केंद्र सरकारने माजी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी (कॅग) नियुक्ती केली आली आहे.
महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपला. त्यांनी दोन वर्षे या पदाची धुरा सांभाळली.
राजीव महर्षी यांच्यानंतर राजीव गऊबा यांच्याकडे केंद्रीय गृह सचिवपदाची जबाबादारी असेल.
१९७८च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी असलेले राजीव महर्षी शशिकांत शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
राजीव महर्षी ३० वर्षांपासून अधिक काळापासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विषयात स्ट्रॅथक्लाइड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.
त्यांनी इतिहास विषयात नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून बीए आणि एमए केले आहे.
राजीव महर्षींनी आतापर्यंत केंद्रात आणि राजस्थान सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
राजस्थान सरकारचे मुख्य सचिव, अर्थखात्याचे मुख्य सचिव, इंदिरा गांधी नहर बोर्डाचे सचिव, बिकानेरचे जिल्हाधिकारी सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे.
याशिवाय केंद्रात अर्थसचिव, खते विभागाचे सचिव या पदांवर काम करण्याचा अनुभव महर्षींना आहे.
केनेथ जस्टर अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे.
भारतासोबत आर्थिक, व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा या निर्णयावरून दिसून येते.
रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यात राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर केनेथ जस्टर यांची वर्णी लागली आहे.
६२ वर्षांचे केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात.
केनेथ जस्टर यांनी जानेवारी ते जून या कालावधीत ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक विषयांचे उप सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
केनेथ जस्टर यांच्याकडे हॉर्वर्ड लॉ स्कूलमधील कायद्याची पदवी आहे. याशिवाय हॉर्वर्डमधील जॉन एफ केनेडी स्कूलमधून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर पदवी घेतली.
केनेथ जस्टर १९९२-१९९३ या दरम्यान स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग काऊन्सिलर राहिले आहेत.
याशिवाय १९८९ ते १९९२ दरम्यान त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
एस पी त्यागींवर आरोपपत्र दाखल
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह ९ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
या ९ जणांमध्ये त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांचाही समावेश आहे.
माजी हवाईदलप्रमुख त्यागी यांना ९ डिसेंबर रोजी याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर २६ डिसेंबरला त्यांना जामीनही मिळाला होता.
त्यागी आणि इतर आरोपींनी ऑगस्ट वेस्टलँडप्रकरणात लाच घेतल्याचा सीबीआयने आरोप केला आहे.
हेलिकॉप्टर उत्पादकाला ५३ कोटी डॉलरचे कंत्राट मिळण्यासाठी या सर्वांनी मदत केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
विक्रमी अवकाशयात्री पेगी व्हिटसन पृथ्वीवर परतणार
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात २८८ दिवसांचे विक्रमी वास्तव्य करणारी नासाची महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन आता पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहे.
उड्डाण अभियंता जॅक फिशर व रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संस्थेचे कमांडर फ्योदोर युरीशिखिन यांच्यासह ती सोयूझ एमएस ०४ या अवकाश यानाने परत येत असून ते कझाकस्तानमध्ये उतरणार आहे.
पेगी व्हिटसन हिने अवकाशात २८८ दिवस वास्तव्य केले असून पृथ्वीभोवती ४६२३ प्रदक्षिणा मारल्या आहेत.
नोव्हेंबर २०१६ पासून ती अवकाशात होती. तिचे हे अवकाशातील तिसरे प्रदीर्घ वास्तव्य होते.
तिने कारकीर्दीत ६६५ दिवस अवकाश वास्तव्य केले असून कुठल्याही अमेरिकी अवकाशवीरापेक्षा हा काळ अधिक आहे. जागतिक पातळीवर तिचे आठवे स्थान आहे.
युरीशिखिन व फिशर हे एप्रिलमध्ये अवकाश स्थानकात गेले होते. त्यांनी अवकाशात १३६ दिवस पूर्ण केले आहेत.
युरीशिखिन याचे अवकाशात पाच मोहिमात मिळून ६७३ दिवस वास्तव्य झाले आहे. तो जागतिक क्रमवारीत सातवा आहे.
या अवकाश मोहिमेत पेगी व्हिटसन, फिशर व युरीशिखिन यांनी जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञानातील अनेक प्रयोग केले आहेत.
एलआयसीला ६१ वर्षे पूर्ण
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणाऱ्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली आहेत.
एलआयसीने २०१६-१७च्या पहिल्या तिमाहीमध्ये आधारस्तंभ, आधारशिला, जीवन उमंग आणि प्रधानमंत्री वय वंदना या योजना आणल्या असून, आतापर्यंतच्या त्यांच्या योजनांची संख्या २३ आहे.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पेन्शन, आजार यासाठीच्याही एलआयसीच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत.
१९५६साली अवघ्या ५ कोटी भांडवलावर उभ्या राहिलेल्या एलआयसीची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांची असून, त्यात उतरविलेल्या आयुर्विम्याची रक्कम २३ लाख २३ हजार ८०२ कोटी रुपये इतकी आहे.
एलआयसीने २०१६-१७ या वर्षात २१५.५८ लाख क्लेम सेटल केले. त्यातील रक्कम १ लाख १२ हजार ७०० कोटी रुपये आहे.
एलआयसीने आता संबंधित देशातील कंपन्यांच्या भागीदारीतून १४ देशांत पाय रोवले आहेत.
नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, कतार, कुवेत, ओमान, फिजी आदी ठिकाणी एलआयसीचे अस्तित्व आहे.
बीआरडी बालमृत्यूप्रकरणी डॉ. काफिल खानला अटक
गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) ऑगस्ट महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिल खानला अटक करण्यात आली आहे.
बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात फक्त ६ दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता.
१० आणि ११ ऑगस्ट रोजी ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्यामुळे ३० मुलांना आपला जीव गमवावा लागला होता.
या घटनेनंतर युपीच्या वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर यांना पदावरुन हटवण्यात आले होते.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
डॉ. खान यांच्यावर रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
निलंबित करण्यात आलेले बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ पुर्णिमा यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
डॉ काफिल यांच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा