चालू घडामोडी : २४ सप्टेंबर
२४ तास वीज पुरवठ्यासाठी सौभाग्य योजना
- देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला नवीन ‘सौभाग्य योजना’ सुरू करणार आहेत.
- आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला ही योजना सुरू केली जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल.
सज्जन जिंदाल यांनी घेतला हरिश्चंद्र घाट दत्तक
- उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात हा घाट असून, आता ३.५ कोटी रुपये खर्च करुन या घाटावर स्वच्छता, नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे.
- एखाद्या धार्मिक घाटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेणारे सज्जन जिंदाल हे पहिलेच उद्योगपती आहेत.
- हे काम ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी जिंदल स्टिल वर्कने (जेएसडब्ल्यू) केंद्र सरकारची परवानगी घेतली आहे.
- अंत्यसंस्कारासाठी वाराणसीतील मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्र घाटावर दिवस-रात्र विधी होतात. येथे विद्युत शवदाहिनीदेखील आहे.
- या घाटावर दगडी बांधकाम करण्यात येणार असून, अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- या घाटावरून निघणाऱ्या धुराबाबत कंपनी तपासणी करणार आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी आणि पूजेचे साहित्य यांचा नदीतील प्रवाह रोखण्यात येणार आहे.
- घाटावरील विजेचे खांब पुन्हा उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण कामासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध
- उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा तसेच, उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.
- अणु चाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरुन दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.
- चीन हा उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी ९० टक्के व्यापार चीनशी होतो.
- चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे.
- तसेच चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे.
- याबरोबरच द्रवरुप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात चीनने तत्काळ थांबवली असून, कच्चा तेलाची आयात १ ऑक्टोबरपासून मर्यादित करण्यात येणार आहे.
- उत्तर कोरियाने अणु चाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत.
- संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांकडून उत्तर कोरियाला होणारी कच्च्या तेलाची निर्यात मर्यादित करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा