चालू घडामोडी : २६ सप्टेंबर
आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत.
- आर्थिक विषयांचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार आहे.
- डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य), डॉ. रथिन रॉय (अस्थायी सदस्य), डॉ. अशिमा गोयल (अस्थायी सदस्य) या अर्थजगतातील दिग्गजांना परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
- निती आयोगाचे सदस्य आणि मुख्य सल्लागार रतन वाटाळ यांची या परिषदेवर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- आर्थिक सल्लागार परिषद स्वायत्त असणार आहे. आर्थिक विषय तसेच त्या अनुशंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याचे अधिकार या परिषदेला असणार आहेत.
- महत्त्वाच्या आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देणे, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणे आणि पतंप्रधानांनी वेळोवेळी निश्चित केलेल्या कामांचा निपटारा करणे, अशा जबाबदाऱ्या प्रामुख्याने या परिषदेवर असणार आहेत.
मुख्य परीक्षेचे पात्रतेचे प्रमाण वाढविले
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या निकषामध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- यापुढे मुख्य परीक्षेसाठी एकूण पदांच्या १२ पटींऐवजी १५ ते १६ पट विद्यार्थी पात्र ठरविले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
- राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी आयोगाने भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
- आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या १२ पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते.
- आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या पुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या १५ ते १६ पट विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
- पूर्व परीक्षेचे कट ऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणार आहे.
- राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. लाखो विद्यार्थी विविध परीक्षा देत असले तरी तुलनेने पदभरतीचे प्रमाण कमी होत चालले आहे.
- परिणामी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतानाही मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. पूर्व परीक्षेत चांगले गुण मिळवूनही हजारो विद्यार्थ्यांची संधी एका गुणामुळेही दवडली जाते.
- या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आता मुख्य परीक्षेतील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
महाराष्ट्राचे पहिले डीआयजी के पी मेढेकर यांचे निधन
- महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर यांचे २५ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
- मेढेकर यांनी १९४९ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सनदी पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली.
- तेथून १९५६मध्ये पुणे रेल्वे अधीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. आयपीएस अधिकारी असलेले मेढेकर हे के पी मेढेकर या नावाने प्रसिद्ध होते.
- ते महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक ठरले. २५ फेब्रुवारी १९८२ ते ३० एप्रिल १९८५ या दरम्यान ते पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते.
- १९८२मध्ये चांगल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी पोलिसांनीच बंड पुकारले होते. मेढेकर यांनी बंड शमवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
- त्यांनी मुंबई पोलीस दलाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, केंद्रीय गुप्तवार्ता विभागासह अनेक विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले.
- त्यांच्यावर पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
माणिक भिडे यांना भीमसेन जोशी पुरस्कार
- जयपूर-अत्रौली घराण्याच्या जेष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांची यंदाचा महाराष्ट्र शासनातर्फे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला राज्य शासनातर्फे पं. भीमसेन जोशी यांच्या नावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
- पाच लाख रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
- माणिक भिडे यांनी मधुकरराव सडोलीकर यांच्याकडून गाण्याचे शिक्षण घेतले. त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडेही १५ वर्षे गायनाचे धडे गिरवले.
- त्यानंतर त्यांनीही अनेक शिष्यांना घडवले. माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतकिा वर्दे अशा अनेक शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
- माणिकताई आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार असुन देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
अॅंजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी
- जर्मनीच्या चॅन्सेलर, कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन युनियनच्या (सीडीयू) नेत्या अँजेला मर्केल यांनी निवडणुकीत सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला आहे.
- मर्केल चौथ्यांदा विजयी झाल्या असल्या, तरी संपूर्ण बहुमत मिळवण्यात मर्केल यांचा पक्ष अपयशी ठरला आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या सीडीयू पक्षाला ३२.५ टक्के मते मिळाली.
- मर्केल यांचे प्रमुख विरोधक सोशल डेमॉक्रेट पक्षाचे पक्षाचे मार्टिन शुल्झ यांना २० ते २१ टक्के मते मिळवली असून, हा पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा पक्ष ठरला आहे.
- अत्यंत कडवा उजवा पक्ष मानल्या जाणाऱ्या अल्टर्नेटिव्ह फॉर दॉइचलॅंड (एएफडी)ला अपेक्षेपेक्षा मतांची जास्त टक्केवारी मिळालेली आहे. हिटलरच्या काळानंतर प्रथमच वंशवादी आणि परदेशी लोकांना विरोध करणारा पक्ष संसदेत आला आहे.
- ६३ वर्षांच्या मर्केल या गेली १२ वर्षे त्या जर्मनीच्या चॅन्सेलर असून, जागतिक पातळीवर खंबीर आणि प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
- या नव्या आघाडी सरकारमुळे मर्केल पुन्हा चॅन्सेलर होणार असल्या तरी त्यांच्या पक्षाचा जनाधार कोसळलेला दिसत असून त्यांची लोकप्रियताही घटल्याचे दिसत आहे.
- दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये सोशल डेमोक्रॅटिकला ही सर्वात कमी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुरला पहिला क्रमांक
- स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुरने देशभरातील सर्वच शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- स्वच्छतेच्या गुणांकनात कोल्हापूरने सर्वाधिक ९० गुण मिळवले आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे.
- २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूरचा गौरव करण्यात येणार आहे.
- स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या स्पर्धेसाठी केंद्र शासनाने त्या जिल्ह्याची कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.
चंदा कोचर आणि शिखा शर्मा जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत
- चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे.
- अमेरिकेबाहेरील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिक महिला होण्याचा मान बँको सँटांडेर समूहाच्या कार्यकारी चेअरमन अॅना बोटीन यांनी पटकावला आहे.
- या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून, अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा २१व्या स्थानी आहेत.
- पेप्सीकोच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नुयी यांनी अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
- पहिल्या स्थानी जनरल मोटर्सच्या चेअरमन मॅरी बारा या आहेत. तिसऱ्या स्थानी लॉकहीड मार्टिनच्या चेअरमन व सीईओ मेरीलीन हेवसन या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा