पंतप्रधान मोदींनी ३ सप्टेंबर रोजी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर ४ राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक आणि सरकारची आतापर्यंतची कामगिरी या दोन निकषांच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार निर्णायक ठरला.
मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल करताना मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.
माजी केंद्रीय मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण विभागाची धूरा देण्यात आली होती.
ओल्टमन्स यांची हॉकी प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी
भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांची हॉकी इंडियाने खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाच्या पुढील वाटचालीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे हॉकी इंडियाकडून सांगण्यात येत आहे.
ओल्टमन्स यांच्या जागी उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन हे हंगामी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत.
२०१२ साली भारताचा संघ लंडन ऑलिम्पिकमध्ये १२व्या स्थानी होता. पण त्यानंतर ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१६साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ८वे स्थान पटकावले होते.
जानेवारी २०१३मध्ये ओल्टमन्स यांनी उच्च कामगिरी संचालक म्हणून भारतीय संघातील जबाबदारी स्वीकारली होती.
त्यानंतर जुलै २०१५मध्ये पॉल व्हॅन अॅस यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली.
ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गतवर्षी झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल
आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती.
या नियमांना आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली आहे.
त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून खेळवल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रिकेट सामन्यात नवीन नियम लागू होणार आहेत.
ज्येष्ठ गायिका रजनी करकरे-देशपांडे यांचे निधन
सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे-देशपांडे यांचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले.
श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे ३ ऑगस्टपासून खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्यांचे निधन झाले.
रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले.
तीस वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली आदी केंद्रावरून गायनाचे कार्यक्रम सादर केले.
विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी मैफिली सादर केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. वरात, हे दान कुंकवाचे, दैवत, आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
१९८४मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गेली ३० वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या.
सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग १६ वर्षांहून अधिक काळ त्यांनी चालविले.
११ वर्षीय दिव्याला सुवर्णपदक
नागपूरच्या ११ वर्षीय दिव्या देशमुख हिने ब्राझिलमध्ये झालेल्या १२ वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला आहे.
मुलींच्या श्रेणीमध्ये झालेल्या ११ पैकी ११ फेऱ्यांमध्ये दिव्या अपराजित राहिली आणि तिने ९.५ गुण मिळवले. तिने एकूण ८ सामने जिंकले तर ३ सामने अनिर्णित राहिले.
अमेरिकेच्या नतास्जा मेटस या खेळाडूपेक्षा एक गुण जास्त मिळवत दिव्या प्रथम स्थानावर राहिली.
या स्पर्धेमध्ये १९ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. दिव्याच्या खालोखाल भारताच्या रक्षिता रावीने आठवे स्थान मिळवले.
यापूर्वी दिव्याने आशियाई युथ चँपियनशिप स्पर्धेत कास्यपदक तर, गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
२०१४मध्ये तिने १० वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा