉ. एडमंड एगर ठरवून दिलेली औषधांची मात्राच भूल देताना प्रमाण मानली जात आहे.
भुलीचे काम संपल्यानंतर या औषधांचा परिणाम पटकन संपवणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांनी भुलीची औषधे कशी द्यायची याचे काही नियमही सांगितले होते.
आजही त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेली आयसोफ्लुरेन, सेव्होफ्लुरेन, डेसफ्लुरेन ही औषधे भूल देण्यासाठी वापरली जातात.
एडमंड यांचा जन्म १९३०मध्ये शिकागोत झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी ते हाईड पार्क स्कूलमधून पदवीधर झाले.
इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र व गणितात तर, १९५५मध्ये नॉर्थवेस्टर्न मेडिकल स्कूलमधून वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली.
त्यांनी २४ अध्यासनांचे प्रमुखपद भूषवले होते. ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या लंडनच्या संस्थेचे ते फेलो होते.
एकूण ५०० पेक्षा जास्त शोधनिबंध त्यांनी लिहिले. ७ पुस्तकांचे ते लेखक किंवा सहलेखक होते. त्यात ‘ॲनेस्थेटिक अपटेक अॅण्ड अॅक्शन’ या पुस्तकाचा समावेश आहे.
भूलशास्त्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ‘वेस्टर्न अॅनेस्थेशिया रेसिडेंट्स कॉन्फरन्स’ ही संस्था स्थापन केली.
त्यांना निसर्गात भटकंतीची आवड होती, ते चांगले गिर्यारोहकही होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा