पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सहज बिजली योजने’चे (सौभाग्य) उद्घाटन करताना ‘दीनदयाळ ऊर्जा भवना’चेही २५ सप्टेंबर २०१७ रोजी लोकार्पण केले.
यावेळी त्यांनी प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा केली. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही त्यांना ५०० रुपये भरुन या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
या योजनेद्वारे सरकार प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घरात १ एलईडी बल्ब व मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार आहे.
जिथे वीज नाही तिथे ५ एलईडी बल्ब, बॅटरी आणि एक पंखा यांचा एक सोलर पॅक देणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे.
धोनी आणि सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस
देशातील प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे.
आतापर्यंत भारताला दोन विश्वचषक (एक एकदिवसीय, एक टी-२०) जिंकवून देण्यात धोनीचा महत्वाचा वाटा आहे.
कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही क्षेत्रात धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघ उभारणीत त्याचे असलेले योगदान यामुळेच त्याच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
धोनीने ३०२ वन-डे सामन्यांमध्ये ९७३७ धावा, ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा तसेच ७८ टी-२० सामन्यांमध्ये १२१२ धावा केल्या आहेत.
कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १६ शतके असून, नुकतेच धोनीने अर्धशतकांचं शतक पूर्ण केले होते.
यष्टीरक्षक म्हणून तिन्ही प्रकारांमध्ये धोनीने ५८४ झेल घेतले आहेत. तर आतापर्यंत १६३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
याआधी धोनीला ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा धोनी ११वा क्रिकेटपटू ठरणार आहे.
याआधी सचिन तेंडुलकर, कपील देव, सुनील गावसकर, राहुल द्रवीड, चंदू बोर्डे यासारख्या दिग्गज खेळाडूंना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचे निधन
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू (वय ७६ वर्षे) यांचे २५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
मराठी साहित्य विश्वात राजकीय कादंबऱ्या फारशा नसताना अरुण साधू यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले.
त्यांनी प्रारंभी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
१९८९पर्यंत त्यांनी सक्रीय पत्रकारिता केली. पुढे क्रियाशिल पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखन व कादंबरी लेखनाकडे वळले.
‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांमधून त्यांनी महानगरीय वास्तव जीवन व महाराष्ट्रातील राजकारणाचा टोकदार वेध घेतला. या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले.
त्यांनी कादंबरीकार, विज्ञानलेखक, इतिहासलेखक म्हणून आजतागायत भरगच्च लेखनकार्य केले आहे.
८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
जयललिता मृत्युप्रकरणी चौकशी आयोग स्थापन
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा ५ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईतील अपोलो रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
अण्णा द्रमूककडूनही त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण जाणून घेण्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, आता तामिळनाडूतील इ पलानीसामी सरकारने याप्रकरणी चौकशी आयोग स्थापन केला आहे.
निवृत्त न्यायाधीश ए अरूमुगासामी यांच्या नेतृत्वाखालील हा आयोग या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करेल.
यापूर्वी उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेलवम यांनीही अनेकवेळा जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीकडून कारवाई
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर अंमलबजावणी संचलनलायकडून (ईडी) कारवाई करण्यात आली आहे.
‘ईडी’ने कार्ती चिदंबरम यांची १.१६ कोटींची संपत्ती जप्त करताना, त्यांची बँक खाती आणि ९० लाख रूपये रकमेच्या मुदत ठेवी गोठविल्या आहेत.
कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून कार्ती चिदंबरम हे तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता.
पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात विदेशी गुंतवणुकीसाठी मंजूरी दिली होती.
तसेच सत्य परिस्थिती लपवून ठेवण्यासाठी विदेशी गुंतवणुकीची रक्कम चुकीची दाखवण्यात आली, अशी माहिती ‘ईडी’च्या तपासात उघड झाली आहे.
सीबीआयने ४ ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. यामुळे त्यांच्यवर देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा