पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते १४ सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या ३ तासांत कापणे शक्य होणार आहे.
हा प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व २०२२पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पासाठी कर्जपुरवठा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आभार मानले.
तर शिंजो आबे यांनी केलेल्या भाषणात भारत आणि जपानच्या मैत्रीचा पुनारोच्चार करत, ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा दिला.
दिल्लीतील जुन्या वाहनांवरील बंदी कायम
दिल्ली एनसीआरमध्ये १० वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांवरील बंदी उठविण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नकार दिला आहे.
केंद्र सरकारने हरित लवादाला वाहनबंदीचा कालावधी १० वरून १५ वर्षे करावा, असे सूचवले होते. मात्र एनजीटीने कोणतेही बदल न करता ही बंदी कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने २०१५मध्ये १० वर्षांहून जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. एनजीटीने दिल्लीतल्या जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनवरही बंदी घातली आहे.
१० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांची विस्तृत माहिती जमा करण्याचे आदेशही लवादाने दिल्ली सरकारचा वाहतूक विभाग तसेच अन्य खात्यांना दिले होते.
याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणताच प्रयत्न करत नसल्याचा आरोपही केंद्र सरकारवर केली आहे.
दाऊदच्या संपत्तीवर ब्रिटिश सरकारकडून टाच
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती ब्रिटिश सरकारने गोठवली आहे.
दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर (सुमारे ४५ हजार कोटी) असून, त्यापैकी ४ हजार कोटी रुपयांची मालमत्ता ब्रिटनमध्ये जप्त करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरे आहेत, त्यांची किंमत काही हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंधांसंबंधीच्या यादीमध्ये दाऊदचा समावेश केला होता. या संदर्भात भारतानेही ब्रिटनला पूर्वीच आपला अहवाल सुपुर्द केला आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनकडून मालमत्ता गोठविण्याच्या संदर्भात काही जणांची यादी जारी करण्यात आली होती. त्यात दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ मालमत्तांचाही उल्लेख होता.
दाऊदची अनेक अरब व मुस्लीम राष्ट्रांत गुंतवणूक, उद्योग व मालमत्ता आहे. संयुक्त अरब अमिरातीने जानेवारी २०१७मध्ये त्याच्या १५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.
‘फोर्ब्ज’ नियतकालिकाच्या माहितीनुसार दाऊद हा सर्वांत श्रीमंत गँगस्टर असून २०१५मध्ये त्याची एकूण संपत्ती ६.७ अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ४५ हजार कोटी) एवढी होती.
युरोप, अफ्रिका, दक्षिण आशियातील ५०हून अधिक देशांत दाऊदची गुंतवणूक असल्याचे म्हटले जाते.
२०२४च्या ऑलिम्पीक स्पर्धा पॅरिसमध्ये
२०१६साली ब्राझीलच्या रिओ दी जनेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पिकनंतर आगामी २०२०च्या ऑलिम्पिक खेळांचा मान जपानच्या टोकीयो शहराला मिळाला आहे.
यानंतर होणाऱ्या २०२४मधील खेळांचे यजमानपद फ्रांसची राजधानी पॅरिस शहराला मिळणार आहे. याआधी १०० वर्षापूर्वी १९२४मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पीक स्पर्धा खेळविल्या गेल्या होत्या.
याशिवाय २०२८च्या ऑलिम्पीक खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान अमेरिकेतल्या लॉस एंजलिस या शहराला मिळाला आहे.
ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी दोन्ही शहरांना आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती १.८ दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये गरजेनूसार २ दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ‘क’ गटात भरती करताना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने लावून धरली होती.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यापूर्वीच परिवहन विभागात हा निर्णय लागू केला होता.
मात्र हा निर्णय सर्वच सरकारी विभागांसाठी लागू करावा, अशी मागणी रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
हिक्स होप ट्रम्प यांची प्रमुख संपर्क संचालक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिक्स होप या माजी मॉडेलला आपल्या प्रमुख संपर्क संचालकपदी नियुक्त केले आहे.
जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेतल्यापासून या पदावर त्यांनी केलेला हा तिसरा फेरबदल आहे. एंथोनी स्कॅमुची यांच्या जागी हिक्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिक्स होप ही ट्रम्प प्रशासनातील सर्वाधिक पगार मिळणाऱ्यांपैकी एक असणार आहे. हिक्स होप अनेक वर्षांपासून ट्रम्प यांच्याशी संबंधित आहे.
२८वर्षीय हिक्सने मॉडेलिंगमधून करिअर सुरू केले होते. वयाच्या ११व्या वर्षीच राफ लॉरेनसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत हिक्सने काम केले आहे.
हिक्स २०१२साली ट्रम्प यांच्या संपर्कात आली आणि दोघांनी मिळून काम करण्यास सुरुवात केली.
जानेवारी २०१७मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने ‘अंडर-२० अचिव्हर्स’मध्ये तिचा समावेश केला होता.
हिक्स होप डोनाल्ड ट्रम्प यांच पूर्ण जनसंपर्क सांभाळत होती. यामध्ये की ट्रम्प कोणाला किती वाजता भेटणार, किती वेळ बोलणार हे सर्व नियोजन ती ठरवत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा